स्वातंत्र्यपूर्व
काळात महात्मा गांधी
आणि महामानव बाबासाहेब आंबेडकर ह्या महापुरूषांची, त्यांच्या कार्याची यथार्थ ओळख
नव्या पिढीला करून देता येणार नाही. किंबहुना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जन्माला
आलेल्या पिढीला तर त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी
जेव्हा सांगितलं जातं तेव्हा त्यांना दंतकथा ऐकल्यासारखे वाटते! अर्थात त्याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही. इंग्रजी
माध्यम, गणित-सायन्स ह्या विषयाचा धोशा सतत त्यांच्या कानावर पडत आला आहे.
दहावीबारावीपर्यंत जो काही इतिहास शिकला असेल तेवढाच इतिहास नव्या पिढीला माहित.
बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार हे घासून गासून गुळगुळीत झालेले वाक्य फार
तर त्यांना माहित! राजकीय स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव ह्या
फ्रेंच राज्यक्रांतीतून उदयास आलेली तत्त्वे जगभर दुमदुमत होती. साहजिक ह्या तत्त्वांचा आधार लोकशाही मार्गाने प्रगती
करू इच्छिणा-या देशांनी स्वीकारणे क्रमप्राप्त
होते. राजेरजवाडे आणि कुर्निसात आणि मुजरे
ह्या मध्ययुगातून बाहेर पडण्याचा काळ भारतात
सुरू झाला होता. लोकशाही राज्य म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य! लोकशाही म्हणजे कायद्याचे राज्य. ही संकल्पना इंग्लंड आणि अमेरिकेप्रमाणे अनेक देशात रूजत चालली होती. भारतातही ह्या संकल्पनेचा प्रभाव दिसत होता. साहजिकच
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायद्याने चालणारे लोकशाही राज्य स्थापन करण्यासाठी
स्वतंत्र भारताचाही निर्धार होता. हा निर्धार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी असेंब्ली
स्थापन झाली होती. जगात सुरू असलेल्या
तत्त्वांच्या उद्घोषाबरहुकूम घटना करण्यासाठी
नियुक्त करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद
बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यासारख्या कायदेतज्ज्ञाकडे सोपवण्याचा ठराव पहिल्या असेंब्लीने
संमत केला. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे शिक्षण इंग्लंड आणि अमेरिकेत झाले होते. नुसतेच शिक्षण इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे
झाले होते असे नव्हे, तर तेथले राजकारण, समाजकारण अर्थकारणादींचे त्यांचे निरीक्षण
अफाट होते!
भारतात आल्यानंतर वकिली व्यवसाय तर त्यंनी सुरू केलाच, शिवाय समाजबांधवांची
स्थिती सुधारण्याच्या कार्यास वाहून घेतले. गांधीजी राजकीय स्वातंत्र्यासाठी झटत
राहिले तर बाबासाहेब सामाजिक समतेसाठी झटत राहिले. सत्याग्रहाचा मार्ग बाबासाहेबांना वर्ज्य होता
असे नाही. मंदिरप्रवेशाच्या अस्पृश्याच्या हक्कासाठी नाशिकला तर पाण्यासाठी महाडला
चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. गांधीजी हरिजन नियतकालिकात त्यांचे
विचार मांडत होते तर बाबासाहेबांनी प्रबुध्द भारत साप्ताहिकातून भेदभावावर आसूड
उगारला. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी रचनात्मक
कार्यावर गांधीजींनी भर दिलेलाच होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्यक्ष लोकशाही
राज्य निर्मितीसाठी सुरू झालेल्या
कार्यापासून गांधीजी पुष्कळ अलिप्त राहिले. सल्लागारांच्या भूमिकेत राहणेच त्यांनी
पसंत केले. कदाचित् वयोमानानुसार त्यांनी ही भूमिका पत्करली असावी. परंतु बाबासाहेबांनी
मात्र लोकशाही राज्य निर्मितीच्या कार्यात भाग घेतला. घटनेच्या आराखडा तयार
करण्यात सहत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली.
समाजबांधवांना खराखुरा न्याय आणि समतेची वागणूक मिळवून द्यायची असेल तर घटनेतच खास तरतुदी करणे
इष्ट ठरेल असे त्यांना कायदेतज्ज्ञ ह्या नात्याने वाटले. सत्याग्रह, आंदोलन,
निदर्शने ह्या मार्गांचे वैफल्य कदाचित बाबासाहेबांच्या ध्यानात आले असावे.
ह्याउलट गांधी सत्य, अहिंसा, अस्तेय अपरिग्रह
आणि ब्रह्मचर्य ह्या आध्यात्मिकशास्त्रातील तत्त्वांवर गांधीजींची नितांत श्रध्दा
होती. इतकेच नव्हे तर त्यांनी आणखी स्वतःच्या ५ व्रतांची त्यात भर घातली. मानवी जीवनाची मूलभूत तत्त्वांवर
हुकमत आली की मानवाची आणि त्याबरोबर समाजाची प्रगती होऊ शकेल ह्यावर गाधींचा विश्वास होता. ह्याउलट बाबासाहेबांना नजरेसमोर सामाजिक
वर्तनाचे रोकडे वास्तव होते. तरीही आपल्यातल्या धार्मिक प्रेरणांना त्यांनी कधीच गौण स्थान दिले नव्हते हे नंतरच्या काळात त्यांनी
आपल्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्म स्वीकारला ह्यावरून सिध्द झाले. आधुनिक काळात धर्मान्तराचा
मार्ग हा अभूतपूर्व असाच म्हटला पाहिजे. बौध्द धर्मच का? यज्ञयागादि कर्मकांड आणि जातीच्या पोलादी चौकटीत जखडून गेलेल्या
समाजापुढे डोकेफोड करण्यापेक्षा बोधिवृक्षाखाली बोध प्राप्ती झाल्यानंतर ३ हजार
वर्षांपूर्वी भगवान बुध्दाच्या अंतःकरणात
करूणेचा उदय झाला. भगवान बुध्दाचा करूणेचा
मार्ग बाबासाहेबांना पसंत पडला. सुदैवाने वेगळा धम्म स्थापन करण्याची खटपट
त्यांना करावी लागली नाही. बौध्द धम्म आयताच
त्यांना दिसत होता. त्या धम्मात प्रवेश करण्याचा सुलभ मार्ग त्यांनी स्वीकारला. आयुष्यभर
केलेल्या संघर्षाला पूर्णविराम दिला!
त्यांच्या समग्र जीवनाकडे दृष्टी टाकल्यास असे लक्षात येते की समाजपरिवर्तन हेच उदात्त ध्येय त्यांचे जीवितध्येय
होते. ते ध्येय डोळ्यांसमोर ठेऊनच निष्ठापूर्वक त्यांनी आयुष्याची वाटचाल केली. असे
जीवन जगणा-याची वाटचाल आपोआपच महामानवत्वाच्या दिशेने होते. चारचौघांपेक्षा आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत ह्या भावनेला बाबासाहेबांनी
आपला कबजा घेऊ दिला नाही. जे करणे आवश्यक होते ते निर्धारपूर्वक करत
राहिले. कुणाशी संघर्ष करण्याची वेळ आली
तेव्हा न डगमगता त्यांनी तो त्यांनी केला.
सामान्य उच्चशिक्षित माणसासारखे न जगता स्वीकारलेल्या
कार्यावर दृढ निष्ठा ठेवून आयुष् जगणारे लोक
नेहमीच दुर्मिळ असतात. बाबासाहेब हे गेल्या
शतकातले असे एक दुर्मिळ मानव होते. म्हणूनच ते महामानव ठरले! महामानव शतका शतकाच एखादाच होतो! जीवित कार्य संपले की ते निघून जातात ! त्यांच्यासारखा महामानव ह्यापुढे होणे नाही!!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment