Tuesday, July 23, 2019

चांद्रयान-२ चे यश

बावीस जुलै २०१९ रोजी अंतराताळात चंद्राच्या दिशेने झेपावलेले रॉकेट ही निव्वळ चांद्रयान-२ मोहिम दोन नाही. चंद्रभूमीच्या गर्भात काय काय दडलेले आहे ह्याविषयीची शक्य तेवढी जास्तीत माहिती गोळा करून ते काही मिनटातच पृथ्वीवरील श्रीहरीकोटा अंतरळकेंद्रावर वाट पाहात बसलेल्या शास्त्रज्ञांकडे पाठवण्याची कामगिरी विक्रम ह्या उपग्रहाकडे सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे ३८५३ किलो वजनाचे ओझे अंतराळाकडे नेणा-या ह्या भल्या मोठ्या रॉकेटला चंद्राच्या कक्षेत सुखरूप पोहचवण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांची आहे. चंद्रभूमीच्या दक्षिण ध्रुवावरील भागाचे संशोधन करण्यासाठी लागणारी सगळी उपकरणे विक्रम उपग्रहात आहेत. ती उपकरणे स्वयंचलित आहेत. चांद्रयान-२ मोहिमेत विक्रम उपग्रह योग्य ठिकाणी आणि योग्य वेळ पाहून उतरवण्याचे आणि संशोधनाची स्वयंचलित उपकरणे चंद्रभूमीवर अलगदपणे टेकवणे सोपे व्हावे हे अपेक्षित आहे. त्यासाठी अंतराळात झेपावल्यापासून ते चंद्राच्या कक्षेत पोहोचेपर्यंत रॉकेटला १५ वेळा इष्ट ते वळण लावण्याचे काम श्रीहरीकोटा संशोधन केंद्रावरचे शास्र्त्रज्ञ करणार आहेत. प्रत्यक्ष चंद्रभूमीवर योजून दिलेली कामगिरी कशी पार पाडायाची ह्याविषयी उपकरणांना संपूर्ण स्वायत्त्ता देण्यात आली आहे. ती तशी द्यावीच लागणार हे उघड आहे! कारण चंद्राचा भूपृष्टभाग उबडखाबड आहे का आणखी कसा आहे हे पाहूनच उपकरणे उतरवली जाणार आहेत. चंद्राचा पृष्टभाग, चंद्रावर असलीच तर तेथील हवा, वातावरण वगैरेचा अभ्यास करणे हाच तर मुळी चांद्रमोहिमेचा हेतू असमुळे काहीही गृहित न धरता प्रसंग पाहून उपकरणे उतरवणे, ती कार्यन्वित करणे इत्यादि बाबी स्वयंचलित, नव्हे स्वयंशासित ठेवण्यात आली आहेत.
पहिली चंद्रमोहिम यशस्वी केल्यानंतर हवामान ढगाळ असूनही काल सुरू केलेल्या दुस-या चंद्रमोहिमेचा कामगिरी निश्चित करण्यात आली आहे. अर्थात ती ठरताना नेमकी कुठली कामगिरी बजावावी ह्याचा कार्यक्रम भारतीय संशोधकांनी विचारपूर्वक ठरवला. अर्थात् चीन, अमेरिका आणि रशिया हे तिन्ही देश नेमके काय करणार आहेत हेही भारताने जाणून घेतले असणारच. आवश्यक वाटली तेव्हा त्यांच्याशी भारतीय शास्त्रज्ञांनी चर्चाही केलेली असू शकते. अशा चर्चा करण्यासाठी बैठका घेण्याची जरूर नाही. अशा चर्चा ई-मेल, इंटरनेट, फोन ह्यावर नेहमीच होत असतात. ह्या चर्चा विमानतळाच्या लाऊंजमध्ये किंवा विमानप्रवासात अथवा प्रत्यक्ष भेटीत कुठेही आणि केव्हाही होतच असतात. शीतयुध्दाच्या काळात रशिया आणि अमेरिका ह्यांच्यात अंतराळ संशोधनाच्या बाबतीत कारण नसताना स्पर्धा झाली होती! अंतरळामोहिमांचा छुपा उद्देश हेरगिरी करण्याचा किंवा रासायनिक अस्त्रांचा मारा करण्यासाठीच असल्याचा समज रशिया आणि अमेरिका ह्या दोन्ही देशांनी एकमेकांविषयी करून घेतला होता. रशियाने अंतराळात फिरती प्रयोगशाळा पाठवली तर अमेरिकेने मनुष्यच चंद्रावर उतरवला. ह्यापुढील काळात मात्र कोणताही देश कोणाशीही स्पर्धा करणार नाही. किंवा इतरावर कुरघोडी करण्याचा विचारदेखील मनात आणणार नाही. उलट औपचारिक बैठका न घेता असे ठरले असावे की अंतराळ संशोधनाचा लाभ आता पृथ्वीवासियांना मिळण्याची वेळ आली आहे. तूर्तास आगामी पन्नास वर्षांत चंद्र हे एक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करायचे असे जणू करारच सगळ्यांनी केला असावा!
चंद्रावर फेरफटका मारण्यासाठी जाणा-यांचा चंद्रप्रवास सुखरूप होऊन चंद्रावर पृथ्वीवासी पर्यटकांची बडदास्त ठेवण्यासाठी शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना मात्र वरचेवर चंद्रावर जाऊनयेऊन राहावे लागणार. एका चीनी शास्त्रज्ञाच्या मतानुसार चंद्रावर कोठल्याही देशाची वकिलात स्थापन करण्याचा प्रश्न नाही. ह्याचा सरळ अर्थ असा की चंद्रावर ना कुठल्या सरकार असेल ना त्या सरकारचे इमिग्रेशन डिपार्टमेंट’! पासपोर्ट जारी करणारे ऑफिस सुरू करण्याचा प्रश्नच येत नाही! म्युनिसिपालिटी किंवा पोलिस स्टेशन सुरू होण्याची गोष्ट तर फारच लांब राहिली. उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातल्या एका गुहेतल्या मानवाला ऋतची प्राप्ती झाली असे वैदिक काळावर संशोधन करणा-यांचे मत आहे. त्यांच्या मते, ज्याला ऋतची प्राप्ती झाली होती तोच भृगू ऋषी! उशना कवी म्हणून ज्याचा गीते उल्लेख आहे तो उशना कवी हाच भृगू ऋषी! चंद्रावरील मानव हा पृथ्वीवरून आलेला पर्यटक असल्यामुळे त्याला ऋतची प्राप्ती वगैरे होण्याची भानगड नाही. त्याला ऋत आधीच माहित असल्यामुळेच तर तो चंद्रावर पोहोचू शकला.
भारताप्रमाणे रशिया, अमेरिकाआणि चीन ह्या तिन्ही देशांनी चांद्रमोहिमा आखल्या असून २०२४ ते २०३० ह्या काळात चारी देशांच्या मोहिमा परिपूर्ण झाल्या असतील. अमेरिकेला मंगळ यानाच्या प्रवासात लागणारे स्टेशन म्हणून चंद्राचा वापर करायचा आहे तर काही अमेरिकन कंपन्यांना चंद्रावर रिझार्टटाईप सुखसुविधा असलेली हॉटेले काढायची आहेत. तत्पूर्वी चंद्राचे सभोवताली किंवा प्रत्यक्ष चंद्रावर जंक्शन स्टेशन करण्यासाठी उद्योजकांनी एखादी कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा असे आवाहन नासा प्रमुखांनी अलीकडे नॅसडॅकवर केले होते.
सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत पुढे असल्याने आगामी काळात अंतराळ प्रवासाला लागणा-या सॉफ्टवेअर सेवा पुरवण्याचा धंदा यशस्वी होईल ह्यात शंका नाही. सॉफ्टवेअर सेवा हा टॅलेंट कवडीमोलाने विकण्याचा धंदा भारतीय कंपन्यांना चांगला जमला. त्यांना अंतरळायुगात हा नवा धंदा मिळेल ह्यात शंका नाही. ४८ दिवसांच्या चांद्रयान-२ मोहिमेने सॉफ्टवेअरखेरीज अनेक संशोधनशाखात भारताची गती उत्कृष्ट असल्याचे भारताने सिध्द करून दाखवले. विशेषतः क्रायोजेनिक तंत्रज्ञान हाताळण्याच्या बाबती आपल्या शास्त्रज्ञांनी कमालीचे यश मिळवले. त्या सर्वांना पद्म पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करणे योग्य ठरेल. क्रायोजेनिक इंजिनातली गळती श्रीहरीकोटातल्या शास्त्रज्ञांना थांबवता आली नसती तर कालचे रॉकेट उड्डाण यशस्वी झाले नसते हे सत्य देशाने लक्षात घेतलेले बरे.
रमेश झवर  

No comments: