Tuesday, April 19, 2022

भोंगा आणि हनुमानचालिसा


कोणाचे हिंदूत्व
जहाल असा प्रश्न कुणाला विचारला तर राज ठाकरे ह्यांचेच हिंदूत्व  जहाल असे उत्तर हमखास दिले जाईल. मे महिन्यात येणा-या रमजान ईदपर्यंत जर मशिदीवरील भोंगे थांबले नाही तर मशिदीसमोरच धवनिक्षेपकावरून हुनमानचालिसा लावण्याची सनसनाटी घोषणा केली.  राज ठाकरे ह्यांच्या घोषणेची दखल घेतली गेली नसती तरच आश्चर्य वाटले असते. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, ठाकरे घराण्याचे कट्टर विरोधक नारायण राणे आणि इतर अनेकांच्या प्रतिक्रिया प्रसारमाध्यमातून भरभरून वाहू लागल्या आहेत. किंबहुना प्रतिक्रियांचा पूर आला पाहिजे अशी अपेक्षा तर राज ठाकरे ह्यांनी बालगली नसेल?  त्यांनी हनुमानाप्रमाणे दंड थोपटले आहेत. बरे, हनुमानचालिसाऐवजी त्यांनी मारूती स्त्रोत्र निवडले असते तर कदाचित्‌ एवढे रण माजले नसते. बहुधा रण माजावे अशीच राज ठाकरे ह्यांची अपेक्षा असावी. त्यामुळे एक मात्र झाले. ते म्हणजे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांच्यात चर्चा होऊन भोंगे वाजवण्यासंबंधी सविस्तर नियमावली तयार करण्याचा आदेश पोलिस प्रमुखांना देण्यात आला.

लहान गावात छोटे दुकानदार, कामगार इत्यादींना कामावर येण्याजाण्यासाठी गावभर ऐकू येईल असा भोंगा वाजवण्याची प्रथा विसाव्या शतकाच्या पहिल्या ४-५ दशकात होती. त्या काळात मनगटी घड्याळे फारच कमी जणांकडे होती. त्यामुळे कामावर जाण्याची वेळ झाली आणि घरी परत जाण्याची वेळ झाली हे सर्वांना कळावे म्हणून भोंगा वाजवण्याची पध्दत होती. मंदिरात जाणा-या हिंदूसाठी अशा प्रकारचे नित्यनैमत्तिक मात्र कधीच नव्हते. त्याला कारणही आहे. कार्तिक मास, दिवाळी-दसरा,  पाडवा वगैरे दिवशी भाविक हिंदू देवळात त्यांच्या त्यांच्या सोयीने जात होते. देवापेक्षा  पुजा-याला दक्षिणा देण्याची रीत आपोआपच अस्तित्वात आली होती. दक्षिणेची सक्ती नव्हती. तरीही श्रीमंतांकडून एखाद रुपया आणि गरिबांकडून अधेली अशी दक्षिणा हमखास मिळत असे. पुजा-यांकडूनही दक्षिणेनुसार प्रसादही दिला जाई. अर्थात हा तक्रारीचा विषय कधीच झाली नाही.  बहुतेक मंदिरे रामाची, बालाजींची  किंवा लक्ष्मीनारायणाची होती. मंदिरात मारूती किंवा गरूडाची मूर्ती हमखास होती. आजही देवळे आहेत. विशेष उत्सव किंवा सणासुदीचा दिवस असल्यास देवळातर्फे उत्सवही होत असत. उत्सवाच्या दिवशी  दर्शऩासाठी जाणा-यांची गर्दी असायची. आजही गर्दी होतेच. उलट दरवर्षी ती वाढतच चालली आहे. जत्रा वगळता कुठेही चेंगराचेंगरी होत नाही. चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याच्या बातम्यांची आजच्या काळातही हेडलाईन’ होते. मात्र, चेंगराचेंगरीत ठार झालेल्यांचे किंवा जखमी झालेल्यांचे पुढे काय झाले ह्याची बातमी कधीच वाचायला मिळाल्या नाहीत.

मंदिरात सामुदायिक प्रार्थनेपेक्षा भागवत सप्ताह, रामायण वगैरेंवर कथा प्रवचन कीर्तनादि होतात. आळंदीसारख्या ठिकाणी ज्ञानेश्वरीची पारायणेही होतात. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातला काकडा तर दररोज चांगला एक तास चालतो. चैत्र, माघ, आषाढी आणि कार्तिकी ह्या वर्षातल्या चार वा-यांसाठी लाखो लोक पंढरपुरात दर्शनाला येतात. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीकार्तिकीला महापूजा होते. गाभा-यात जाऊन चरणस्पर्श घेण्याचे आपले भाग्य  नाही हे माहित असल्याने लाखो वारकरी कळसाचे दर्शन घेऊन विठ्ठलाचा निरोप घेतात. अर्थात राजकारणी राज ठाक-यांना वारीशी घेणेदेणे नाही. सरकारमध्ये नसल्याने महापूजेला ते किती वेळा गेले हे त्यांचे त्यांनाच माहित ! पण राज ठाकरेंनी पंढरपूरला जाऊन एकदा तरी आवर्जून काकडा दर्शन घ्यावे. असो. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा साकार झाल्याखेरीज राहणार नाही.

राज ठाकरे ह्यांनी एकदा तरी सांप्रदायिकाप्रमाणे दर्शन घेऊन बघावे. तसे ते त्यांनी घेतले तर भोंगा, हनुमानचालिसा वगैरेची भाषा त्यांनी कलीच नसती. राजकारण करायचे तर सकाळी लौकर उठण्याचा सल्ला त्यांनी मागे एकदा शरद पावरांनी दिला होता. तो सल्ला त्यांनी कितपत मानला असेल हे कळण्यास मार्ग नाही. जाणू घेण्याची गरजही नाही. मातोश्रीविरूद्ध बंड पुकारल्यानंतर पहिल्या खेपेस त्यांना मोठेच यश मिळाले होते. हळुहळू विधानसभेतले त्यांचे संख्याबळ घटत गेले. ह्याचाच अर्थ त्यांची राजकीय ताकद खच्ची झाली. ती वाढवण्यासाठी आता ते बहुधा भाजपाबरोबर युती करण्यास निघाले असावे. तूर्त मुंबई महापालिकेची निवडणूक नंतर २०२४ मध्ये येणारी लोकसभा निवडणुकीवर त्यांना नजर ठेवणे भागच आहे. त्यासाठी भाजपाबरोबर समझौता करण्याचे पाऊल त्यांनी टाकले असावे.  दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे ह्यांचे महा विकास आघाडी सरकार पडले तर सोन्याहून पिवळे! राजकारणात कधी कधी कर्तृत्वापेक्षा संधी महत्त्वाची ठरते. मशिदीवरील भोंगाच्या निमित्ताने त्यांना संधी मिळाली आहे.

ईद जवळ येऊन ठेपली आहे. ईदका चाँद’कडे लक्ष ठेऊन त्यांनी भोंगा आणि हनुमान चालिसाचा विषय काढला. आता पाहायचे मारूतीराया राज ठाकरे ह्यांना पावतो की राज्यातल्या पोलिसांना ते !

रमेश झवर

No comments: