Wednesday, April 23, 2014

पंतप्रधान कोण?... जरा सबूर!


1952 ते 2009 ह्या काळात झालेल्या पंधरा लोकसभा निवडणुकांच्या इतिहासाचा धांडोळा घेण्याची गरज नाही. परंतु ह्या काळात भारतात संसदीय लोकशाही स्थिरावली ह्याचे श्रेय नेहरूपासून ते आजपर्यंतच्या सर्व नेत्यांना दिलेच पाहिजे. संसदीय लोकशाहीत पंतप्रधानपदाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतात तर हे महत्त्व इतके वाढले आहे की त्याला विभूतीपूजेचे स्वरूप आले. अमेरिकेच्या अध्यक्षीय लोकशाहीत अध्यक्षपदाचे मह्त्त्व जितके त्यापेक्षा कितीतरी महत्त्व भारतात पंतप्रधानपदाला प्राप्त झाले. ते कां प्राप्त झाले? संसदेत बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानपद देण्याची घटनात्मक तरतुद आहे म्हणून? नाही. तशी प्रथा आहे म्हणून? नाही. केवळ घटनात्मक तरदुदीच्या जोरावर पंतप्रधानपद हे प्रचंड सत्तेचे केंद्र तयार करता येणे शक्यच नाही. पहिले पंतप्रधान पं जवाहरलाल नेहरू चांगले तीन टर्म पंतप्रधानापदावर राहिले. त्याचे साधे कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सामान्य माणसांना तर भुरळ पडलीच; खेरीज त्यांच्या विरोधकांनाही त्यांचा करिष्मा मान्य करावा लागला. त्यांच्या काळात कम्युनिस्ट पक्ष निर्विष झाला. भांडवलदारांना नेहरूंबद्दल आशा वाटू लागली. ‘भांडवलदारधार्जिणे’ म्हणून समाजवाद्यांनी तर ‘मुस्लिमधार्जिणे’ म्हणून हिंदू संघटनांनी मात्र नेहरूंना कायम विरोध केला.तटस्थेच्या धोरणाचा नेहरूंनी पुरस्कार केल्यामुळे जागतिक राजकारणावर त्यांची स्वतःची अशी वेगळी छाप पडली. रशिया-अमेरिका ह्यांच्यात चालू असलेल्या शीतयुद्धाची झळ भारताला बसली नाही असे नाही. पण नेहरूंच्या ध्येयवादामुळे त्यावर देशाला मात करता आली. विचारवंतात नेहरू टवाळीचा विषय झाले तरी देशाच्या औद्योगिक आणि कृषि धोरणाचा पाया त्यांनी घातला हे त्यांनाही नाकारता येत नाही. पंचवार्षिक योजनेच्या मार्फत त्यांनी देशाला स्वप्ने पाहायला शिकवले, आश्वस्त केले. त्यांच्या हयातीत नेहरूचा वारस कोण अशी पृच्छा सुरू झाली. नेहरू हे कितीही दूरदृष्टीचे असले तरी इंदिराजींना आपला वारस नेमण्यास त्यांनी नकार दिला. उण्यापु-या 17 वर्षांच्या कारकिर्दीत इंदिराजींना वारस नेमण्याचे त्यांच्या मनातही आले नाही. उलट, आपल्याला व्यक्तिशः मदत करण्यापलीकडे सत्तेच्या वा पक्षाच्या राजकारणात इंदिराजींनी पद घेऊ नये असेच त्यांना वाटत राहिले. कदाचित आपल्यावर पक्षपातीपणाचा आरोप येणार नाही ह्याची काळजी घेण्याचा त्यांचा सुप्त हेतू असावा.नेहरूंच्या निधनानंतर लालबहादूर शास्त्री पावणेदोन वर्षे पंतप्रधानपदावर राहिले. शास्त्रींनी इंदिराजींना मंत्रिमंडळात प्रवेश दिला. पण इंदिराजींना तुलनेने दुय्यम खाते दिले. वास्तविक नेहरूंच्या हयातीतच इंदिराजींची काँग्रेसच्या कार्यकारिणीत निवड झाली होती. ती नेहरूंना पसंत नव्हती. नेहरूंची तमा न बाळगता काँग्रेसमधल्या म्होरक्यांनी इंदिराजींना काँग्रेस अध्यक्षपदावर बसवण्याचा यशस्वी घाट घातलाच. इंदिराजींना परराष्ट्र खात्यांत रस होता. पण शास्त्रींनी ते त्यांना दिले नाही. प्राप्त परिस्थितीत खंत करत बसण्यापेक्षा इंदिराजी संधी मिळेल तेव्हा त्या देशान्तर्गत दौरे करत राहिल्या. प्रत्येक दौ-यात त्या पंतप्रधान असल्याच्या आविर्भावात वावरल्या! ह्याच काळात देशाचे सर्वोच्च पद आपल्याला मिळावे अशी त्यांच्या मनात भावना निर्माण झाली असावी.शास्त्रींच्या निधनानंतर इंदिराजींनी पंतप्रधानपदावर झडप घातली असे म्हटले तरी अयोग्य ठरणार नाही. मोरारजींचा त्यांनी नेतेपदाच्या निवडणुकीत सरळ सरळ पराभव केला. कामराज हे अल्पशिक्षित! त्यांचे नाव बाजूला पडले. मोरारजींना इंदिराजींच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपदावर समाधान मानाले लागले. कामराज इंदिराजींच्या बाजूला वळले. निजलिंगप्पा, मोरारजी, स. का. पाटील. चव्हाण इत्यादि म्होरक्यांना काँग्रेसमधून बाजूला सारून पक्षाची सूत्रे इंदिराजींनी हातात घेतली. संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा आणि बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा धाडसी निर्णय घेऊन काँग्रेस सरकारचेही धोरण लोकाभिमुख ठेवण्यात यश मिळवले. इंदिराजींनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. बांगला देश मुक्तीत सक्रीय वाटा उचलला. आणीबाणीनंतर आलेल्या जनता पक्षाच्या राजवटीची दोन वर्षे वगळता त्यांच्याकडे सातत्याने 11 वर्षे सत्ता टिकली. त्यानंतर दोन वर्षांच्या आत त्या पुन्हा सत्तेवर आल्या.दुस-यांदा इंदिराजींना मिळालेले पंतप्रधानपद त्यांच्या हत्त्येमुळे चार वर्षात संपुष्टात आले. त्यांच्या अचानक झालेल्या हत्येमुळे मंत्रिमंडळात अजिबात उमेदवारी न करता राजीव गांधींना पंतप्रधानपद प्राप्त झाले. वास्तविक ह्यात घराणेशाहीचा संबंध नव्हता. पण विरोधकांना आयती संधी मिळाली. काँग्रेस पक्षाचे सेक्रेटरी जनरल हे विशेष पद राजीवजींनी समर्थपणे हाताळताना प्राप्त केलेल्या अनुभवाचा फायदा पंतप्रनपदावर काम करताना त्यांना उपयोगी पडला असेल हे नाकारता येणार नाही. देशात संगणक युग अवतरण्यास राजीव गांधींनी स्वीकारलेले धोरण कारणीभूत ठरले. सॅम पित्रोदाच्या मदतीने त्यांनी टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडवून आणली. भारताचे भाग्य बदलण्यास त्यांचे हे धोरण कारणीभूत ठरले.त्यांच्यावर करण्यात आलोला बोफोर्स भ्रष्टाचाराच्या आरोप सिद्ध होऊ शकला नाही. पण सत्ता गमावण्याची ‘राजकीय शिक्षा’ त्यांना भोगावी लागली. विश्वनाथ प्रतापसिंग ह्यांना पंतप्रधानपद प्राप्त झाले खरे. पण मंडल आयोगाच्या अहवालाच्या शिफारशींची अमलबजावणी करण्याच्या त्यांच्या अव्यवहार्य निर्णयामुळे त्यांना पंतप्रधानपद अल्प काळात सोडावे लागले. ह्या दरम्यान निवडणूक दौ-यातच राजीव गांधींची हत्त्या झाली. इंदिराजींप्रमाणेच राजीव गांधींचा काळ येण्यापूर्वीच खंडित झाला! राजीव गांधींच्या निर्घृण हत्त्येमुळे निर्माण झालेल्या ट्रॉमिटिक परिस्थितीमुळे सोनिया गांधींना लगेच सत्तेच्या राजकारणात येणे शक्यच नसावे. राजीव गांधींच्या मृत्यूमुळे सोनिया गांधी, राहूल आणि प्रियांका ह्या तिघांच्या कुटुंबावर जो आघात झाला तो पाहता राजकारणात येण्याचा विचारही सोनिया गांधींच्या मनाला शिवलाही नसेल. म्हणूनच नरसिंह रावांसारखा स्कॉलर परंतु धुरंधर राजकारणी पंतप्रधानपदासाठी लायक ठरला. दाक्षिणात्य असलेल्या, नेहरूंच्या कथित घराणेशाहीशी दूरान्वयानेही संबंध नसलेल्या नरसिंहरावांसारख्या धुरंधर राजकारण्यास पंतप्रधानपदावर बसवून आपल्या लोकशाहीने परिपक्वतेचा नवा मानदंड निर्माण केला. नरसिंह रावांनीही मनोमहनसिंगाच्या मदतीने भारतीय अर्थव्यवस्थेचा मोहरा फिरवून देशात मन्वतंर घडवून आणले.पण दुर्दैवाने नरसिंह रावांची आणि काँग्रेसची पाठ सोडली नाही. त्यांच्यावर आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भारताची जगभर नाचक्की झाली. अखेर कोर्टाने त्यांना दोषमुक्त केले तरी न्यायालयीन कोठडी काही त्यांना चुकली नाही. सूडाचे राजकारण म्हणतात ते हे असे. अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन ह्यांच्याविरूद्ध इंपीचमेंट प्रोसेडिंग येऊनही अमेरिकन राष्ट्राने त्यांना क्षमा केली होती. पण जगातले सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणवणा-या भारताने नरसिंह रावांना क्षमा केली नाही. उठसूट क्षमेचा उद्घोष करणा-या आणि महाभारताचे दाखले देणा-या भारताला हे शोभले नाही.नरसिंह रावांच्या कारकिर्दीत विश्वहिंदू संघटनेच्या कार्यकर्त्याने कथित रामजन्मभूमीवरील बाबरी मशीद उद्ध्वस्त करून टाकली. रामजन्मभूमीवर राममंदिर तर बांधता आले नाही. पण भाजपाला सत्तेची फळे चाखायला मिळाली. देशात जातीय दंगलींच्या जोडीने अतिरेकी कारवायांनाही मोठ्या प्रमाणावर सुरूवात झाली! पंतप्रधानपदाचे उमेदवार अटलबिहारी वाजपेयीच असतील अशी निःसंदिग्ध घोषणा लालकृष्ण आडवाणींनी केल्यामुळेच भाजपाला सत्तेचा सोपान दिसला. वाजपेयी ह्यांना पहिल्यांदाच मिळालेल्या पंतप्रधानपदाचे बारसे झाले नाही तोच भाजपाप्रणित आघाडी सरकारचे ‘तेरावे’ करण्याची पाळी आली! त्यानंतर पंतप्रधान झालेल्या देवेगौडा, इंदरकुमार गुजराल ह्यांच्या सरकारांच्या नावांचा इतिहासाला हमखास विसर पडेल! हीच अवस्था इंदिराजींच्या नंतर सहा महिन्यांसाठी पंतप्रधानपद पटकावणा-या चरणसिंगांची आहे. पटावरील प्याद्याप्रमाणे पुढे सरकणा-या चंद्रशेखरांना पंतप्रधानपद मिळाले. पण त्यांचेही कोणालाही स्मरण राहण्याचे कारण नाही. भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी ह्यांचे नाव मात्र इतिहासाला कधीच विसरता येणार नाही. ते 6 वर्षे 64 दिवस पंतप्रधानपदावर राहिले. पण ह्या पदाची गरिमा त्यांनी कधी ढळू दिली नाही. एके काळी नेहरूंचे टीकाकार म्हणून वावरलेल्या वाजपेयींना शेवटी शेवटी असे वाटू लागले होते की लोकांनी त्यांची तुलना नेहरूंशी करावी! पण भाजपाला सत्तेच्या माध्यमातून देशाची सेवा करण्याची संधी वाजपेयी आणि आडवाणी ह्यांच्यामुळेच मिळू शकली.आता नरेंद्र मोदी आणि राहूल गांधी हे दोघे आमनेसामने उभे ठाकले आहेत. प्रशासनाला वळण लावण्याचे कौशल्य कोणाकडे अधिक एवढाच मुद्दा आहे. मनोमोहनसिंग हे एके काळचे प्रशासक. पण 10 वर्षांच्या कर्तृत्वशून्य कारभारामुळे त्यांचे सरकार भ्रष्टाचाराच्या वावटळीत सापडले. काँग्रेससह त्यांनी स्वतःचे हसे करून घेतले. काँग्रेसकडे भाजपाच्या तुलनेने पैसा आणि प्रचाराचा जोर कमी आहे. निवडणुकीची सहावी फेरी संपली आहे. अजूनही राहूल गांधींच्या भाषणात म्हणावी तशी ‘सुधारणा’ दिसली नाही. ह्याउलट नरेंद्र मोदींचे आहे. सुरूवातीस भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दिलेला भर कमी करून नरेंद्र मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर भर द्यायला सुरूवात केली आहे. वृत्तपत्रांना मुलाखती देताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगळे रूप समोर येत आहे. मोदींच्या तुलनेने राहूल गांधी खूपच कमी पडत आहेत. परस्पराविरूद्ध निवडणूक लढवणारे नेहमीच आपण विजयी होणार असा दावा करतात. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष त्याला अपवाद नाहीत. आताची निवडणूक हे ऐतिहासिक ‘द्यूतपर्व’ आहे. फासे कोणाच्या बाजूने पडतील हे कोणीच सांगू शकत नाही. पंतप्रधानपदाच्या इतिहासात भर घालण्याची संधी नरेंद्र मोदींना मिळते की राहूल गांधींना हे लौकरच दिसेल. जरा सबूर!रमेश झवर भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता

No comments: