Thursday, October 29, 2015

मार्क्स आणि मार्क

कम्युनिझमचा जनक कार्ल मार्कस् चे आयुष्य ओढगस्तीत गेले. सोशल मिडिया सम्राट, फेसबुककर्ता मार्क झुकरबर्गचा मात्र जगातल्या शंभर श्रीमंत माणसात समावेश होतो! भांडवलशाहीचे स्वरूप उघडेनागडे करणारा कार्ल मार्क्स जगभर गाजला. त्याने मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या बळावर अर्ध्या जगावर कम्युनिस्टांचे राज्य आले. ते अर्धशतकाहूनही अधिक काळ चाललेदेखील! मार्क झुकरबर्गने 2004 साली सुरू केलेल्या सोशल साईटमुळे जगातील शंभर कोटी (एकावर 12 शून्य) लोकांवर वैचारिक सत्ता स्थापन झाली. भारतातल्या 1 कोटी 12 लाख लोकांचाही ह्या शंभर कोटीत समावेश आहे. गेल्या खेपेस नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर गेले तेव्हा त्यांनी मार्क झुकरबर्गची त्याच्या कार्यालयात जाऊन त्याची भेट घेतली होती. ह्या पार्श्वभूमीवर मार्क झुकरबर्ग चा दौरा गाजत आहे. मार्क झुकरबर्गने दिल्ली आय आय टीत घेतलेल्या सभेत केलेल्या भाषणात जे मुद्दे मांडले त्यांची वर्तमानपत्रांनी जांगलीच दखल घेतली. परंतु त्याने मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना प्रसिद्धी मिळली नाही. ज्याला फार तर ह्युमन इंडरेस्टचा मुद्दा म्हणता येईल त्या मुद्द्यांना मात्र भलतीच प्रसिद्धी मिळाली. तुम्ही ज्या प्रकारच्या चुका करू शकतात त्या सर्व प्रकारच्या चुका मी केलेल्या आहेत’  ह्या त्याच्या मुद्द्याला मात्र मिडियाने भरमसाठ प्रसिद्धी दिली.
2004 साली फेसबुक इनकॉर्पोरेट स्थापन झाल्यापासून कंपनीचा नफा आणि भागभांडवल सतत वाढत असून 2014 साली कंपनीचे भांडवल 207 कोटीहून अधिक झाले. 29 ऑक्टोबर रोजी ह्या कंपनीच्या शेअरचा भाव 104.20  डॉलर होता. 2004 साली फेसबुक कंपनी स्थापन झाली तेव्हा कंपनी चालवण्यासाठी पैसा उभा करण्याची समस्या त्याच्यापुढे होती. हिटस् वाढवण्यासाठी साईटवर अश्लील सदरात मोडेल असे साहित्य, छायाचित्रे मार्क झुकरबर्ग आणि त्याच्या सहका-याने टाकून पाहिली. पण साईटचे हिटस् काही वाढले नाही. ह्या गिमिकचा उपयोग होणार नाही असे लक्षात येताच त्याने फेसबुकला सामाजिक स्वरूप दिले. त्यानंतर 2013 साली फोसबुकच्या व्यापारात 55 टक्के वाढ होऊन भांडवल 787 कोटींवर गेले.
आज घडीला दररोज फेसबुक साईट उघडून किमान लाईक करणा-यांची संख्या वाढतच चालली आहे. खातेदारांची वाढती संख्या, वाढते लाईक्स, वाढत्या पोस्टस्, वाढते फोटो हाच ह्या कंपनीचा माल आहे. खाते उघडण्यासाठी तुमच्याकडून कुठलीही फी आकारली जात नाही की तुम्ही ज्या पोस्ट लिहीता त्यासाठी तुम्हाला कुठलंही मानधन दिले जात नाही. फेसबुकला अमेरिकेतल्या मोठ्या कंपन्यांकडून जाहिराती मिळतात. जाहिरातींचे उत्पन्न हेच ह्या कंपनीचे नफे मिळवण्याचे साधन. फुकट मिळालेली माहिती वाचण्यासाठी किंवा स्वतःला अभिव्यक्त होण्यासाठी तुम्ही जेव्हा कीबोर्ड हिट करता तेव्हा कंपनीच्या लोकप्रियेत भर पडत जाते. लोकप्रियता हा जाहिरातींच्या दराचा निकष आहे हे ओळखून भारतातल्या बाजारपेठेचे मार्क झुकरबर्गला आकर्षण वाटत असेल त्यात त्यात काही चूक नाही.
जगातला सर्वात मोठा लोकशाही देश असल्याने आणि भारत हा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा भृप्रदेश असल्याने येथे फेसबुकला हिटस् वाढवायला भरपूर वाव आहे हे मार्क झुकरबर्ग ओळखून आहे. जगातल्या लोकांचा एकमेकाशी संपर्क राहिला पाहिजे आणि एकमेकांच्या विचारांची अदानप्रदान सुरू राहिली पाहिजे ह्या शब्दात फेसबुकचे ध्येय त्याने स्पष्ट केले. परंतु फेसबुक बाहेरही मोठे जग असून त्या जगाचा काय परिणाम होतो तिकडेही लक्ष दिले पाहिजे अशी पुस्ती जोडायला तो विसरला नाही. त्याचा अर्थ स्पष्ट आहे. भारतातले हिटस् वाढले की त्याला जगातल्या जाहिरातदारांकडून जास्त पैसा काढता येईल!
मार्क झुकरबर्ग हा आधुनिक भांडवलशाहीच्या काळातला तर कम्युनिझमचा जनक कार्ल मार्कस् हा एकोणीसाव्या शतकातला स्वप्नदर्शी विचारवंत. त्याच्याकडे विद्यापिठाची डॉक्टरेटची पदवी होती. तो  कम्युनिस्ट विचारसरणीचा शिल्पकार खरा; पण पैसे संपले की पैशासाठी आईला पत्र लिहीण्याखेरीज त्याच्याकडे अन्य मार्ग नव्हता! आईकडून पैसे मिळेपर्यंत उधारउसनवारी करता करता त्याचा जीव मेटाकुटीला यायचा. तो फ्री लान्सर पत्रकार म्हणून काम करत होता. सिव्हिल वार सुरू झाले तेव्हा अमेरिकेपुढे भीषण आर्थिक संकट उभे राहिले. त्यामुळे न्यूयॉर्क ट्रिब्यूनने त्याला युरोपच्या वार्ताहरपदावरून काढून टाकले. त्या काळात कार्ल मार्कसची अवस्था कशी झाली असेल ह्याची कल्पना केलेली बरी!
रशियाचे विघटन झाल्यानंतर जगातल्या बहुतेक देशांत चालू असलेले डावेउजवे राजकारण संपले. किंबहुना राजकारणच संपले. बहुतेक सगळ्या देशआंना अर्थव्यवस्था नियंत्रणमुक्त करावी लागली. त्याच सुमारास जगात संगणक क्रांती झाली. जगभर भांडवलशाही आणि संगणक एकाच वेळी अवतरला. भारताने भांडवलशाही आणि संगणकाचा स्वीकार केला. भारतातल्या पांढरपेशांना संगणकतंत्रज्ञानाचा नवा व्यवसाय उपलब्ध झाला. काही वर्षांतच सॉफ्टवेअर क्षेत्राने भारताच्या जीडीपीला भरभक्कम हातभारही लावला. भारत ही टेलिकॉमची मोठी बाजारपेठ ठरेल असा अमेरिकेचा होरा होताच. त्यानुसार भारतात मोबाईलची बाजारपेठ वाढलीय आता डिजिटल सेवेचा काळ सुरू झाला आहे. अमेरिकन उद्योगधुरीणांच्या भारताच्या वा-या वाढल्या. बिल गेटस्, बिल क्लिंटन ह्यांनीही भारताचे दौरे केले. त्या दौ-यामागची प्रेरणा बनियाबुद्धीची होती. मार्क झुकरबर्गच्या दौ-याच्यामागेही बनियाबुद्धीचीच प्रेरणा आहे. सुपर पॉवर तुम्हाला मिळाली तर तुम्ही काय कराल, ह्या प्रश्नाला त्याने दिलेले उत्तर मोठे मार्मिक आहे. तो म्हणाला, तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा फायदा असतो. तो म्हणजे तुम्ही स्वतःच जगात सुपर पॉवर निर्माण करू शकता. सध्या इंटरनेटचा वेग लक्षात घेता तुम्ही लहान पडद्यावर टू डी व्हिडिओ पाहू शकता. येत्या पाचदहा वर्षात तुम्ही जो व्हिडिओ पाहाल तेव्हा वास्तव घटना जवळून पाहता असे तुम्हाला वाटेल! सध्याच्या इंटरनेट माध्यमापुढील समस्यांची मार्कला चांगली जाण असल्याचे त्याच्या ह्या उत्तरावरून स्पष्ट झाले. मोबाईलवर अथवा लॅपटॉपवर चांगला व्हिडिओ पाहायचा असेल तर चांगले कॅमेरे, चांगले तंत्रज्ञ हवेच. म्हणजे सध्याचे कॅमेरे बाद करण्याची वेळ येऊ घातली आहे हे स्पष्टपणे सांगायलाच पाहिजे का?
आतापर्यंत झालेल्या तांत्रिक प्रगतीकडे त्याचे लक्ष असल्याचा आणखी एक पुरावाः नेट न्युट्रिलिटीसंबंधी त्याने केलेले भाष्य. नेटन्युट्रिलिटीसंबंधी जगातल्या राष्ट्रांचे धोरण अजून असंदिग्ध आहे. इंटरनेटवरील वाढता व्यापार पाहून इंटरनेट कंपन्यांच्या प्रमुखांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. म्हणून वेगवेगळ्या नेटसेवांचे वेगवेगळे दर ठरवून इंटरनेट वापरदार कंपन्यांकडून जास्त पैसा खेचण्याचा फंडा शोधण्याच्या उद्योगाला टेलिकॉम कंपन्या लागल्या आहेत. त्यावर मात करण्यासाठी मार्क झुकरबर्गने वेगळीच शक्कल लढवली. नेटन्युट्रिलिटीला नेटन्यूट्रिलिटी न संबोधता तो फ्री बेसिक्ससंबोधू इच्छितो. पाणी, वीज वगैरे ज्याप्रमाणे मूलभूत गरजा आहेत तशीच इंटरनेटची गरज मूलभूत मानली पाहिजे, असे त्याचे मत. फेसबुकमध्ये वेगवेगळ्या सेवांची भर घालण्याच्या त्याच्या योजना आहेतच. म्हणूनच फेसबुकमुळे इंटरनेटच्या सर्व गरजा पु-या होतील, अशी पुस्ती त्याने जोडली आहे. ह्याचा अर्थ फेसबुकला ब्रॉडबँडसारख्या अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळावा हेच त्याला अभिप्रेत आहे. एकदा का हा दर्जा मिळाला आणि उद्या खरोखरच अधिक वेग आणि वहनक्षमतेच्या जास्त खर्चाच्या सेवेसाठी फेसबुकला जास्त पैसा मोजावा लागणार नाही. नेटन्युट्रिलिटीला जगात पाठिंबा वाढता असला तरी तेथील सरकारांचा भरवसा नाही. ऐन वेळी सरकार निर्णय कसा फिरवतील हे सांगता येत नाही. जास्त वेगाची सेवा पाहिजे, जास्त पैसा मोजा, अशा प्रकारचा निर्णय घ्यायला टेलिकॉम कंपन्या सरकारला भाग पाडू शकतात! म्हणजे नेटन्युट्रिलिटीचे तीनतेरा वाजल्यात जमा. ह्या पार्श्वभूमीवर मार्क झुरबर्गचा भारतदौरा अर्थपूर्ण आहे. नेटन्युट्रिलिटीसंबंधी कायद्याचे त्याला अभिप्रेत असलेले स्वरूप सत्ताधा-यांच्या गळी उतरवण्याचा त्याचा सुप्त हेतू असू शकतो. ओबामांची आणि मोदींची मते त्याच्या मताशी जुळणारी आहेत हा निव्वळ योगायोग नाही!
रमेश झवर
www.rameshzawar.com


No comments: