Thursday, July 4, 2019

बिर्ला परंपरेतला दुवा निखळला!

बिर्ला समूहाचे भीष्माचार्य बसंतकुमार बिर्ला ह्यांनी वयाच्य ९८ व्या वर्षी ह्या जगाचा निरोप घेतला. बिर्ला उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा कुमारमंगलम् बिर्ला हे बीके बिर्लांचे नातू असून कुमारमंगलम् बिर्लांना घडवण्यात बीके बिर्लांचा मोठा वाटा होता. कुमारमंगलम् बिर्ला हे बीके बिर्ला उद्योगसमूहाचे आणि त्यांचे वडिल आदित्यविक्रम बिर्ला ह्यांनी स्वतंत्रपणे स्थापन केलेल्या आदित्यविक्रमबिर्ला गटाचे वारसदार आहेत. 1995 साली वडिल आदित्यविक्रम बिर्ला ह्यांचे अकाली निधन आणि बीके बिर्लांचा वार्धक्यकाळ ह्यामुळे दोन्ही समूहांची जबाबदारी कुमारमंगलम् बिर्ला ह्यांच्यावर येऊन पडली. बसंत कुमार बिर्ला हे घनःश्यामदास बिर्लांचे सगळ्यात कर्तृत्वान पुत्र. बिर्ला समूहातील १ लक्ष २० हजार कर्मचारी बोलताना बसंत कुमार बिर्लांचा उल्लेख बीकेबाबू असाच करतात!  गेल्या वर्षापर्यंत दोन्ही गटांचे मिळून बाजारमूल्य ४४.३ अब्ज डॉलर्सच्या घरात होते. बीके आणि आदित्या बिर्ला उद्योगसमूह ३५ देशात विखुरला असून अल्युमिनियम, कागद, सिमेंट, रसायने, पीटर्स इंग्लंड शर्ट, व्हिसकॉस फिलामेंट यार्न आणि त्यापासून बनवलेले सुटाचे कापड, कार्बनब्लॅक, रसायने, टायर्स, सूती कापड, वित्तीय सेवा, टेलिकॉम, बीपीओ, माहितीतंत्रज्ञान इत्यादि क्षेत्रात हा समूह आघीडवर आहे. नॉनफेरस मेटल आणि सिमेंट ह्या दोन क्षेत्रात जागतिक आघाडी गाठण्याची महत्त्वाकांक्षा कुमारमंगलम् बिर्ला बाळगून आहेत.
उद्योगाचा पसारा वाढवणे एवढेड साधे ध्येय बीके बिर्ला उद्योगसमूहाने कधीच ठेवले नाही. काळाच्या ओघात आध्यात्मिकतेकडून आधुनिक शैक्षणिक संस्था स्थापन करण्याकडे बीके बिर्ला समूहाचा प्रवास सुरू झाला. आधीच्या पिढीने देवळे आणि धर्मशाळा बांधल्या तर बीके बिर्ला समूहाने पिलानी ह्या त्यांच्या मूळ गावी इंजिनियरींग शिक्षणासाठी स्वतंत्र संस्था स्थापन केली. अलीकडे ह्या संस्थेला स्वायत्त्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे. त्याखेरीज कल्याण येथेही ह्या समूहाने एक महाविद्यालय सुरू केले. खुद्द कुमारमंगलम् बिर्ला ह्यांच्यातही आजोबांचे गुण उतरले आहेत. नव्याजुन्यांचा संगम असलेली आधुनिक जीवनशशैली त्यांना बीकेंइतकीच प्रिय आहे. त्यांच्या घरात मुलांना संगीत शिकवण्यासाठी प्रसिध्द गायक मिलिंद इंगळे ह्यांच्या वडिलांची नेमणूक करण्यात आली होती. आपल्या समूहातील कंपन्यांच्या प्रमुखांना वर्षातून एकदा भोजनास पाचारण करण्याचा बीकेंचा प्रघात होता. ह्या सा-या कंपनीप्रमुखांना बीके बिर्ला दांपत्य स्वतः आग्रहपूर्वक वाढत असत.
सामान्यतः कर्तृत्ववान माणसाची मुले बापाएवढी कर्तृत्वान निघत नाही असा सार्वत्रिक समज आहे.  ह्या कारणामुळेच अनेक उद्योगघराणी संपुष्टात आलेली दिसतात. बिर्ला कुटंब मात्र ह्या सार्वत्रिक समजुतीला अपवाद आहे. ह्यांचा अर्थ त्यांच्या कुटुंबात हिस्सेवाटीवरून भांडणे नाहीत असा नाही. कुटुंबातली भांडणे हा उद्योगघराण्यांना शाप आहे. बिर्ला कुटुंब त्ला अपवाद नाही. माधवप्रसाद बिर्लांच्या कुटुंबात मृत्यपपत्रावरून भांडण उपस्थित होताच स्वार्थी विचार बाजूला सारून मृत्यूपत्राला विरोध करण्यासाठी जिवाचे रान करा, असा आदेश बीकेंनी त्यांच्या कुटुंबातील नव्या पिढीला दिला होता. मोठे उद्योग आणि राज्यकर्ते ह्यांच्यातले संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. परंतु ह्यासंबधी बीके बिर्लांचे धोरण स्पष्ट होते. सरकारी परवान्यांसाठी जमेल तिथपर्यंतच प्रयत्न करायचे, अन्यथा सरळ प्रस्ताव मागे घ्यायचा. जनसंपर्क आणि राजकीय नेत्यांशी घसट हा विषय हाताळणे हा विषय तसा किचकट. ह्याही बाबतीत बीके बिर्लांनी आपल्या समूहाच्या सीमारेषा निश्चित केल्या आहेत. ना दोस्ती ना दुष्मनी हे बिर्ला समूहाच्या धोरणाचे सूत्र आहे. एकीकडे वरिष्ठतम अधिका-यांना भरपूर अधिकार देत असताना दुसरीकडे घोडचुका करणा-याला घरचा रस्ता दाखवण्य बीकेंनी कमी केले नाही. हेच धोरण कामगार चळवळी आणि तंत्रज्ञांच्या नेमणुकांच्या बाबतीत अवलंबले. सेंच्युरी मिल बंद करताना स्वेच्छा निवृत्ती घेणा-या प्रत्येकाला ठरल्यानुसार रक्कम हातात दिली जाईल हे त्यांनी कसोशीने पाह्यले.
डाव्या पक्षांनी बिर्ला समूहावर सातत्याने टीका केली. केरळात डाव्यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने बिर्लांकडे आपल्या राज्यात कारखाना काढण्याचा आग्रह धरला तो बीकेच्या काळातच! मारवाडी हा देशभर टिंगलटवाळीचा आणि कुचेष्टेचा विषय! परंतु अशा प्रकारच्या टिंगलटवाळीला अजिबात भीक न घालण्याचे माहेश्वरी समाजाचे जन्मसिध्द धोरण. बीकेबाबूंचेही धोरणही असेच जन्मसिध्द धोरण होते. कल्याणजवळील शहाड येथे बिर्ला कुटुंबाना दिल्लीप्रमाणे लक्ष्मीनारायण मंदिर बांधायचे होते. विठ्ठल हे महाराष्टाराचे आराध्य दैवत. शहाडला विठ्ठल मंदिर हवे असे कुणीतरी बिर्लांना ऐनवेळी सुचवले. ही सूचना मान्य करून बीके बिर्लांनी लक्ष्मीनारायणाच्या जोडीने विठ्ठलाचीही प्रतिष्ठापना केली. म्हणून हे मंदीर विठ्ठल मंदिर म्हणूनच ओळखले जाते. दरवर्षी आषाढीला पंढरपूरप्रमाणे शहाडच्या विठ्ठल मंदिरातही दर्शनासाठी भलीमोठी रांग लागते. रेल्वेप्रवासीही गाडीतून मंदिराच्या शिखराचे दर्शन घेतात!
कुठल्याही वादात न पडता आपल्या मनात जे योजले असेल तेच निर्धारपूर्वक तडीस नेणा-या परंपरेतला मोठा दुवा बीके बि.र्लांच्या निधनाने निखळला!
रमेश झवर

No comments: