लोकसभा निवडणुकीत झालेल्या संयुक्त जनता दलाच्या पराभवाची नैतिक
जबाबदारी स्वीकारून नितिशकुमारांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता
ही त्यांची पहिली चूक आणि मुख्यमंत्रीपदावर जीतन राम माँझी ह्यांना बसवले ही दुसरी
चूक! आपल्या हातून झालेल्या
ह्या दोन चुकांबद्दल संयुक्त जनता दलाचे नेते नितिशकुमार ह्यांना आता कितीही पश्चाताप
झाला तरी त्याचा काही उपयोग नाही. नितिशकुमार हे धुरंधर राजकारणी आहेत तर जीतन राम
माँझी हे बेरकी राजकारणी! लोकसभा निवडणुकीत मोदींनी उत्तर प्रदेशप्रमाणे
बिहारमध्येही आघाडी मारली होती. संयुक्त जनता दलास अवघ्या दोन जागा मिळाल्या
म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून नितिशकुमारांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद सोडण्याचे खरे
तर काहीच कारण नव्हते. पण नितिशकुमार पडले समाजवादी पठडीतले संवेदनशील राजकारणी.
बेरकी राजकारण्यांच्या दृष्टीने तद्दन मूर्ख राजकारणी! नितिशकुमारांच्या
मूर्खपणाचा फायदा घेऊन संधीसाधू माँझींनी बिहारची नौका गेल्या आठ महिन्यांच्या
काळात नरेंद्र मोदी-अमित शहांच्या दिशेने वळवली. माँझी आणि भाजपाचे सुशील मोदी
तोंडाने काहीही सांगत असले तरी बिहारमध्ये मुदतीपूर्वी जरा आधीच विधानसभा निवडणुका
घेऊन मोदींचे वारे बिहारच्या शिडात भरण्याची चाल माँझी आणि त्यांचे भाजपातले मित्र
खेळत आहेत.
बिहारमध्ये मुदतीआधी विधानसभा निवडणुका घेता येण्याची फारशी शक्यता नाही; पण किमान
राष्ट्रपती राजवट आणून मोदींसाठी अनुकूल हवा तयार करण्याचा अवसर मिळावा ह्या उद्देशाने
भाजपा आणि माँझींनी मिळून हा बखेडा सुरू केला आहे. बिहारमध्ये राजकीय अस्थिरता
निर्माण करून नितिशकुमारांच्या निष्ठावंत आमदारांना फोडल्याखेरीज विधानसभा
निवडणुकीत मोदींची हवा तयार होऊ शकणार नाही. ह्या कामी झाला तर माँझींचाच नरेंद्र
मोदींना उपयोग होऊ शकतो. त्यानुसार दिल्लीच्या इशारतीवरून नितिशकुमारांची अडगळ दूर
करण्याचा विडाच माँझीने उचलला असावा. महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर विधानसभा
निवडणुकीत भाजपाला बहुमत न मिळाल्याने मोदींचा घोडा निश्चतपणे रोखला गेला. दिल्लीत
‘आप’ला मिळालेल्या
यशामुळे तर ही वस्तुस्थिती अधोरेखित झाली. ह्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीत
कोणताही धोका पत्करण्याची भाजपाला इच्छा नाही हे समजण्यासारखे आहे.
देश काँग्रेसमुक्त केला हे खरे पण जोपर्यंत बहुतेक राज्ये त्या त्या
राज्यातल्या प्रभावी नेत्यांपासून मुक्त होत नाहीत तोपर्यंत भाजपाला राज्याराज्यात
बहुमत मिळणे नाही हा नवाच धडा भाजपाला शिकायला मिळाला. बिहारसाठी रणनीती ठरवताना हाच
हिशेब भाजपाने स्वतःशी मांडला असावा. त्या हिशेबात भाजपाचे हिशेबपटु अमित शहा
ह्यांनी माँझींचे इंटरेस्ट मिळवलेले असू शकतात. बिहारमध्ये भाजपाचा जोर वाढवण्यात माँझींनी
मदत करावी आणि त्या मोबदल्यात माँझींच्या गळ्यात नेतृत्वाची माळ असा काहीसा हिशेब माँझींच्या
गळ्यात उतवण्यात अमित-शहा-नरेंद्र मोदी ह्या जोडगोळीस यश आले असावे! गुजरातमध्ये केशुभाई पटेल ह्यांच्याविरूद्ध
शंकरसिंग वाघेला ह्यांनी पुकारलेल्या बंडास मोदींनी पाठिंबा दिला होता ह्याची आठवण
ह्या प्रसंगी झाल्याशिवाय राहात नाही.
बिहार विधानसभेत माँझींना आणि नितिशकुमारना आपापले बहुमत सिद्ध करण्याचा
आदेश देण्यामागचे कारण उघड आहे. बिहार विधानसभेतल्या नितिशवादी आमदारांना फूस लावण्याचा
उद्योग सुरू करण्याचा हिरवा बावटा माँझींना दाखवणे हे राज्यपालांमागच्या
आदेशामागचे छुपे कारण आहे. ते नितिशकुमार ह्यांच्या लक्षात आले नाही असे नाही. म्हणूनच
त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन झाल्यावर आपल्याला पाठिंबा देणा-या 130 आमदारांसह राष्ट्रपती भवनाला धडक दिली. विधानसभेतल्या आपल्या वर्चस्वाला
भाजपा-माँझींच्या राजकारणाने आव्हान दिल्यामुळे तूर्तास तरी राष्ट्रपतींकडे आपले
गा-हाणे मांडण्याखेरीज अन्य उपाय नितिशकुमारांकडे नाही.
लोकसभेत बहुमत मिळाले तरी जोपर्यंत निरनिराळ्या राज्यांतून भाजपाचे
जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले जात नाही तोपर्यंत संसदेत नरेंद्र मोदींचे
सरकार हेलकावे खात राहणार. म्हणूनच दोन्ही
सभागृहात बहुमत ही सध्या भाजपाची राजकीय गरज आहे. परंतु आतापर्यंत ज्या राज्यात विधानसभा
निवडणुका झाल्या त्या राज्यांपैकी हरयाणा आणि छत्तीसगड वगळता एकाही राज्यांत
भाजपाला बहुमत मिळवता आले नाही. त्यामुळे तथाकथित प्रादेशिक मित्रांकडून ‘महागडे सहकार्य’ घेण्याची पाळी
भाजपावर आली आहे. अपु-या बहुमतामुळे संसदेत उत्पन्न झालेला तिढा नरेंद्र मोदी
सरकारपुढील अडचणीत दर दिवशी वाढवतच राहणार हे उघड आहे.
ह्या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपाला एक राजकीय पक्ष ह्या नात्याने
आपल्याला हवी तशी व्यूहरचना करण्याची मोकळिक आहे हे मान्य केलेच पाहिजे. परंतु ही
मोकळिक घेताना भाजपाला सूक्तासूक्त मार्गांचा विवेक बाळगावा लागेल. तसा तो त्यांनी
बाळगला नाही तर चालेल; काँग्रेसवाल्यांनीदेखील सत्ता टिकवण्यासाठी
भल्याबु-या मार्गांचा अवलंब केलाच होता, असा युक्तिवाद हमखास केला जाईल. परंतु
ह्या युक्तिवादात तथ्य नाही. सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसने भल्याबु-या मार्गांचा
अवलंब केला त्या त्या वेळी त्यांना त्याची किमत मोजावी लागली आहे. किंमत मोजूनही काँग्रेसला
बसायचा तो फटका बसलाच. पूर्वी काँग्रेस नेत्यांना हा फटका व्यक्तिशः बसत होता. पण
गेल्या लोकसभा निवडणुकीत हा फटका सबंध काँग्रेस पक्षाला बसला. म्हणजेच काँग्रेसचे शस्त्र
काँग्रेसवरच बूमरँग झाले. भाजपाच्या बाबतीत मात्र वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे.
भाजपाला प्रथमच पूर्ण बहुमत मिळाले असून भाजपा हा काँग्रेसपेक्षा कितीतरी वेगळा
आहे असे भाजपाने जनतेला कृतीने दाखवून दिले नाही तर भाजपाची स्थिती अवघड
झाल्याशिवाय राहणार नाही. नितिशकुमारना माँझींच्या मदतीने संपवण्याची महत्त्वाकांक्षा
ठीक; परंतु ती सफल झाली
नाही तर मात्र जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रात भाजपाची ज्याप्रकारे कोंडी होऊन बसली
त्याप्रमाणे बिहारमध्येही होणार. बिहारबरोबर भाजपाचीही नौका हेलकावत राहणार!
रमेश झवर
भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment