Wednesday, August 19, 2015

पापदूषित राजकारण!

महाराष्ट्रात ब्राह्मण ब्राह्मणेतर हा वाद पूर्णतः गाडला गेला अशी समजूत होती. नव्हे तशी ती करूनही देण्यात येते. परंतु ती समजूत खरी नाही ह्याची प्रचिती सध्या येत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांना महाराष्ट्र सरकारने पुण्यभूषण पुरस्कार जाहीर करताच एकीकडे स्वतःला पुरोगामी म्हणवणा-या लेखकरावांचा पोटशूळ उठला तर दूसरीकडे संभाजींच्या नावाखाली स्थापन झालेल्या ब्रिगेडच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ह्या आगीत तेल ओतण्याचे राजकारण राष्ट्रवादीने केले. राष्ट्रवादीचे हे पापात्मक राजकारण अंगाशी येईल हे लक्षात येताच शरद पवारांनी नेहमीच्या स्टाईलने पुण्यभूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरेंना देण्यास विरोध नसल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री ब्राह्मण म्हणून पुण्यभूषण पुरस्कार ब्राह्मणाला. तोही शिवाजीमहाराजांना भटाळलेले दाखवणारे चित्रण करणा-या ब्राह्मणाला! हे अजब तर्कट राष्ट्रवादीतल्या कनिष्ठ परंतु बिनडोक नेत्यांना राजकारण करण्यास पुरेसे वाटले. परंतु फटाके फोडण्याचे हे राजकारण आपल्या नेत्यांची अडचणीचे ठरू शकेल हे काही कनिष्ठ नेत्यांच्या डोक्यात शिरलेले दिसत नाही.
पुण्यभूषण पुरस्कार प्रकरणी देवेंद्र फडणीस किंवा शिक्षणमंत्री तावडे अथवा उद्धव ठाकरे ह्यांपैकी कुणीही तोंड उघडले की फडणवीस सरकारपुढे अनायासे राजकीय पेच उभा राहील असा ह्या अर्धवट राजकारणपटुंचा तर्क होता. पण ह्या राजकारणामुळे केवळ जाणता राजाचे  लेखक, दिग्दर्शक आणि सादरकर्ते बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या प्रामाणिक शिवचरित्रकाराची बदनामी करत आहोत असे नाही तर पर्यायाने महाराष्ट्राचे दैवत शिवरायांचीही बदनामी होते हे त्यांच्या ध्यानात आले नाही. त्यांचे हे राजकारण पापात्मकच म्हणावे लागेल. शिवाजीमहाराज ह्यांना गोब्राह्मण प्रतिपालक हे बिरूद लावले हे खरे; पण ह्याचा अर्थ त्यांना बुरसटलेल्या हिंदूंचे राज्य स्थापन करायचे होते असा निश्चित नाही. त्यांच्या स्वराज्याला हिंदवी हे विशेषण लावण्यात येते, हिंदू स्वराज्य नाही! शिवकाळाकडे फ्रेंच राज्यक्रांतीनंतर उदयास आलेल्या आणि ब्रिटिश राजवटीनंतर स्थिर झालेल्या सद्यकालीन राजकीय कल्पनांचा चष्मा लावून पाहणे अडाणीपणाचे लक्षण आहे. पण बाबासाहेबांनी लिहीलेल्या शिवचरित्राचा हा खरा अर्थ त्यांच्या लक्षात येणे शक्य नाही.
शिवकाळात जाती असल्या तरी जातीयतेचे कंगोरे नव्हते.  त्या काळातले अर्थकारणही आजच्या इतके प्रगत नव्हते. तरीही स्वराज्याची स्थापना करण्यासाठी शिवाजीमहाराजांसारखा एका आदिलशाहीच्या नोकरीत असलेल्या जहागीरदाराचा सुपुत्र  परक्या प्रस्थापितांच्या राजवटीशी झुंज देण्यास उभा राहतो हा त्या काळाला अनुरूप राजकीय स्वातंत्र्याचा लढाच! विचार करणा-यांना शिवाजीमहाराजांचे द्रष्टेपण मान्य करायलाच हवे. परकीय आक्रमकांच्या ताब्यातले किल्ले शिवाजीमहाराजांनी हिसकावून घेतले. हिसकावून घेतलेल्या मुलुखात त्यांनी म-हाट्यांची सत्ता स्थापन केली. त्यांच्या सैन्यात आणि अष्टप्रधानात सर्व जातींची मंडऴी होती. ज्या काळात शिवाजीमहाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा उद्योग केला त्या काळात केवळ आणि केवळ धर्मप्रेरणांनाचा महत्त्व होते. अफगाण, अरबस्तान, इराण, आफ्रिका इत्यादी भागातून अनेक जण ससैन्य भारतात आले. त्यांचे आक्रमण देशात स्थिर झाले. केले. त्यामागे वैयक्तिक महत्त्वाकांक्षेइतकीच त्यांची प्रेरणा धार्मिकदेखील होती. नव्हे, मध्ययुगात युरोप, आफ्रिका आणि आशियात झालेल्या लढायांच्या काळात समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव आणि निधर्मीवाद हे मुद्दे मुळात अस्तित्वातच नव्हते. शिवाजीमहाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक खरे; पण स्वराज्य स्थापनेमागे त्यांची प्रेरणा निखळ पुण्यात्मक पुण्याची होती! पुण्यासाठी पुण्य म्हणजे कोणावर उपकार करण्यासाठी पुण्य नाही! क्षात्रधर्माचे कर्तव्य बजावण्याचे पुण्यात्मक पुण्य!!  पुण्यात्मक पुण्य, पुण्यात्मक पाप, पापात्मक पुण्य आणि पापात्मक पाप ह्या चार संकल्पना अत्यंत सूक्ष्म स्वरूपाच्या आहेत. त्या समजून घेण्यासाठी रामायण, महाभारत आणि गीताभागवत आणि ज्ञानेश्वरतुकाराम पालथे घालावे लागतील. जमलेच तर साक्रेटिस. प्लेटो, काँट, हेगेलही वाचून पाहावे लागतील. सिंहस्थ पर्वर्णीत गोदेवर सर्वात आधी आंघोळ कोणी करावी ह्यावरून तंटाबखेडा करण्याची सवय जडलेल्या आखाडेबाज महतांनाही ह्या संकल्पना कधीच समजणार नाहीत. ह्या सूक्ष्म संकल्पना ग्लॉसी पेपरवर सुबक छपाई केलेल्या फक्त स्वतःच्या पुस्तकांकडे पाहून येता जाता पाहात स्वतःच्या कौतुकात मष्गूल असलेल्या नेमाडपंथी पुरोगामी विचारवंतांच्या आणि साहित्यिकांच्याही डोक्यावरून जाणा-या आहेत!
शिवाजीमहाराजांच्या काळात आक्रमण करणा-यांच्या प्रेरणाही निखळ धार्मिकतेच्या नव्हत्या. लोकांची जीवित आणि वित्तहानि आणि तसेच स्त्रियांची अब्रू लुटण्याच्या उद्देशानेही होत्या. त्या सरळ सरळ माणूसकीच्या धर्मालाही हरताळ फासणा-या होत्या. बहुजनांचा व्देष करणा-या होत्या. येथल्या प्रजेचे स्वराज्य बळकावून बसलेल्या आक्रमकांना पिटाळून लावल्याखेरीज राजकीय स्वातंत्र्य प्राप्त होणार नाही म्हणून स्वतंत्र्य लढा उभारला गेला. त्या काळाच्या रीतीनुसार धर्माचे –हिंदूत्वाचे-अधिष्ठान त्यांच्या लढाईला जोडले गेले. तसे ते जोडल्याखेरीज शिवाजीमहाराजच काय कोणालाही सैन्य उभे करता आले नसते. समर्थांनी किंवा तुकोबांनी शिवाजीमहाराजांना धर्माची आठवण करून दिली असेल तर ती पळीपंचपात्राच्या हिंदू धर्माची नव्हे, ज्या धर्मात क्षात्रतेज तळपावे अशी अपेक्षा आहे त्या धर्माची! ती आठवण करून देण्यामागे इनाम, जहागीरी मिळण्याची अपेक्षा नव्हतीच. शिवकाळाचे ब्राह्मण्य आणि नंतरच्या काळात रलितगात्र झालेल ब्राह्मण्य ह्यात गल्लत करून चालणार नाही.
पन्नास वर्षांपूर्वी सासवडच्या (सदाशिव पेठेतल्या नव्हे!) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी शिवचरित्रातले भावनाट्य हेरले. ते नाट्य जसेच्या तसे पकडण्यासाठी त्यांनी शाहीरी अंगाने शिवचरित्राचे लेखन सुरू केले. त्या लेखनात तितकेच जिवंत नाट्य उभए करता यावे म्हणून जिथे जिथे शिवाजी गेले असतील तिथे तिथे बाबासाहेबांनी पायपीट केली. आवश्यक तितका अभ्यासही केला. मनासारखे जमले नाही म्हणून पुन्हा पुन्हा पुनर्लेखन केले. मनासारखी कलाकृती जमल्यानंतर ती सादर केली. सादरीकरणाची करण्याची कल्पना राबवताना रंगमंचावर घोडे, तत्कालीन वेष धारण केलेले कलावंतही उभे केले. नांदीऐवजी देवीची पूजा करून जाणता राजाचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला. जाणता राजाच्या प्रयोगाने मराठीतले सादरीकरणाचे सर्व विक्रम मोडले. वयाची नव्वदी उलटली तरी आजही जाणता राजाचे प्रयोग ते सादर करतात! थोर कलावंत असलेल्या निर्मात्याचे महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांनीच कौतुक केले नाही तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्यापासून ते आचार्य अत्रे-ठाकरे ह्यांच्यापर्यंत सर्व लहानथोर नेत्यांनीही कौतुक केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार ह्यांनीही शिवशाहिराचे कौतुक केलेले आहे. केवळ ग्रँट डफने लिहीलेल्या मराठ्यांच्या इतिहासाचे आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातील नेत्यांनी केलेल्या भाषणांचे तुकडे फेकून सर्वसामान्यांची दिशाभूल झाली तरी इतिहास झाकोळला जाणार नाही की शिवशाहिरांची कामगिरीही लपून राहणार नाही. म्हणूनच तथाकथित पुरोगामी विचारवंतांकडे लक्ष न देता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांना पुण्यभूषण देण्याचा पुरस्कार सोहळा पार पडू दिला पाहिजे.


रमेश झवर 
www.rameshzawar.com 

No comments: