Thursday, August 6, 2015

मोदींचा वचपा

काँग्रेसचे 25 खासदार निलंबित झाले तरी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे ह्या जोपर्यंत राजिनामा देत नाहीत तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू द्यायचे नाही ह्या निर्धारी भूमिकेत किंचितही बदल करण्यास काँग्रेस तयार नाही. ह्याउलट, शून्य तासात दडपून निवेदन करण्याचा प्रयत्न सुषमा स्वराजनी केला. तो प्रयत्न काँग्रेसने हाणून पाडला. सभागृह चालू न देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेस संसदेतल्या जवळ जवळ सर्व विरोधकांनी पाठिंबा दर्शवला आहे. अजून तरी ठप्प संसदीय कामकाज पूर्ववत करण्याच्या बाबतीत सत्ताधारी पक्षाला यश मिळाले नाही. संसदीय राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेले ललित मोदी हे परकीय चलन आणि मनीलाँडरिंग ह्या दोन्ही कायद्यात चांगलेच अडकलेले आहेत. आता तर मुंबईच्या सेशन्स कोर्टाने त्यांच्याविरूद्ध नुकतेच अजामीनपात्र वाँरंट जारी केल्यामुळे संसदीय राजकारणाची झालेली कोंडी फुटण्यास कितपत मदत होईल हे आज घडीला तरी सांगता येणार नाही.  मात्र, अमलबजावणी करण्यावाचून केंद्रीय गृहखात्याची सुटका नाही. मोदीविरूद्ध रेड कॉर्नर वाँरंटही जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याची बायको आजारी असल्यामुळे माणूसकीच्या भूमिकेतून आपण ललित मोदीस पोर्तुगालचा व्हिसा मिळवून देण्यास मदत केली अशी सुरुवातीला कबुली देणा-या सुषमा स्वराजनी आता पलटी खाल्ली आहे. ललित मोदीसाठी आपण मुळीच रदबदली केली नाही असा नवा खुलासा करण्याचा प्रयत्न सुषमा स्वराजनी केला. परंतु त्यांच्यावर कितपत विश्वास बसेल हा प्रश्नच आहे. ललित मोदीला मदत करताना सुषमा स्वराज कागदोपत्री गुंतलेल्या नाही एवढाच त्याचा अर्थ.
ललित मोदी प्रकरणाचा खडा न् खडा तपशील काँग्रेसला माहीत असला पाहिजे. म्हणूनच केवळ नशिबाने हाताशी आलेले हे प्रकरण सोडून द्यायला काँग्रेस तयार नाही. ललित मोदी हे वसुंधरा राजे ह्यांचे नुसतेच पाठिराखे नाही तर वसुंधरा राजे ह्यांचे चिरंजीव दुष्यंतसिंग ह्यांच्या अनेक उद्योगात भागीदार आहेत. राजस्थानमध्ये भाजपाचे राजकारण करताना वसुंधराराजे ह्यांच्या ज्या आर्थिक उलाढाली झाल्या असतील त्यात ललित मोदींचा सहभाग मोठा आहे. राजस्थान क्रिकेट असोशिएशनमध्ये पुरुषोत्तम रूंगठांची सद्दी संपुष्टात आणण्यासाठी ललित मोदींनी जे केले त्यात वसुंधराराजेंनी ललित मोदीला साथ दिली आहे. राजस्थानचे क्षेत्र अपुरे पडले म्हणून की काय ललित मोदी बीसीसीआमध्ये दाखल झाले. परंतु तेथे त्यांची गाठ श्रीनिवास ह्यांच्याशी पडली. तरीही ललित मोदीने बीसीसी आयमध्ये यथेच्छ गोंधळ घातलाच. विशेषतः आयपीएलचे फ्रँचायसी वाटप तर ललित मोदीला सोन्याची कोंबडी ठरली!
ललित मोदीचा गुन्हेगारी क्षेत्रातल्या उदयाचा इतिहास थक्क करणारा आहे. दिल्लीच्या मोदीग्रुपचे संस्थापक पुरणमल मोदी ह्यांचा पणतु असलेल्या ललित मोदीचे पाय शाळेच्या पाळण्यात असतानाच दिसून आले. सेंट जोसेफ शाळेत शिकत असताना वर्गात दांडी मारून हे बाळ वर्गशिक्षकाची परवानगी न घेताच सिनेमा पाहायला गेले. त्यामुळे त्याला दोन वर्षांसाठी शाळेतून काढून टाकण्यात आले होते. 1983 साली वडिलांनी त्याला शिकायला पाठवले. तिथे न्यूयॉर्कमध्ये पीस युनिव्हर्सिटी आणि नंतर नॉर्थ कॅरोलिनामधील ड्यूक युनिव्हर्सिटीत त्याने प्रवेश घेतला. त्या दोन्ही विद्यापीठातून त्याला पदवी प्राप्त करून घेता आली नाही हे विशेष. त्याचे कारणही ललित मोदीची गुन्हेगारी प्रवृत्ती हेच आहे. आपल्या दोन साथीदारांसह त्याने एका मॉटेलमध्ये 10 हजार डॉलर देऊन अर्धा किलो कोकेन खरेदी करण्याचा प्रयत्न केला.  मॉटेलवाल्याने त्याला कबुल केल्याप्रमाणे कोकेन न दिल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. ह्या प्रकरणातूनच त्याच्यावर कोकेन ट्रॅफिकच्या गुन्ह्याबद्दल खटला भरण्यात आला. त्या खटल्यात बार्गेन प्लीच्या मुद्द्यावरून त्याने दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेतून सुटका करून घेतली. अर्थात पाच वर्षे प्रोबेशन आणि 200 तास कम्युनिटी सर्व्हिसची सौम्य शिक्षा त्याला कोर्टाने दिली. अमेरिकेतल्या ह्या कर्तृत्वानंतर हे राजश्री भारतात आले. मागचे सगळे पुसून टाकण्यासाठी मोदी कुटुंबाने त्याचे वीरोचित स्वागत केले.
भारतात आल्यानंतर कुटुंबांच्या मालकीच्या गॉडफ्रे फिलिप्स इंडिया कंपनीचा ललित मोदी संचालक झाला.  दिल्लीतल्या वास्तव्यात ललित मोदी आईच्या मैत्रिणीच्या मुलीच्या प्रेमात पडला. पण मुलीच्या आईवडिलांनी लग्नास विरोध केल्यामुळे शेवटी मुंबईला येऊन तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर तो मुंबईत कायमचा स्थायिक झाला. 1991 पासून मुंबईत स्थयिक झाल्यानंतर मोदी एंटरटेनमेंट नेटवर्क नावाची कंपनी स्थापन करून त्याने केबल धंद्यात लुडबूड सुरू केली. वाल्ट डिस्ने पिक्चर्सबरोबर वितरण व्यवस्थेचा करार केला. ह्या करारानुसार इएसपीएन ह्या कंपनीची त्याला भारताची एजन्सी मिळाली. परंतु करारानुसार केबलवाल्यांकडून गोळा केलेले सगळेच्या सगळे पैसे त्याने मूळ कंपनीला कधीच दिले नाही. ह्या सगळ्या उपद्व्यापात त्याला नफा झाला नाही. वडिलांनाच त्याचा खर्च चालवावा लागत होता. नंतर वडिलांनी मोदी एंटरप्राईजेस ह्या कंपनीवर त्याची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. पण हे त्याचे फक्त पुनर्वसन होते.
अमेरिकेत स्पोर्टस् लीग दणक्यात पैसा कमावतात हे त्याला माहीत होते. त्याच धर्तीवर 50 षटकांचे सामने भरवण्याची कल्पना त्याने बीसीसीआयच्या गळ्यात उतरवली. त्यापूर्वी इंडियन क्रिकेट लीग लिमिटेड ही कंपनीही त्याने स्थापन केली. क्रिकेटमध्ये उलाढाली करता याव्यात म्हणून हिमाचल प्रदेश क्रिकेट असोशिएशनचे त्याने सदस्यत्व स्वीकारले. पण व्यवस्थापन समितीत घुसून असोशिएशनवर कब्जा मिळवण्यात त्याला यश आले नाही. म्हणून हिमाचल क्रिकेट असोशिएशनचा नाद सोडून तो पंजाब क्रिकेट असोशिएशनचा सदस्य झाला. तेथे मात्र तो व्हाईस प्रेसिंडेंट झाला.
राजस्थान क्रिकेट असोशिएशनमध्ये तो ललितकुमार नावाने अवतरला. वसुंधराराजेंशी संधान बांधून त्याने राजस्थान स्पोर्टस् कायदा संमत करून घेतला. त्या कायद्यामुळे राजस्थान क्रिकेट असोशिएशनच्या 66 जणाचा मतदानाचा हक्क रद्द झाला. त्या जोरावर त्याने अवघ्या एका मताने रूंगठांचा पराभव करून त्यांची सद्दी संपुष्टात आणली. तेथे अध्यक्ष झाल्यानंतर जयपूर सवाई मानसिंग स्टेडियमचे नूतनीकरण, क्रिकेट अकादमीची स्थापना इत्यादींवर त्याने भरपूर पैसा उधळला. त्यासाठी जाहिरातीचे स्पॉट विकून त्याने भरपूर पैसाही मिळवला. बीसीसीआयमध्ये त्याने फ्रॅचायसी प्रकरणातही कधी नियमबाह्य तर कधी नियमात बसवून चिकार उलाढाली केल्या. कमावलेला पैसा परदेशात पाठवून तेथे कंपन्या स्थापन करण्याचे मनसुबे त्याने रचले. त्यामुळेच तो आठ वेळा फेमाच्या आणि एकदोन वेळा मनी लाँडरिंग कायद्याच्या कचाट्यात सापडला. कोर्टाकडून त्याचा पासपोर्ट रद्द केला जाऊ नये म्हणून त्याने न्यायालयात वकिलांची फौज उभी केली. सुषमा स्वराज ह्यांच्या कन्या बांसुरी स्वराज ह्यांचादेखील वकिलांच्या फौजेत समावेश आहे.
ह्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला पेचात पकडण्याची संधी काँग्रेसला मिळेल ह्याची खुद्द काँग्रेसलाही कल्पना आली नसेल. स्पेक्ट्रम घोटाळा किंवा कोळसा घोटाळा इतके हे प्रकरण मोठे नाही, परंतु त्यात अर्थमंत्र्यालयाच्या अखत्यारीत येणारे सक्तवसुली संचालन गुंतलेले आहे. ललित मोदीविरूद्ध वेगवेगळी प्रकरणे काँग्रेसप्रणित आघाडी सरकारच्या काळात सुरू झाली आहेत. आता त्यात वसुंधरा राजे ह्यांची भागीदारी सिद्ध झाल्यास भाजपाला जोरदार झटका बसेल ह्यात शंका नाही. सुषमा स्वराज ह्या वसुंधराराजे ह्यांची मैत्रीण असल्यामुळे ललित मोदी प्रकरणाची झळ त्यांनाही पोचली आहे!  तूर्तास अपराध्याला मदत करण्याचा आरोप आला तर सुषमाजींवर येऊ शकतो. काँग्रेसलाही हे कळत नाही असे नाही. तरीही राकारणाच्या दृष्टीने काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे. कोळसा घोटाळ्याचे प्रकरण पंतप्रधान मनमोहनसिंगांवर शेकवण्याचा प्रयत्न करताना भाजापाने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. लोकसभा निवडणूक प्रचारात माँ बेटेकी सरकार अशीही खिल्ली मोदींनी उडवली होती. आता मोदींचा वचपा काढण्याची ही संधी काँग्रेस सहजासहजी कशी सोडून देणार?  सत्तेच्या राजकारणात राष्ट्रहिताचा विचार करायला एकही राजकीय पक्ष तयार नाही हेच ह्या प्रकरणावरूनही दिसून येते.

रमेश झवर
www.rameshzawar.com


No comments: