जगात हिंदूंची संख्या दोन अब्ज असली तरी दर बारा वर्षांनी अलाहाबादला
भरणा-या कुंभ मेऴ्यास आणि नाशिक येथे भरणा-या सिंहस्थ पर्वणीस जेवढ्या मोठ्या
संख्येने लोक हजेरी लावतात तेवढ्या मोठ्या संख्येने जगात कोणत्याही धार्मिक
मेळाव्यास कोठेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जमत नाही. विशेष म्हणजे कुंभमेळा
आणि सिंहस्थ पर्वणीची रीतसर निमंत्रणे कोणी कोणाला धाडत नाहीत. गुरु सिंह राशीत
आला की सिंहस्थ पर्वणी सुरू होते तर गुरु कुंभ राशीत आला की अलाहाबादेत कुंभ मेळा
सुरू होते. ह्या काळात विशिष्ट तिथींना देशभरातील तेरा आखाड्यांचे साधू त्यांच्या
लवाजम्यासह स्नानाला हजर होतात. विशिष्ट ग्रहयोग ज्या दिवशी जुळून येतो ते दिवस
शाही स्नानाचे दिवस जाहीर होतात. कुंभ मेळाव्यात आणि सिंहस्थ पर्वणीत
स्नानाव्यतिरिक्त कोणताही अजेंडा नाही. कोणत्याही प्रकारचे बौद्धिक आयोजित केले
जात नाही. ठरावही पास केले जात नाहीत.
अलीकडे निरनिराळ्या तेरा आखाड्यांची एक मध्यवर्ती
संघटना स्थापन झाली असली तरी त्यांच्या काँग्रेस वा भाजपा ह्यासारख्या राजकीय
पक्षांसारख्या विषयनियामक समितींच्या बैठका वगैरे भानगडी नाहीत. मेळाव्यात
सर्वांसाठी एकमेव कार्यक्रम असतो. दर्शन आणि गंगास्नान! साधुंच्या चरणांवर लोटांगण! ह्या एका
कार्यक्रमासाठी जी गर्दी उसळते त्या गर्दीचे नियोजन करता करता बड्या बड्या सरकारी
अधिका-यांना आणि कर्मचा-यांना अतोनात कष्ट उपसावे लागतात. सरकारी अधिका-यांखेरीज
त्या त्या परिसरातील सामाजिक संघटनांचे असंख्य कार्यकर्ते भाविकांची सेवा
करण्यासाठी अहोरात्र राबत असतात. मेळाव्यास उपस्थित राहणा-या हिंदूधर्मप्रेमी
जनसुदायांपुढे समाज आणि सेक्युलर शासनाला झुकावे लागते.
कुंभ मेळाच्या काळात अलाहाबाद आणि सिंहस्थ
पर्वणीच्या काळात नाशिक ह्या शहरातील रस्ते, वीज, साधूंच्या उतरण्यासाठी जागा,
रहदारी व्यवस्था वैद्यकीय मदत टेलिफोन वगैरे सोयी पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य
सरकारला मिळून करोडो रुपये खर्च करावे लागतात. नाशिक सिंहस्थ पर्वणीसाठी
ह्यावेळी 2300 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. ह्या रकमेतून नाशकात
गोदावरीवर सात घाट बांधण्यात आले असून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता चौपदरी करण्यात
आला आहे. अनेक रस्त्यावर प्रखर प्रकाशझोताचे दिवे लावण्यात आले आहेत. ठिकठिकाणी
पोलिस आणि शीघ्रकृती दलांच्या जवानांसाठी राहूट्या उभारण्यात आल्या आहेत. नाशिक
शहरात तात्पुरती आरोग्य केंद्रे उभारण्यात आली असून डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय
महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या मदतीने पोलिसांना प्रथमोपचाराचे शिक्षण
देण्यात आले. त्यांच्यासाठी प्रथमोपचारावर एक पुस्तिकाही तयार करून देण्यात आली.
सिंहस्थ पर्वणी संपली तरी गोदावरीवर करण्यात आलेल्या सोयी, रस्ते वगैरे लाभ
नाशिकच्या पदरात पडलेले असतील. गेल्या पन्नास वर्षांत सिंहस्थ पर्वणीनिमित्त नाशिक
शहराच्या सोयीसुविधात जी भर पडली त्यामुळे नाशिक हे महाराष्ट्रातले एक अत्यंत
प्रगत शहर होऊ शकले. नाशिक शहराची लोकसंख्या 15 लाखांवर गेली आहे. आज घडीला
नाशिकचा नंबर देशातल्या पहिल्या पन्नास शहरात लागतो. महाराष्ट्राचा हा अप्रत्यक्ष
फायदा म्हटला पाहिजे.
मेळाव्याप्रसंगी स्नानाला आधी कुणी जायचे ह्यावरून
अनेक वेळा आखाडे प्रमुखांत सशस्त्र चकमकी उसळल्या आहेत. त्या वेळी उच्च सरकारी
अधिका-यांना हस्तक्षेप करावा लागला आहे. शेवटी मिरवणुकीने स्नानाला जाण्याचा क्रम
निश्चित करण्यात आला. तेव्हापासून निदान ह्या मुद्द्यावरून तरी शांतता आहे.
बहुसंख्य आखाडे आदि शंकराचार्यांच्या काळात स्थापन झाले. नंतरच्या काळात नव्या
आखाड्यांची भर पडली आहे. आखाडे प्रमुखांच्या विचारसरणीवर हिंदू धर्म प्रवाहातील
शैव आणि वैष्णव मताची छाप पडली आहे. त्यानुसार काही आखाडे शैवपंथी आहेत तर काही
वैष्णवपंथी आहेत! सर्व आखाडे
संन्यासमार्गियांनी प्रवर्तित केले असले तरी त्यांच्या अनुययायांवर मात्र संन्यास
घेण्याची सक्ती नाही. आखाडे प्रमुखांचे मनोमीलन नसले तरी एकमेकांच्या संबंधात दुरावाही
नाही. आखाडे प्रमुखांची नियुक्ती आणि आखाड्यांचे प्रशासन ह्यासंबंधी लिखित
स्वरूपाची घटना नाही. आखाड्यातल्या अंतर्गत राजकारणास ऊत आल्याचीही खूप उदाहरणे
आहेत. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात उच्चतम धार्मिक मूल्ये कस्पटासमान मानली
गेली तरी राजकारण्यांना तेथे प्रवेश नाही. आखाड्यातील गुन्हेगारी स्वरूपाची
प्रकरणे स्थानिक पोलिसांना हाताळावी लागली तरी त्यात ढवळाढवळ पोलिस सहसा खपवून घेत
नाही.
आश्रमात आत्मज्ञानाची अनुभूती शिष्याला कशी प्राप्त
होईल ह्या दृष्टीने आखाडे प्रमुख झटत असतात. लक्षावधीत एखाद्या शिष्याला
आत्मानुभूती झाल्याचाही निर्वाळा शिष्यगण देतात! हीच प्रचिती सामान्य
भक्तगणास मिळावी हाच गंगास्नानाच्या निमित्ताने बारा वर्षांतून एकत्र जमण्याचा
हेतू आहे. एका कुंभ मेळ्यात योगानंदांना म्हणे त्यांचे परमगुरु बाबाजी ह्यांचे
दर्शन झाले होते. आध्यात्मिक प्रांतात गूढगम्य आत्मानुभूतीवर असंख्य पुस्तके
लिहीली गेली आहेत. कबीर-तुलसीदास किंवा ज्ञानेश्वर-तुकाराम ह्यांनी ह्या गूढवादावर
टीका केली नसली तरी त्याचा पुरस्कारही केला नाही. धोपट भक्तीमार्गाचाच उपदेश
त्यांनी समाजाला केला. बुद्धिवादी वर्गाने मात्र मेळाव्यात बोकाळलेल्या
अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार केला. अजूनही करत आहेत.
धर्माच्या मेळाव्यापायी सरकारला भुर्दंड का, असा
प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. परंतु हा खर्च करण्याचे बंधन सरकारवर आले ते
1950 आणि 1960च्या दशकांत न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निवाड्यांमुळे, मंत्रिमंडळांवर वेगवेगळ्या
समाजघटकांकडून आलेल्या दडपणांमुळे! धार्मिक मेळाव्यांमुळे सेक्युलॅरिझमची
अक्षरशः वाट लागली हे खरे आहे. ह्या संदर्भात एक बाब लक्षात घेणे जरूर आहे.
अमेरिकेत प्रचलित असलेला सेक्युलॅरिझम आणि भारतातला सेक्युलॅरिझम ह्यांत मूलतः फरक
आहे. लोकांच्या धार्मिक श्रद्धा आणि पूजाप्रार्थना पद्धतीबद्दल सरकारने कोणतीच
भूमिका घेण्याचे कारण नाही. सरकारकडून तटस्थ धोरणाची अपेक्षा आहे. अमेरिकन
सरकारचीही हीच भूमिका आहे. ह्याच भूमिकेतून न्यूयार्क शहरात नाताळच्या सणात
शहरातल्या एखाद्या चौकात ख्रिसमस ट्री उभा करण्यास तेथली महापालिका मदत देऊ शकत
नाही. परंतु भाविक ख्रिश्चनांनी ख्रिसमस ट्री उभारला तर त्याला मज्जावही करता येत
नाही. अशाच एक ख्रिसमस ट्रीचे उद्घाटन अध्यक्ष बुश ( सिनयर ) ह्यांनी केले
त्यावेळी त्यांच्याविरूद्ध गदारोळ उठला होता. सरकार सेक्युलर असले तर अध्यक्षांची
व्यक्तिशः ख्रिश्चानिटीवर श्रद्धा असल्यास त्यांना कोण हरकत घेणार? बुश ह्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत एका पाद्री महाराजांचा व्हाईट हाऊसमध्ये
वावर असल्याची वदंता त्या काळी अमेरिकेत पसरली होती.
सर्वोच्च न्यायालयात लोकांच्या प्रार्थनेचे स्वरूप
ठरवण्याचा न्यायालयांना अधिकार नाही असा युक्तिवाद करण्यात आला. वेगवेगळ्या
न्यायाधीशांनी वेगवेगळे रूलिंग दिल्यामुळे गोंधळाची स्थिती कायम आहे. 1954 साली
सिरूर मठ प्रकरणी न्या. बी के मुखर्जींनी असा निवाडा दिला की पूजाप्रार्थनेच्या
बाबतीत ज्या अत्यावश्यक बाबी समजल्या जातात त्यांचे स्वरूप बदलण्याचा कोणाला
अधिकार नाही; कारण तोच धर्माचा गाभा आहे.
हा मूलभूत गाभा, दर्गा कमिटी आणि नाथव्दारा मंदिर प्रकरणी समजून घेण्याच्या बाबतीत
न्या. गजेंद्रगडकर ह्यांनी गफलत केल्याचे न्या. मुखर्जींनी निकालपत्रात नमूद केले.
न्यायालयांचे निर्णय आणि सेक्युलरवाद्यांना अभिप्रेत असलेले तर्कशास्त्र
काँग्रेसच्या पुढा-यांनी केव्हाच धाब्यावर बसवले. भाजपा तर बोलून चालून हिंदूत्वाच्या
बाजूनेच आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, पंकजा मुंडे इत्यादि नेत्यांनी सिंहस्थ पर्वणीच्या ध्वजारोहण सोहळ्यास
उत्साहाने हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांना सोयीच्या दिवशी सिंहस्थ
स्नानाच्या दिवशी हजेरी लावणार आहेत. सोनिया गांधीं अलाहाबादला स्नानाला गेल्या
असता त्या विदेशी आहेत ह्या मुद्दायवरून काही कर्मठ मंडळींनी त्यांना स्नानास
मज्जाव केला. शेवटी डोक्यांवर तीर्थ शिंपडून त्यांचा ‘संक्षिप्त’ स्नान उरकण्याची युक्ती
त्यांच्या पाठिराख्यांनी शोधून काढली.
सिंहस्थ पुराणाबद्दल कोणाचे काहीही मत असले तरी
सिंहस्थ पर्वणी व्यापा-यांच्या दृष्टीने बूम पिरियड आहे. वर्षभरात सुमारे एक करोड
लोक नाशिकात येणार असल्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल तेथे निश्चितपणे होणार. हॉर्वर्ड विद्यापीठाने तर
कुंभ मेळ्याच्या आर्थिक उलाढालीचा अभ्यास करण्याचा प्रकल्प पूर्वीच राबवला आहे.
नाशिकचे कमिशनर प्रवीण गेडाम आणि त्यांच्या हाताखालचे लोकही खूश आहेत. सिंहस्थ
पर्वणीचे आव्हान यशस्वीरीत्या स्वीकारल्याचे श्रेय त्यांना अनायासे मिळणार आहे.
पोलिस यंत्रणा आणि तेथले डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थीही
खूश आहेत. कारण, सिंहस्थ पर्वणीत येणा-या साधूमहंतांची आरोग्यविषयक पाहणी करण्याचे
आणि ह्या पाहणीचे संशोधऩ करण्य़ाचे वसंतराव वैद्यकीय महाविद्यालयाने ठरवले आहे.
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment