उद्गीर येथे भरलेल्या ९५ व्या साहित्य संमेलानात संमेलनाध्यक्ष भारत सासणे ह्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ब्युगूल वाजवून २०१४ पासून देशात सुरू झालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संकोचाची प्रक्रिया सुरू करणा-या बुरसटलेल्या विचारसरणीच्या सत्ताधा-यांना खणखणीत इशारा दिला! संमेलनाचे उध्दघाटक ज्येष्ठ नेते शरद पवार आणि कोकणी साहित्यिक दामोदर मावजो ह्या दोघांनी केलेल्या भाषणांचाच मांजा जसा होता तसाच मांजा सासणे ह्यांच्या भाषणाचाही होता. देश छद्मबुध्दी विध्यवंसकाच्या ताब्यात गेला असे सासणे ह्यांनी सांगितले. वास्तविक पुण्यामुंबईच्या थोर संपादकांकडून जे अभिप्रेत होते ते सासणे ह्यांनी केलेल्या भाषणाने साध्य झाले !
भारत हा बहुभाषक देश आहे. परंतु साहित्य संमेलन भरवण्याचा पायंडा फक्त मराठीनेच
पाडला आहे. आता तर त्याचे रूपान्तर एक विशाल परंपरेत झाले आहे. साहजिकच ह्या संमेलनाचे
अध्यक्षपद आणि संमेनाध्यक्षपदावरून त्यांनी केलेले भाषण ह्याला ’महाराष्ट्र कारणा’त
अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठी साहित्यिक इंग्रजी लेखकांपेक्षा गरीब आहेत.
त्याची लेखकांना अधुनमधून खंत वाटत असली तरी ती त्यांनी खासगी ठेवली आहे ; तिचे त्यांनी
सार्वजनकीकरण कधीच केले नाही. ४० पैशांच्या मोबदल्यावर फेसबुक आणि व्हाटस्अपवर सत्ताधा-यांना
हव्या तशा पोस्ट लिहून देण्याच्या ह्या काळात मराठी साहित्यिकांनी स्वत:चे हसे करून
घेतले नाही. सत्ताधा-यांना साहित्यिकांनी मदत करू नये असे मुळीच नाही. परंतु सत्ताधा-यांना
मदत करताना त्यांनी आपले स्वत्व जपणे आवशअयक आहे. स्वतःचे विचार जपणे अपेक्षित आहे.
वसंत सबनीस, मधु मंगेश कर्णिक, दिवाकर गंधे ह्यांनी मंत्र्यांची भाषणे लिहली. त्यामुळे
मंत्र्यांचेही नाव झाले. ह्या लेखकांचेही नाव झाले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना
त्यांच्या भाषणात हटकून येणारा ‘माणूसकीचा
मुद्दा’ त्यांचा स्वतःचा की मधु मंगेश कर्णिकांचा ह्याची चर्चा त्या काळात मंत्र्यालयाचा
लॉबीत चालत असे !
साहित्यिकांनी कोणत्याही विचारधारेला बांधील नसावे, कारण
ती मतप्रणाली बुध्दिभेद करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी ठरू शकते ह्या सासणे ह्यांच्या मताशी
कोण सहमत होणार नाही? साहित्यिकांनी राज्यकर्त्यंबरोबर समान अंतर राखून वारले पाहिजे.
राजकीय आणि सांसककृतिक घटनांकडे त्रयस्थपणे पाहावे ही सासणे ह्यांनी व्यक्त केलेली
अपेक्षा रास्तच आहे. आजच्या सत्ताधा-यांकडे कुणीही साहित्यिक ढुंकून पाहायला तयार नाही.
सत्तेवर आल्या आल्या त्यांनी ते ज्या पठडीतून आले त्या पठडीतली घोकंपट्टी सुरू केली.
अजूनही त्या घोकंपट्टीतून बाहेर यायला ते तयार नाही. बरे. ते स्वतःशी प्रामाणिक आहेत
का? तसेही नाही. लोकानुवर्ती शासनाचा मोहरा
त्यांनी विशिष्ट उद्योगांना मदत करण्यासाठी फिरवला. हे न कळण्याइतके साहित्यिक, विचारवंत
मूर्ख नाहीत ! काही स्वार्थी विचारवंत त्यांच्या जवळ गेले असतील. मुठभर जजेस आणि आयएएस
अधिकारी त्यांच्या जवळ गेले असतील. जजेसनी सत्ताधा-यांना अनुकूल निकाल दिले असतील.
त्याबद्दल त्यांना बक्षीसेही मिळाली असतील. मराठी साहित्यिक मात्र त्यांच्याकडे फिरकल्याचे
चित्र काही महाराष्ट्रात दिसले नाही. हे महाराष्ट्राचे सुदैव! सासणेंच्या भाषणात मपाराष्ट्राच्या
विचारसरणेचे प्रतिबिंब पडले आहे. त्यांच्या भाषणात स्पष्टोक्ती असली तरी विखार नाही.
प्रामाणिकपणाच्या कसोटीवर त्यांचे भाषण पुरेपूर उतरणारे आहे.
साहित्य संमेलनाध्यक्षांच्या
भाषणाचा उपयोग काय असा सवाल नेहमीच उपस्थित केला जातो. ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी
आहे. परंतु साहित्यिक ‘ॲक्टिव्हिस्ट’ नसतात हे लक्षात ठेवले पाहिजे.
त्यांनी व्यक्त केलेले विचार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हळुहळू झिरपतात. कधी कधी विचार
झिरपण्याला एकदोन पिढ्या जाव्या लागतात. साधे
प्रेमविवाहाचे उदाहरण घेतले तरी हे सहज लक्षात येते. एके काळी प्रेमविवाह फक्त कथा
कादंब-यात दिसत होते. आता ते समाजात प्रत्यक्ष दिसू लागले आहेत. सासणे ह्यांची मते
साहित्यिकात, कलावंतात नक्कीच झिरपतील. हळुहळू ती सामान्य लोकांच्या मनातही झिरपतील.
एकाच वेळी ती ॲक्टिव्हिस्ट आणि घरात आरामखुर्चीवर विसावलेल्या
लोकात झिरपली की क्रांती घडू शकते. ७२५ वर्षांपूर्वी लिहलेली ज्ञानेश्वरी हे ह्याचे
उत्तम उदाहरण आहे. शास्त्रीपंडितांची मक्तेदारी मोडून काढून ज्ञानेश्वरांनी ब्रह्मविद्येचा
सुकाळ केला. चालू काळात सत्ताधा-याशी विशिष्ट
हितंसंबंध बाळगून असलेले लोक आहेतच. सुदैवाने त्यात साहित्यिकांचा समावेश नाही. ज्याप्रमाणे
पु ल देशपांडे आणीबाणीच्या विरोधात उभे राहिले तसे कोणी सत्ताधा-यांच्या विरोधात उभे
राहिले नाही हे मात्र खरे आहे. मराठी साहित्यिकांचा
तो पिंडही नाही. साहित्य संमेलनाने सध्याच्या सत्ताधा-यांना पाठिंबा नाकारला आहे. किमान
तटस्थ राहण्याचा सल्ला सासणेंनी दिला आहे. तो योग्यच आहे. तटस्थ राहणे ह्याचा अर्थ
पर्ययाने विवेकबुध्दी सांभाळणे!
रमेश झवर
No comments:
Post a Comment