Thursday, October 15, 2015

सेना भाजपात ‘जूतमपैजार’

शिवीगाळ आणि हाथापायी हे उत्तरेतल्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे. आता ते महाराष्ट्रातल्या राजकारणाचेहि वैशिष्ट्य होत चालले आहे. माजी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री कसुरी ह्यांच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करणा-य सुधींद्र कुलकर्णी ह्यांच्या तोंडाला काळे फासण्यावरून तसेच त्यापूर्वी लोकप्रिय पाकिस्तानr गजल गायक गुलाम ह्यांच्या कार्यक्रम हाणून पाडण्याच्या शिवसेनेने दिलेल्या इशा-यावरून सेना-भाजपात सुरू झालेले जूतमपैजार शमले नाही. शमण्याचे चिन्हही नाही. ह्याचा अर्थ युती सरकार कोसळणार असाही नाही. सत्तावीस वर्षांपूर्वीं काँग्रेसला विरोध हाच युतीचा एकमेव आधार युतीचा आधार होता. दरम्यानच्या काळात युतीला सत्ता प्राप्त झाली. आता        दुस-यांदा सत्ता प्राप्त झाली तरी सेनाभाजपा युतीची अवस्था एखाद्या पार्टनरशिप फर्मपेक्षा  किंवा रोज भांडणे करणा-या संयुक्त कुटुंबापेक्षा  वेगळी नाही. कारण प्रॉफिट आणि प्रापर्टीखेरीज युतीला बळकट राजकीय आधार निर्माण करण्याची आवश्यकता ना शिवसेनेला वाटली, ना भाजपाला!  अडवाणी आणि बाळासाहेब ह्या दोघांनी युतीला  प्रखर हिंदूत्वचा आधार मिळवून दिला असेल. पाकिस्तानविरोधाचे वंगणहि उपयोगही पडले असेल. बाकी ह्या दोन मुद्द्यापेक्षा वेगळा ठोस आधार युतीला असला पाहिजे असे भाजपालाली  वाटत नाही. शिवसेनेला तर काही वाटण्याचा प्रश्नच नाही.
सेनाभाजपा युतीकडे लोक काँग्रेसला पर्यायी पक्ष ह्या नजरेने पाहातात. परंतु लोकांच्या मनात आशा असेल तर ती फोल ठरली आहे. दोन्ही पक्षांचे चिल्लर नेते अकलेचे तारे तोडण्यात धन्यता मानत आहेत. एकनाथ खडसेंची वक्तव्ये आणि सुधींद्र कुलकर्णींच्या तोंडाला रंग फासण्याचे सेना नेत्यांकडून केले गेलेले समर्थन ह्यात तसं पाहिलं तर गुणात्मक फरक काहीच नाही. गुलाम अली मैफल आणि सुधींद्र कुलकर्णींवरील शाईफेकीची घटना ह्या दोन्ही प्रकरणांत देवेंद्र फडणवीस ह्यांच्या संयमाची मात्र परीक्षा झाली. अन् ते त्यात यशस्वी ठरले असे म्हटले पाहिजे. नरेंद्र मोदींच्या जिवावर लोकसभेच्या आणि राज्याच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळताच लुंग्य.सुंग्या भाजपाच्या नेत्यांच्या वागण्यातही सत्तेची  गुर्मी ओसंडून वाहू लागली. त्याची झलक तर भाजपा अध्यक्ष अमित शहा ह्यांच्याच वागण्यात दिसून आली. शिवसेना नेत्यांना अपमानस्पद वागणूक देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. सुधींद्र कुलकर्णींच्या    चेह-यावर रंग फासण्याची घटना आणि त्या घटनेचे समर्थन हे शिवसेनेचे भाजपाला दिलेले उत्तर आहे. तुम्ही माझा होत तोडला तर मी तुमचा हातच तोडला पाहिजे असे नाही; तुमचा पाय मोडायला मला काही प्रॉब्लेम नाही से हे शिवसेनेच्या तिरपागडी कृतीचे स्वरूप आहे.
ह्या तिरपागड्या कृतीमागेही काही हेतू आहेतच. कल्याण-डोंबवली पालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या असून ह्या निवडणुकीनिमित्त शिवसेनेचे शिरकाण करायचे हा भाजपाचा सुप्त हेतू तर राज्याच्या पातळीवर सुरू असलेल्या दादागिरीबद्दल भाजपाला लक्षात राहील असा धडा शिकवणे हे शिवसेनेचे उद्दिष्ट्य. भाजपाची दादगिरी महापालिकेच्या राजकारणात तरी खपवून घ्यायची नाही असे शिवसेनेचे पक्के धोरण!  परंतु युतीची चौकट न मोडता शाईफेकीच्या घटना घडवून आणून तिचा संबंध सीमेवर सुरू असलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराचशी जोडण्याचा आणि राष्ट्रभक्तीचा मुद्दा त्यात बेमालूम मिसळण्याचा भाजपाला धोबी पछाड देण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. ह्या घटनेमुळे भाजपाबद्दल शिवसैनिकात चीड उत्पन्न केल्यास पालिकेच्या राजकारणात आपोआपच नवचैतन्य निर्माण करण्यासारखे ठरणार असा काहीसा शिवसेनेचा हिशेबहात दगडाखील सापडल्यामुळे राज्याच्या राजकारणात दुय्यम स्थान आम्ही मुकाट्याने सहन केले असेल;  मात्र, इतःपर ते आम्ही सहन करणार नाही अन् पालिकेच्या राजकारणात तर नाहीच नाही, अशी ही शिवसेनेची मावळ्यांची रांगडी लढाई आहे.
मागे 1998 ते 2008 ह्या काळात भाजपाला यश मिळाले, पण ते खंडित स्वरूपाचे होते. सत्ता टिकवण्यासाठी ममता, समता आणि जयललिता ह्यांना गोंजारत बसण्यात आडवाणींचा बराच वेळ खर्ची पडला होता. अटलबिहारी वाजपेयींचे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार कसेबसे तरून गेले. पण आता नरेंद्र मोदींना वाटते तितके त्यांचे पाय घट्ट रोवलेले नाही. राजकीय संकट निवारणाच्या कामी अमित शहांसारख्या बनियाची नरेंद्र मोदींना फारशी मदत झाली नाही हे जम्मू-काश्मिरमध्ये वेळोवेळी उसळलेल्या वादांच्या वेळी दिसून आले. मोदी मौनाविरूद्ध पुरस्कारवापसीचे वादळ उठले.ह्याही बाबतीत शहांची काही मदत मोदींना झाली नाही. प्रकाश जावडेकरांची मोदींना खूप मदत झाली आहे. पण दिल्लीच्या राजकारणात त्यांच्या गळ्या पर्यावरणाचे लोढणे अडकवलेले दिसते. त्यमुळे त्यांची भाजपाला होणारी मदत काढून घेतल्यात जमा आहे. ह्यापूर्वी भूमिअधिग्रहणास राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अंतर्गत विरोध झालाच होता. त्यावेळी व्यंकय्या नायडू किंवा अरूण जेटली ह्यांनी नरेंद्र मोदींना दिलेला टेकू पुरेसा ठरला नाही. वसुंधराराजे-ललित मोदी प्रकरण तर बिचा-या सुषमा स्वराजना एकट्याने हाताळावे लागले.
सेना-भाजपा युतीत नुकत्याच झालेल्या ह्या हाणामारीत जखमांवर मलमपट्टी सुरू आहे. कल्याण-डोबिंवली पालिका निवडणुकीत युती झाली नाही तरी चालेल; किमान राज्याच्या पातळीवरील युती तुटून सत्ता गमावण्याचा धोका राहिला नाही म्हणजे खूप झाले, अशा मानसिकतेवर भाजपाला ढकलत नेणे एवढाच जर माफक उद्देश शिवसेनेचा असेल तर तो सफल झाला असे म्हणणे भाग आहे. पार्टनरशिप फर्म आणि जुन्या काळातली संयुक्त कुटुंबे ह्यात जूतमपैजार झाले तरी संध्याकाळी सर्वांचे जेवण एकत्र! अशा प्रकारे युतीचा कारभार चालेल तितका काळ चालत राहणार असाच ह्या प्रकणाचा इत्यर्थ.

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: