प्रवेश तर एकदा मिळाला पण वृत्तपत्रीय करीअरमध्ये नेमणुकीचे महत्त्व फक्त नोकरी
मिळण्यापुरतेच असते. चांगल्या
बातम्या देण्याची संधी मिळाल्याखेरीज आणि स्वतःचे आणि वृत्तपत्राचे नाव गाजले
नाहीतर पत्रकाराच्या आयुष्याला काडीचेही महत्त्व नाही. एकही धाव न काढता तंबूत परत
फिरणा-या क्रिकेटपटुसारखी आणि सिनेमात जमावाच्या सीनमध्ये एक्स्ट्रा म्हणून काम
मिळण्यासारखेच त्याचे आयुष्य! मी न्यूजडेस्कवर उपसंपादक होतो. पण मला फिल्डींग वगैरेची संधी मिळाली
एवढेच. बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याची संधी मिळून त्या संधीचे चीज करून दाखवले तरच क्रिकेटपटुचे
जीवन सार्थक होते अन्यथा नाही. वर्तमानपत्राच्या नोकरीचेही असेच असते. कर्तृत्व दाखवण्याची संधी
केव्हा हाती लागेल ह्याची चिंता मला सतावत होती.
पण माझे नशीब इतके काही ‘सो सो’ नव्हते. कर्तृत्व
दाखवण्याची संघी अचानकपणे समोर आली. सांज मराठाच्या संपादक महिन्याभराच्या रजेवर
गेले. उद्यापासून तुम्ही ‘सांज मराठा’च्या ड्युटीला या,
असे न्यूज एडिटर मनोहर पिंगळेंनी फर्मावले. सांजच्या ड्युटीत फक्त पहिले पान
करायचे असते. बाकीची पाने अधीच तयार करण्यात आलेली असत. बरोबर १० वाजता पान मशीनला
गेले पाहिजे. त्यानंतर दुस-या दिवशीचा अग्रलेख लिहून सांजचा संपादक घरी जायला मोकळा
असे. कामाचे हे स्वरूप मला न्यूजएडिटरने दोन वाक्यात समजावून सांगितले. मी मान
डोलावली.
नाही म्हटले तरी मला थोडे टेन्शन आलेच. टेन्शन येण्याचे कारण होते. दुस-या दिवशीची
तारीख होती १६ जुलै १९६९. जगाच्या इतिहासात सर्वात मोठी बातमी ह्या दिवशी घडणार हे घरी
जाण्यापूर्वी पेपर चाळताना माझ्या लक्षात आले. ते न्यूटएडिटर पिंगळे
ह्यांच्या लक्षात आले नसावे. कदाचित ते त्यांच्या लक्षात आले असते तर माझ्याऐवजी
दुस-या अनुभवी उपसंपादकाला त्यांनी सांजची ड्युटी लावली असती. दुस-या दिवशी
गुरूचंद्र युती असावी. म्हणून मला ही संधी मिळाली असा निष्कर्ष मी काढला. त्या काळात माझा
फलज्योतिषावर उदंड विश्वास होता! दुस-या क्षणी माझेच मला हसू आले. मनुष्य चंद्रावर उतरणार ह्या संपूर्णपणे
वैज्ञानिक घटनेची विलक्षण बातमी लिहायला निघालो असताना चंद्र कुठल्या राशीत आहे
ह्याची विवंचना माझ्या मनात सुरू होती! ही नक्कीच हसण्यासारखी गोष्ट होती. मनुष्य चंद्रावर उतरणार हे जितके
सत्य तितकेच कशाबद्दल तरी काळजी करत राहणे हा मानवी स्वभाव आहे हेही तितकेच सत्य!
प्रत्येक घटनेचा भाग्याशी संबंध जोडण्याची सामान्य प्रवृत्ती हेही त्या
काळाचे वैशिष्टय होते. त्याला मी तरी कसा अपवाद असणार?
मराठात १५-२० सबएडिटर होते. त्ती बातमी लिहायची संधी इतर कोणालाही न
मिळता मला एकट्याला आणि एकट्यालाच ती मिळाली ह्याला मी तरी भाग्य समजून चाललो होतो.
त्या संधीचा अर्थ कोणाला कळला की नाही हे मी सांगू शकत नाही. पण एवढे मात्र नक्कीच
सांगू शकतो की मंत्र्यांचे राजिनामे, एकाएकी धरण फुटून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि
वित्तहानि झाल्याच्या बातम्या खळबळजनक असतात. खळबळजनक बातम्या रोज घडत नाही हे
खरे. पण प्रत्येक रिपोर्टरला वर्षांतून एकदा तरी खळबळजनक बातम्या देण्याची संधी
मिळते. ती बातमी मी कशी चतुराईने मिळवली वगैरे रसभरित गप्पा रिपोर्टर मंडळी पुढे
अनेक वर्षे मारत असतात. अशी संधी मला
मिळण्याचा प्रश्नच नव्हता. कारण पत्रकार असलो तरी रिपोर्टर नव्हतो. आम जनतेच्या
लेखी फक्त संपादक आणि बातमीदार हे दोघेच पत्रकार!
मनुष्य चंद्रावर उतरणार ही पृथ्वीच्या इतिहासातील अभूतपूर्व घटनेची बातमी
कशी लिहायची ह्याची जुळवाजुळव अमेरिकन पत्रकार मनातल्या मनात नक्कीच करत असावे.
प्रेस ट्रस्टचे फॉरेन डेस्क रात्री उशिरा सुरू व्हायचे. पीटीआयच्या बातमीवरून डौलदार
मराठीत इंट्रो कसा लिहायचा ह्याचा मी मनातल्या मनात सराव सुरू केला.
पाटिल-फर्नांडिस केसच्या सुनावणीच्या बातम्या लिहीत असताना डौलदार मराठीत कसे लिहायचे
ह्याची टीप मला साक्षात् आचार्य अत्र्यांकडूनच मिळाली होती. मी कशी बातमी लिहली
ती वाचून पाहायला आचार्य अत्रे मात्र तेव्हा हयात नव्हते. महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले
होते.
समनुष्य चांद्रयानातून मनुष्य चंद्रावर उतरणार ह्या घटनेचे वैशिष्ट
म्हणजे भारतातल्याच काय, जगातल्या कुठल्याही
पत्रकाराला चंद्रावर मनुष्य उतरत असल्याची घटना घडत असताना प्रत्यक्ष अंतराळातल्या
घटनास्थळी हजर राहून वृत्तांकित करता येणार नव्हती. काही तासांनी घडण-या घटनेवर
विचार करत माझ्या महालक्ष्मी देवळाच्या कंपाऊंडमधल्या चाळीच्या खोलीत मी कॉटवर
पहुडलो.
विचार करता करता माझ्या लक्षात आले की बातमीवर माझे नाव नसणार म्हणून
खंतावण्याचे खरे तर काहीच कारण नाही. आखणीपासून ते प्रत्यक्ष अपोलो यान अंतरिक्षात
पाठवण्याच्या मोहिमेत अनेक शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत. मोहिमेच्या
रेकार्डमध्ये सर्वांची नावे असली तरी चांद्रयान मोहिमेचे श्रेय कुण्या एकट्याचे
नाही. मनुष्य चंद्रावर उतरला ह्याचे श्रेय तर अवघ्या विश्वाला द्यायला हवे! नवे शास्त्रीय संशोधन आपल्याला कितीही नवे वाटत
असले तरी त्या संशोधनाची मदार कुठे ना कुठे मागील संशोधनावर आधारलेली असते. गुरूत्वाकर्षणाचा
नियम न्यूटनने शोधून काढला नसता तर पुथ्वीचे गुरूत्वाकर्षण भेदून अंतरिक्षात यान
पाठवण्याची कल्पना रशियन आणि
अमेरिकन शास्त्रज्ञांना सुचली असती का? नाही! त्या काळात रशिया
आणि अमेरिका ह्यांच्यात शीतयुध्द सुरू होते. साहजिकच अंतराळ संशोधनाच्या बाबतीत रशिया
पुढे की अमेरिकेच्या पुढे अशी जोरदार चर्चा सर्वत्र होती. १९५७ साली तर रशियाने
स्पुटनिक हा पहिला ग्रह अंतराळात पाठवला होता. त्यानंतर रशियाने समनुष्य
अंतराळायान अंतराळात पाठवून निश्चितच आघाडी गाठली होती. ह्या पार्श्वभूमीवर लौकरच
अमेरिकेचा अंतरळवीर चंद्रावर उतरणार अशी घोषणा अमेरिकेच अध्यक्ष केनेडी ह्यांनी
केली. त्यांच्या घोषणेमुळे अमेरिका-रशिया ह्यांच्यातल्या अंतराळ स्पर्धेच्या
चर्चांना ऊत आला.
कॉटवर पडल्या पडल्या मला ती सगळीच चर्चा खुळचटपणाची वाटू लागली. इतकेच नव्हे तर चांद्रमोहिमेची बातमी देणारा अंक काढण्याचे श्रेय मला मिळणार नाही म्हणून माझ्या
मनात सुरू असलेली खळखळ एकदम थांबली. मला शांत झोप केव्हा लागली ते कळलेच नाही.
सकाळी लौकर उठून ७ वाजताच ऑफिसला जाऊन क्रीडचा डोंगर उपसण्याचे मी ठरवले होते.
ठरवल्याप्रमाणे मला लौकर जाग आली. तयार व्हायला सुरूवात केली तेव्हा माझ्या लक्षात आले
की माझ्याकडच्या वातीच्या स्टोव्हमध्ये रॉकेल नाही. चरफडत मी चाळीच्या सार्वजनिक
नळाखाली आंघोळ केली. महालक्ष्मीजवळ असलेल्या वरळीच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी चालत
निघालो.
माझ्या खुर्चीत बसताच शिपायाने भराभर क्रीड फाडून माझ्यापुढे चळत ठेवली.
मला न विचारताच त्याने कॅंटिनमध्ये जाऊनही चहाही सांगितला. तो स्वतःच चहा घेऊन
आला. त्याच्यासाठीही चहा आणायला मी त्याला पुन्हा कँटिनमध्ये पाठवले. क्रीड सॉर्ट करत असताना
मध्येच मशीनवर आलेली एकुलती एक बातमी त्याने फाडून आणून दिली. नील आर्मस्ट्रांग
हा नियोजित वेळेपेक्षा २० मिनीटे उशिरा चंद्रावर उतरणार होता. त्याची उतरण्याची
वेळ लांबल्यामुळे १० वाजता पानावर सही करून ते मशीनला देण्याचे लांबण्याची शक्यता
निर्माण झाली. परंतु अशा प्रकारच्या शक्यता वर्तमानपत्रात नेहमीच निर्माण होतात.
ही तर मानवी इतिहासातील पहिलीवहिली घटना! ती कशी घडणार ह्याबद्दल काहीच सांगता येणार नव्हते. अंतराळ मोहिमात
अनेकवेळा अपघात घडल्याच्या घटना त्यापूर्वी घडलेल्या होत्या. अशी वेळी बातम्या
लिहणा-याची कसोटी असते. प्राप्त परिस्थितीत बातमीचा जोड भाग आधीच लिहून कंपोज करून
घेण्याचा मार्ग पत्करायचा असतो. हा नेहमीचा मार्ग मीही पत्कारला. कंपोजिंग फोरमननेही त्याची नेहमीची कामाची पध्दत बदलून दर ५ मिनीटांनी तो स्वतः ‘काप्या’ घ्यायला माझ्याकडे
यायचा. दोनतीन वाक्यांची कॉपी असली तरी तो तीही नेत असे. जगावेगळी हेडलाईनची
बातमी कंपोज करण्याचे काम एकाच कंपोझिटरला सोपवण्याऐवजी ते त्याने सर्व
कंपोझिटरना सोपवले होते.
हे सगळे करत असताना मशीनची घंटी वाजू लागली. मशीनवर नवी बहुप्रतिक्षित एका
वाक्याची बातमी आली, सन ऑफ मदर अर्थ स्टेप्ड ऑन मून. ती बातमी फाडून घेऊन मी
कागदावर वाक्य खरडले, पृथ्वीपुत्र नील आर्मस्ट्राँग ह्याने चंद्रभूमीवर पाऊल
ठेवले. फोरमन माझ्या पुढ्यात उभाच होता. त्याच्या हातात कागद सोपवला. त्याला
विचारले, कुठल्या टायपात तू इंट्रो कंपोज करणार?
‘टू लाईन पायका.`
‘नाईक, टू लाईनपेक्षा मोठा घेता येणार नाही का?`
`पण इंट्रोला मोठा
टाईप वापरला तर वरच्या हेडिंगला आणि बॅनरला सिस्कलाईनपेक्षा मोठा लाकडी फाँटचा टाईप घ्यावा लागेल. गेटअप बरा दिसणार
नाही.’
‘ ठीक आहे.’
फोरमन धावतच कंपोज खात्याकडे निघाला. मी त्याच्या मागोमग निघालो. एवढ्यात
फोन आला. शिपायाने रिसिव्हर उचलून माझ्या हातात दिला.
मी मधु दंडवले बोलतोय्....
मनात म्हटलं आता ह्यांना का बोलायचंय्! जगातल्या यच्चयावत् घटनांवर प्रतिक्रिया देण्याची
समाजवाद्यांची खोड कधी जाणार? मनातला विचार बाजूला सारून मी म्हटले, `बोला.’ बहुधा माझ्या मनात
आलेला विचार त्यांनी ओळखला असावा. ते म्हणाले, `मी फिजिक्सचा प्राध्यापक ह्या नात्याने
प्रतिक्रिया देतोय्. लिहून घ्याल?’
झक मारत लिहून घ्यावेच लागणार, असं मनातल्या मनात म्हणत मी लिहून
घेण्याचे नाटक केले. मधु दंडवते बोलत होते, चंद्रा, तुझं एकाकीपण संपले. भावी काळात आम्ही तुझ्या जमिनीवर वस्ती
करायला येणार आहोत. वगैरे वगैरे. माझ्या सहनशीलतेची
मर्यादा संपली होती. मला पहिल्या पानावर सही करायला जायचे होते. शेवटी मला त्यांना
तसे सांगावे लागले तेव्हा कुठे त्त्यांनी
फोन ठेवला. मी घाईघाईने दोन वाक्यांची बातमी लिहली. हेडिंग दिले, चंद्रा तुझे
एकाकीपण संपले!
दीनवाण्या नजरेने विनंती करत बातमी फोरमनच्या हातात ठेवली.
‘अहो आता मी पान लॉक
करायला घेतलंय्... ही बातमी कंपोज केव्हा करणार आणि पानात टाकायला जागा कुठून
आणणार?’
मी त्यावर काहीच बोललो नाही. परंतु फोरमनच्या मनात काय आले कोण जाणे! त्याने हेडिंग
सिक्सलाईन टायपात कंपोज केले आणि मास्टहेडच्या वर स्कायलाईन टाकली. अगदी
तळाच्या बातमीवर त्याने न विचारताच कापाकाप केली आणि प्रतिक्रियेची बातमी दिली.
दहा मिनीटात मशीनर पान गेले. मशिनमन स्वतः सांजच्या प्रती घेऊन वर आला. माझ्या
हातात अंक ठेवला तेव्हा त्याचा चेहरा खुशीने उजळून गेला होता.
मनुष्य चंद्रावर गेला ह्याचा अमेरिकनांना जेवढा आनंद झाला असेल त्यापेक्षा
कितीतरी आनंद मला झाला होता. अंक बाजारात गेला तेव्हा फोन सुरू झाले. त्या
प्रश्नांचा एकच मुद्दा.
‘बरोबर! मराठा हा
कम्युनिस्टांचा पेपर! तेव्हा तुम्ही
अमेरिकचा अंतराळवीर चंद्रावर उतरला हे तुम्ही कसं लिहणार? ‘
मी कपाळाला हात मारून घेतला.
त्याला फोनवर बोलताना मी एवढंच म्हणालो, हे बघा! एका ग्रहावरचा माणूस जेव्हा दुस-या ग्रहावर जातो तेव्हा तो रशियाचा असत नाही की अमेरिकेचा असत नाही. तो
पृथ्वीचा असतो. नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकेचा अनुभवी अंतराळवीर असल्याचं पुढं
बातमीत लिहलेलं आहेच बातमी जरा नीट वाचा!
पृथ्वीपुत्र नील आर्मस्ट्राँग ह्याने चंद्रभूमीवर पाऊल ठेवले हे माझे वाक्य मूळ टेक्स्टला तर धरून
होतेच, त्याखेरीज ते सुटसुटीत आणि डौलदारही होते.
आज अंतराळ संशोधान क्षेत्रात काम करण्यासाठी जगातील सुमारे ७० देश एकत्र
आले आहेत. त्याखेरीज अनेक देशात त्यांचे स्वतःचे संशोधन सुरू आहे. चंद्राच्या आणि मंगळाच्या
टूरिझमसाठी आणि अंतराळ स्थानकात मुक्काम करण्यासाठी सोयीसुविधा पुरवण्यासासाठी नासाने
नुकतीच कंपनी स्थापन करण्याची घोषणा नॅस्टॅक एक्सचेंजवर केली. त्यासाठी देकार मागवले
आहेत. भारतानेही अंतराळ सेवा पुरवण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. ह्या सा-या घडामोडींचा अर्थ इतकाच
की चंद्र किंवा मंगळावर सफर करण्याचा योग ज्याच्या पत्रिकेत असेल ती कुठलीही धनिक
व्यक्ती चंद्रावर जाऊ शकेल, मग ती कुठल्या का देशाची असेना का!
रमेश झवर
No comments:
Post a Comment