Monday, February 9, 2015

मोदींचा ध्वज खाली!

दिल्ली विधानसभेची निवडणूक हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे सार्वमत नाही हे खरे. दिल्ली विधानसभेचा निकाल मोदींच्या नेतृत्वाचा ध्वज निश्चितपणे खाली आणणारा आहे. वास्तविक दिल्ली विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी स्वतः उतरण्याचे कारण नव्हते. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराची धुरा डॉ. हर्षवर्धन किंवा सुषमा स्वराज ह्यांच्याकडे सोपवली असती तरी चालले असते. भाजपाला दिल्ली विधानसभेत जो सणसणीत फटका बसला तो कदाचित् बसला नसता. निवडणूक मोहिमेची जबाबदारी प्रभातकुमार झा ह्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. प्रभातकुमार झा ह्यांची पार्श्वभूमी संघाची असून कोणतेही काम निरलसपणे करण्याचा त्यांचा स्वभाव! मध्यप्रदेशात दिग्विजयसिंग-अर्जुनसिंगांची सत्ता उखडून फेकून वल्लभ भवनवर भाजपाचा ध्वज फडकवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु अशा मुरब्बी निवडणूक व्यवस्थापकाला देशाच्या राजधानीत भाजपाला अपयश कसे आले?  त्यांचे हे वैयक्तिक अपयश आहे असे म्हणता येणार नाही.  मग अपयशाचा धनी कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच सध्या भाजपाचे चालकमालक आहेत हे उघड गुपित आहे. त्यामुळे दिल्लीच्या पराभवाची जबाबदारी निश्चित करायची झाली तर ह्या दोघांकडे बोट दाखवावे लागणार! लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपद नरेंद्र मोदींकडे जाणे स्वाभाविक होते. परंतु  ह्याचा अर्थ मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या हातातील अधिकार काढून घ्यावे असा नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात एक अरूण जेटली सोडले तर अन्य मंत्र्यांना काडीचाही अधिकार नाही असे चित्र निर्माण झाले. परदेश दौरे मोदी स्वतः करणार, महत्त्वाचे करारमदार स्वतः नजरेखालून घालणार, केंद्रीय मंत्रिमंडळातल्या इतर मंत्र्यांशी नरेंद्र मोदी सल्लामसलत करत असल्याचे चित्र देशाला दिसले नाही. सर्वत्र मोदी मोदी मोदी अशीच हवा तयार करण्यात आली. पक्षातल्या कोणाचीही अमित शहांशी प्रतिवाद करण्याची शामत नाही. कारण अमित शहा हे एकमेव नरेंद्र मोदींचे विश्वासू सहकारी!
नरेंद्र मोदींच्या आठ महिन्यांच्या कारभारात जे सुरू होते ते जनतेला रुचले नाही. हरयाणा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीतही राजकीय निर्णय घेताना प्रादेशिक भाजपा आणि मित्र पक्षांच्या नेत्यांना तुम्हाला काय कळते असाच नरेंद्र मोदी आणि अमित शहा ह्या जोडगोळीचा होता. विदेश दौरे असो वा वाराणशीमधली सभा नाहीतर एखादा रेडियो कार्यक्रम जिकडे तिकडे मोदी!
मोदींची कारभारशैली लोकांना पसंत आहे असा सोयिस्कर निष्कर्ष मोदी मंडळाने काढला. आपल्या नेतृत्वात काही खोट आहे हे विदारक सत्य मोदीप्रभावित भाजपाला मान्य नाही. सत्तेच्या अहंकारात भाजपा जवळ जवळ बुडाला! मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला सत्तेवर बसवल्यास दिल्लीतही असेच काहीसे घडणार अशी सार्थ भीती दिल्लीच्या जनतेला वाटली असेल तर त्यात दिल्लीच्या जनतेचे काही चुकले असे म्हणता येत नाही. दिल्लीच्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर दिसून आले. देशाचा जीडीपी किती टक्क्यांनी  वाढणार ह्याचे जनतेला काही घेणे देणे नाही. जीडीपी कितीही वाढला तरी माणसाचा संसार सुखाचा होत नाही ह्याचा अनुभव जनतेने आजवर अनेक वेळा घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यानंतर दहा वेळा पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करण्यात आले हे खरे. पण भाजीपाला, डाळींचे भाव आटोक्यात आले का? शाळा-कॉलेजातला प्रवेश सोपा झाला का?  पाणीपट्टी-वीज हे दैनंदिन जीवनात महाग का होत चालली आहे? हे प्रश्न जनता कोणाला विचारत नाही. कारण त्याचे उत्तर जनतेला ठाऊक आहे. लाचलुचपतीशिवाय सरकारी कार्यालयात कागद पुढे सरकत नाही हा जनतेचा अनुभव कायम आहे. दलाल गेला खरा. पण कामच होत नाही त्याचे काय? निव्वळ काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचून आणि भाजपाला खुर्चीवर बसवून फायदा काय असाच सवाल दिल्लीच्या जनतेला पडला नसेल काय? भाजपाकडे दिल्लीच्या निवडणपुकीसाठी उमेदवार नव्हते. म्हणून भाजापाने वाट्टेल त्याला भाजपात प्रवेश दिला. उमेदवारी दिली. सगळ्यात कहर म्हणजे किरण बेदींसाऱख्या महिला विदूषकाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवले!
भाजपाने आणि मिडियाने अरविंद केजरीवालांना कितीही मूर्ख ठरवले तरी दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडावण्याचे निवडणुकीत दिलेले आश्वासन त्यांनी चाळीस-पन्नास दिवसात पाळण्याचा प्रयत्न केला. ह्याही वेळी त्यांनी तीच आश्वासने दिली. मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला ही माझी चूक झाली ह्याचीही त्यांनी प्रांजळ कबुली दिली. दिल्लीच्या जनतेने त्यांची प्रांजळ कबुली मान्य केली. उदार मनाने त्यांना क्षमाही केली. काँग्रेस आणि भाजपाला अद्दल घडवल्याखेरीज त्यांची डोकी ठिकाणावर येणार नाही, असाही इशारा दिल्लीच्या जनतेने निवडणूक निकालाच्या माध्यामातून दिला आहे!
लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धडाका लावण्यासाठी मोदींना सहाय्य करणारे उद्योगपती कुठे गायब झाले?  ह्याचा अर्थ मोदींना केंद्रात सत्तेवर आणण्यापुरतेच त्यांना स्वारस्य होते. दिल्ली किंवा विधानसभा निवडणुका जिंकण्याचे तुमचे तुम्ही पाहा; राज्यांच्या निवडणुकीत जो काही पराक्रम दाखवायचा असेल तो तुम्हीच दाखवा, असा पवित्रा मोदी-मित्रांनी घेतला असावा. दिल्ली विधानसभेपूर्वी पूर्वी झालेल्या अन्य विधानसभा निवडणुकांत मोदींच्या भाजपाला पूर्वीसारखे यश मिळाले नाही ह्याचे हेही एक कारण असले पाहिजे. दिल्ली निवडणुकीचे वास्तव कितीही कटू असले तरी ते त्यांना स्वीकारावेच लागणार!

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता
www.rameshzawar.com

No comments: