Saturday, March 29, 2014

यशाची खात्री, फक्त भाषणांतून!


भारतभर साजरा होणारा शिमग्याचा सण नुकताच संपला; पण त्याचे कवित्व मात्र अजून मागे उरले असून ते निवडणूक संपेपर्यंत संपेल असे वाटत नाही. लोकशाही राजकारणात निवडणुकीच्या काळात कोणी काय बोलावे ह्याला  धरंबद उरलेला नाही. मुंबई ही 'पेड न्यूज'ची राजधानी असल्याचे विधान निर्वाचन आयुक्त ब्रह्म ह्यांनी केले. आपण केलेले विधान अंगाशी आल्याचे लक्षात येताच त्यांनाही शरद पवारांप्रमाणे सारवासारव करावी लागली. मुंबई जर 'पेड न्यूज'ची राजधानी असेल तर पेड न्यूज छापून भ्रष्टाचार करणा-या उमेदवारांची निवडणूक रद्दबातल ठरवणे निर्वाचन आयोगाच्या हातात आहे! पण सध्या कृतीशूरांपेक्षा वाचाळतेचे वरदान लाभलेल्यांची संख्या वाढली आहे. खरे तर, अधिका-यांच्या वर्तुळातही ती संख्या वाढली नसली तरच नवल होते. निर्वाचन आयुक्त ब्रम्ह ह्यांच्या विधानामुळे ऐन निवडणुकीत ब्रह्मघोटाळा झाला नाही हे नशीब! लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी अनेकांच्या वाचाळतेला उधाण आले होते. ते उधाण वाढतच चालले आहे. तूर्तास तरी जास्तीत जास्त अकलेचे तारे कोण तोडू शकतो ह्यावरच राजकीय यशापयश ठरणार आहे. प्रत्येकजण विजयी वीरासारखा वावरू लागला असून फक्त मिरवणुका काढायचे ते बाकी राहिले आहे.
गेल्या वर्षी  सप्टेंबरमध्ये विशिष्ट दिवशी विशिष्ट मुहुर्तावर नरेंद्र मोदींच्या नावाची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करण्याचा सल्ला राजनाथ सिंग ह्यांना त्यांच्या ज्योतिष्याने दिला होता. अर्थात त्याआधी त्यांना उद्योगपतींचा कितपत पाठिंबा मिळतो हे उद्योगपतींच्या संघटनात त्यांचे भाषण आयोजित करून अजमावून पाहण्यात आले होते. आता तर जाहीर सभांतून नरेंद्र मोदींच्या वक्तृत्वाला उधाण आले असून भाजपाला बहुमत मिळाल्यात जमा आहे अशी हवा तयार करण्यात भाजपाला प्रचंड यश मिळाले आहे. अर्थात ह्यापूर्वीचे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्यावर भाजपाला कधीच मेहनत घ्यावी लागली नाही. ह्याचे कारण वाजपेयींचा स्वतःचा करिष्मा होता. तो करिष्मा लक्षात घेऊन लालकृष्ण अडवाणींनी आपणहूनच 'धाकटेपण' स्वीकारले आणि अटलबिहारी वाजपेयींबरोबर भाजपाचाही विजयाचा मार्ग प्रशस्त केला होता. पण वाजपेयींच्या वाट्याला जे भाग्य आले ते भाग्य नरेंद्र मोदींच्या वाट्याला आले नाही. उत्तरप्रदेशात मोदींच्या उमेदवारीने भाजपाचा 'राजकीय झेंडा' फडकावण्यासाठी तसेच त्यांना वाराणशीची हुकमी जागा देण्यासाठी भाजपाला आटापिटा करावा लागला. वाराणशीमधून नरेंद्र मोदी निवडून येतीलही. मात्र, त्या विजयाच्या अपरिहार्य दुष्परिणामातून भाजपाची सुटका नाही. गुजरातच्या मोदींच्या ताकदीचा उपयोग करून मुरलीमनोहर जोशी ह्यांच्याबरोबरच कलराज मिश्रा, लालजी टंडन वगैरे पक्षान्तर्गत शत्रूंचा काटा काढायचा आणि पंतप्रधानपदाकडे आपण स्वतः पद्धतशीर वाटचाल करायची असा राजनाथ सिंगांचा छुपा डाव असल्याचे उत्तरप्रदेशात बोलले जाते. अर्थात अशा गोष्टींना पुरावा नसतो. पण राजनीतिक शतरंजबाजीसाठी उत्तरप्रदेश प्रसिद्ध आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
सध्या देशभरात काँग्रेसला वातावरण अनुकूल नाही. जोपर्यंत निवडणुकीचा निकाला लागून जागेचा नक्की आकडा समजत नाही तोपर्यंत देशाच्या राजकीय परिस्थितीबद्दल भाकित करणे शक्य नाही. सध्या एकच धोरण आहे, ज्याने त्याने आपली गाजराची पुंगी तुतारी समजून वाजवायची! कोण मसूद! पण हे मसूद मोदींची खांडोळी करायला निघाले आहेत! कुठले तरी तिकीट मिळवणा-या नगमा ह्या अभिनेत्रीने तर कोणाच्या तरी मुस्काटीत देऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. नाही म्हणायला काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा प्रसारित केला. एक राहूल गांधी सोडले तर एकही वक्ता पक्षाच्या कार्यक्रमाबद्दल बोलताना दिसत नाही. मुद्देसूद वक्तव्य इतिहासजमा झालेलेच आहे. निवडणुकीच्या निकालानंतर बहुधा विकासाचे राजकारणही इतिहासजमा होईल! सध्या भाजपाच्या कार्यकर्त्यात राहूल गांधींचा उल्लेख 'पप्पू' असा एकेरी करण्यात येतो तर पी चिदंबरम ह्यांचा उल्लेख 'चिदू' असा केला जातो. लोकसंभाषणाची ही पातळी पाहता ह्यापुढील काळात 'इंटेलेजेन्सिया' वर्गाला काही काम राहील असे वाटत नाही.
तिकीट मिळाले नाही किंवा मतदारसंघ बदलल्याचे कारण देऊन 'अपक्ष' अमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा 'शिरस्ता' ह्याही निवडणुकीत दिसून आला. किंबहुना ह्या काटाकाटीलाच राजकारण संबोधण्याचा प्रघात मिडियीने रूढ केला आहे. मोदींच्या भाषणात गुजरातच्या धर्तीवर देशाचा विकास घडवून आणणण्याचा मुद्दा असला तरी त्याहीपेक्षा मावळत्या सरकारवर खुमासदार टीका करण्यावरच भर अधिक. राहूल गांधी ह्यांना त्यांचे मुद्दे मांडता येत नाही हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. ह्या सगळ्याचा परिणाम निवडणुकीच्या निकाल अधिक अस्थिरता निर्माण होण्याची भीती लोंबकळू लागली आहे. ह्याचा फायदा घेणा-या सर्वपक्षीय संधीसाधू पक्षान्तरांना ऊत आल्याचे चित्र दिसत आहे. राजीव गांधींच्या काळात पक्षान्तरविषय कायदा करण्यात आला होता. त्या कायद्यानुसार सभागृहातील पक्षाच्या एकूण सदस्यसंख्येच्या एकतृतियांश सभासदांनी पक्षान्तर केल्यास ते पक्षान्तर कायदेशीर मानले गेले होते. अशा तथाकथित कायदेशीर पक्षान्तरामुळे नरसिंह रावांनी आपले अल्पमतातले सरकार बहुमतात आणण्याची करामत केली होती. पण आता तशी वेळ येणार नाही! कारण सनसोहनसिंगांच्या नेतृवाखाली स्थापन झालेल्या काँग्रेसप्रणित आघाडीत जवळ जवळ पंचवीसच्यावर पक्ष सामील झाले होते. हे सगळे चिल्ल्रर पक्ष आता मोदींच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होण्यास सिद्ध झालेले आहेत. समजा, काँग्रेस किंवा भाजपा ह्यांच्याकडे सरकार स्थापन करण्याइतकाही आकडा गोळा झाला नाही तर 'तिसरी आघाडी' नामक राजकीय पक्षांचा आणखी एक गट आकारास येतोय्! गंमतीचा भाग भाजपा, काँग्रेस आणि तिसरी आघाडी ह्या तिन्ही 'राजकीय गटां'ना आपणच सरकार बनवू अशी खात्री वाटते! मात्र त्यांची फक्त भाषणातून व्यक्त होते, कृतीतून नाही. तिकीटवाटपातूनही नाही!



रमेश झवर                                      
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

No comments: