Tuesday, June 1, 2021

संपादक राधाकृष्ण नार्वेकर

राधाकृष्ण नार्वेकरांची माझी पहिली भेट पत्रकार संघात भेट झाली. ते नवाकाळचे वार्ताहर असताना!  ते नवाकाळचे वार्ताहर होते खरे, परंतु त्या काळात नवाकाळचे नाना मोने, मराठाचे मधुकर भावे आणि लोकसत्तेचे अशोक पडबिद्री ह्यांचा दबदबा होता. नवशक्तीचे चंदू देसाई आणि भालचंद्र मराठे ह्यांची महापालिका प्रेसरूममध्ये दादागिरी होती. मराठाचे ना. ग. मुसळे हे महापालिकेचे वार्ताहर होते. नार्वेकर आणि मुसळे ह्यांना बिचारेम्हणण्याइतके ते सालस होते! मुसळे ठाकूरद्वारला राहात. दुपारी जेवण आणि वामकुक्षी झाल्यावर ते पालिकेची बस पकडत. नार्वेकरना खास बीट नव्हता. पण महापालिकेच्या बातम्या त्यांच्याकडून अपेक्षित होत्या. नवाकाळचे  निळूभाऊ त्या काळात रिपोर्टिंग करत. हे सगळे मुद्दाम सांगण्याचे कारण असे की आम्ही पत्रकारितेत आलो तेव्हा आम्ही दोघे कुणीच नव्हते.  Many people are nobody; only few prople are somebody असे एक वाक्य मी ब्रिटिश काऊंसिलमधून आणलेल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत वाचले होते. ते वाक्य मला जितके लागू पडत होते तितकेच नार्वेकरांनाही लागू पडत होते. Both of us were nobody!

हे वाक्य मी एकदा धाडस करून पत्रकार संघात नार्वेकरांशी गप्पा मारताना सहज बोलून गेलो. नार्वेकरांनी माझ्या हातावर टाळी दिली. त्या दिवसापासून आमची दोघांची

जी मैत्री झाली ती शेवपर्यंत कायम राहिली. ते शाळेत शिक्षक होते. त्यांच्याकडे चांगली बीए बीएडची पदवी होती. माझ्याकडे बीएची पदवी होती. आम्ही पदवीधर असल्यामुळे नवाकाळ आणि मराठासारख्या लहान वृत्तपत्रात बाकीचे बिगरपदवीधर सहाकारी आम्हाला काहीच समजतनसत. आचार्य अत्रे, शिरीष पै, विश्वनाथ मोरे आणि मी एवढे ४-५ जण सोडले तर मराठाच्या संपादकवर्गात पदवीधर जवळपास नव्हतेच. ह्यांना काय पत्रकारिता जमणार’, असा आमच्याकडे पाहण्याचा सगळ्यांचा टिपिकल दृष्टीकोन होता.  तो बदलेल असे निदान मला तरी वाटत नव्हते. सकाळ पाळीत माझी ड्युटी ३ वाजता संपायची. ड्युटी संपली की घरी जाण्यापूर्वी मी पत्रकार संघात चक्कर टाकत असे. तेथे ब-याच ऑफ ड्युटी पत्रकारांची गाठ पडायची. नाना मोने, राजा केळकर, वसंत उपाध्ये, नार्वेकर, मोहन केळुस्कर आणि नार्वेकर ह्यांच्यापैकी कुणाची तरी हमखाल गाठ पडायची. कधी चंद्रकांत पुरंदर-यांचीही गाठ पडायची.

त्यांची चागली ओळख झाल्यावर एकदा ते चंद्रकांत पुरंद-यांकडे घरी आले. मी पुरंदरेंच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहात असल्याने  ते माझ्याकडेही आले. मी  सौ. झवरना पोहे करायला सांगताच नार्वेकर म्हणाले, ‘नको! नको! मी आताच पुरंद-यांकडे पोहे खाऊन आलोय्.

निदान चहा तरी घ्यावाच लागेलअसे मी सांगताच १० मिनटात चहाचा कप आमच्या पुढ्यात आला.  चहाचा एक एक घुटका घेत असताना आमच्या गप्पा रंगल्या. तासभर केव्हा निघून गेला ते कळले नाही. नंतर जेऊनच जा, अशी मी त्यांना विनंती केली. ती विनंतीही त्यांनी मान्य केली नाही. मीही लंच बॉक्स पॅक करून त्यांच्याबरोबर निघालो. आम्हा दोघांनाही बोरीबंदरला जायचे होते. विक्रोळी ते बोरीबंदर ह्या ४५ मिनटांच्या प्रवासात आमच्या गप्पांचा ओघ सुरूच होता. त्यात राज्याच्या राजकारणापासून ते ऑफिसमधल्या राजकारणापर्यंत अनेक विषय निघाले. गप्पा अगदी निखळ होत्या. कोणाबद्दल उलटसुलट बोलणं नाही की कोणाचाही अधिक्षेप नाही. फक्त निरूपद्रवी माहिती कथन एवढंच त्या गप्पांचं स्वरूप  होतं. माझ्याशी बोलताना ते एकदाही एकेरीवर आले नाही. माझ्याहून ते वयाने, अनुभवाने मोठे होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना एकेरीवर येण्याचा प्रश्नच नव्हता. एकेरीवर येऊन बोलत नसतील तर दोघात जवळीक आहे असा दृढ समज त्या काळात निदान पत्रकारांचा तरी होता. परंतु आमच्या मैत्रीत शिष्टाचार होता. जवळीकही होती.

अधुनमधून त्यांच्या माझ्या भेटी व्हायच्या पण अगदी कमी! मला चीफसबचं प्रमोशन मिळालं. नवाकाळ सोडून नार्वेकरही सकाळमध्ये गेले. थत्ते मुंबई आवृत्तीचे संपादक होते. पण त्यांचे पद निव्वळ नामधारी होते. वितरण, जाहिराती वगैरे मॅनेजमेंटची कामे ते जास्त बघत. आत्माराम सावंत आणि गडकरी ह्यांच्या काळात सकाळचा प्रोफेशनल वृत्तपत्र म्हणून नावलौकिक झाला. त्या प्रशस्त वृत्तपत्रीय वातावरणात सहाय्य्क संपादक ह्या नात्याने नार्वेकरांची कामगिरी सुरू झाली. नंतरच्या काळात नार्वेकरांची सकाळच्या संपादकपदी नेमणूक होणे क्रमप्राप्त होते. मॅनेजमेंटच्या विशिष्ट धोरणामुळे मलाही सर्व प्रकारची प्रमोशन्स मिळत गेली.

माझे मित्र प्रफुल्ला शेणई हे नोकरीअभावी अस्वस्थ होते. त्यांना लोकसत्तेत घ्यावे म्हणू मी वृत्तसंपादक कोकजेंकडे शब्द टाकला. कोकजेंनीही माझ्या शब्दाचा मान ठेवला. त्यांनी शेणईना भेटायला बोलावले.  ते पदवीधर नाहीत हे मी कोकजेंना आधीच सांगून टाकले होते. तरीही शेणईंना  त्यांनी कामावर बसवले. अर्धात नेमणूकपत्र वगैरे औपचारिकता  ते कशी काय पूर्ण करणार होते हे त्यांचे त्यांनाच माहित! शेवटी पदवी नाही ही बाब शेणईंना नडलीच. त्यांनी लोकसत्तेत कमावर येणे बंद केले. अर्थात कोकजेंनी शेणईंना व्हाऊचर पेमेंटमिळवून दिले. आठवड्याभरात शेणई पन्हा माझ्या घरी हजर.

सकाळमध्ये जागा आहे. तुम्ही नार्वेकरसाहेबांना फोन कराल काशेणई

माझी नार्वेकरांची ओळख आहे. पण माझ्याकडे त्यांचा घरचा फोन नंबर नाही. तुमच्याकडे आहे कामी

नाही. ठीक आहे. मी ऑफिसमध्ये गेल्यावर फोन करीनअसे मी  सांगितले. खरे तर. अशी कामे फोनवर होत नाहीत असा माझा अनुभव होता. पण त्या काळात मी उठून त्यांच्या ऑफिसमध्ये जाणे मला शक्य नव्हते. त्या काळात फोन करणेदेखील आजच्यासारखे सोपे नव्हते. ऑफिसला गेल्यावर दोनअडीचच्या सुमारास मी सकाळला फोन केला. नार्वेकर फोनवर येताच मी म्हणालो, प्रफुल्ल शेणई नावाचे माझा मित्र आहेत. त्यांच्या नावार एक कादंबरीही आहे. त्यांना नोकरीची गरज आहे. तुम्ही त्याला नोकरी दिली तर चांगल्या माणसाला मदत होईल.

त्या क्षणी नार्वेकर काही बोलले नाही. थोडावेळ थांबून ते म्हणाले, ठीक आहे.

त्यांचा आवाज मला का कोणास ठाऊक त्रासिक वाटला. नार्वेकर खरोखरच वैतागले का हा प्रश्न मला सतावत राहिला. अर्थात त्याचा काही उपयोग नव्हता. माझ्या तोंडून बाण तर सुटून गेला होता. शेवटी शेणईचं नशीब!असं स्वतःशी म्हणत मी कामाला लागलो. शेणईंचा फोन आला तेव्हा मी त्यांना एवढेच सांगितले की उद्या तुम्ही नार्वेकरांना भेटा. त्यानंतर नार्वेकरांना फोन करण्याचे मला धाडस झाले नाही. तिस-या दिवशी मला शेणईंनीच फोन केला,  नार्वेकरांनी मला नोकरी दिली.

मला आनंद झाला. नार्वेकरांनी माझ्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले तर! त्यानंतर नार्वेकरांचे आणि माझे एकदाही बोलणे झाले नाही. दरम्यानच्या काळात मी निवृत्त झालो. निवृत्त झाल्यावर तेही पत्रकार संघाच्या कामात रस घेऊ लागले. कुमार कदमनी मला ऑफर दिली की तुम्ही कोशाध्यक्ष म्हणून मला हवे आहात. मला निवडणुकीचे राजकारण जमणार नाही, असं कुमारना  मी सांगितले. ते माझ्याकडे लागले,’ असे सांगून त्यांनी मला फॉर्म भरण्याचा आदेश दिला. मी फॉर्म भरला. प्रचंड बहुमताने निवडून आलो. नार्वेकर विश्वस्त होते. कार्यकारिणीच्या बैठकीत पुन्हा नार्वेकरांची माझी गाठ पडू लागली. मिटिंगमध्ये मी चालू महिन्याचा जमाखर्चाचा हिशेब सादर करत असताना माझ्या लक्षात आले की नार्वेकर आणि कुसुम रानडे हे दोघे माझे सादरीकरण लक्षपूर्वक ऐकत आहेत. पुढील वर्षांचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या दिवशी मी मागील वर्षाचे बॅलन्सशीट काढून त्यावर सरसकट १० टक्के वाढ केली. माझे हे सूत्र सांगताच नार्वेकरांनी मला प्रश्न विचारला, १० टक्क्यांची फिगर तुम्ही कुठून काढली?

साधा मुद्दा आहे. दर वर्षी महागाईत वाढ होतेच. ती किती झाली ह्या तपशिलात जाण्यापेक्षा सरसकट १० टक्के वाढ मी गृहित धरतो! साधं टॅक्सीचं भाडे घ्या. घराहून निघून स्टेशनवर यायला तुम्ही गेल्या वर्षी किती भाडं देत होतांत? ह्या वर्षी किती भाडं देता?’

माझ्या ह्या उत्तरावर नार्वेकर खळाळून हसले. नार्वेकर का हसताहेत हे कुणाला कळले नाही. वर्षांतून एकदा लोणावळ्याला बैठक व्हायची. त्यावेळी त्यांना अन् मला सकाळी लवकर जाग यायची. आपण फिरायला जाऊ या का? असे मी त्यांना विचारताच ते तयार झाले. आम्ही दोघेही फिरायला गेलो. येता येता कॉर्नरवर फुल्ल चहा पीत असू. परत आल्यावर मात्र त्यांची दिनचर्या सुरू व्हायची. माझाही अंघोळ वगैरे कार्यक्रम सुरू व्हायचा!

अलीकडे त्यांची आणि माझी गाठ पडली ती मला पुरंदरे ट्रस्टचा पुरस्कार मिळाला तेव्हा वरळीतल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. कार्यक्रम संपल्यावर आपण  दोघेही टॅक्सीने जाऊ असे सांगताच ते म्हणाले, मला टप्प्याटप्प्याने घरी जायचे आहे. मी दादरला निघताना दोघांनी एकदा बाहेर एकत्र जेवायचा आमचा बेत ठरला. पण ह्या ना त्या कारणाने तो लांबणीवर पडत गेला. नंतर कोरोना निर्बंध सुरू झाले. शेवटी तो बेत कधीच प्रत्यक्षात आला नाही. फक्त फोनवर बोलणे व्हायचे तेवढेच. एकदा मी त्यांना म्हटले, करतो रहो मदिने की बात हकिकत में यही है जिनेकी बात!

त्यावर ते खळाळून हसले! आज कोरानाने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आले. त्यांच्या अनेक आठवणी मनात उसळल्या. माझ्या काळातला एक सुसंस्कृत संपादक तर निघून गेलाच; त्याहीपेक्षा माझा जवळचा मित्र निघून गेला!

रमेश झवर

          ज्येष्ठ पत्रकार 

No comments: