Thursday, December 3, 2015

हा होईल दान पसावो!

मुलगी झाली ह्या आनंदाच्या भरात फेसबुक कर्ता मार्क झुकरबर्गने स्वतःच्या मालकीचे 45 अब्ज डॉलर्सचे शेअर्स भावी पिढीला शैक्षणिक मदतीच्या कार्यसाठी दिल्याची घोषणा केली. त्याच्या घोषणेचे जगभर स्वागत होत असले तरी त्याची देणगी हे काही निखळ औदार्य नाही अशी टीकाही त्याच्यावर झाली. पण ह्या टीकेमागे अल्पवयात मार्क झुकरबर्गला मिळालेल्या यशाबद्दल कौतुकापेक्षा मत्सराची भावना नसेल असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. दानशूरपणा हा सर्व धर्मग्रंथांना मान्य असून दानाचे निकषही धर्मग्रंथानी आपापल्या परीने घालून दिले आहेत. भगवद्गीतेत सतराव्या अध्यात देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम्अशी सात्विक दानाची मुळी व्याख्याच केली आहे. गरीब माणसाला आपल्या उत्पन्नाच्या 10 टक्के दान खुशाल द्यावे असा बायबलचा स्पष्ट आदेश आहे. इस्लामलाही दानाची संकल्पना पुरेपूर मान्य आहे. प्रत्येकाने उत्पन्नाच्या अडीच टक्के जकात (म्हणजेच दान) गरिब नातेवाईकांना अवश्य दिले पाहिजे असे कुराणमध्येच म्हटले आहे. करूणा हा तर बौद्ध धर्माचा आधार आहे. थोडक्यात, जगात असा एकही धर्म नाही की ज्यात दान महात्म्याचा पुरस्कार केलेला नाही !
मार्क झुकरबर्ग हा धार्मिक मनोवृत्तीचा आहे की नाही हे माहित नाही. तसेच तो बायबलचा आदेश मानणारा कॅथॅलिक आहे का हेही माहित नाही. त्याने केलेले दान धार्मिक मनोवृत्तीतून उद्भवलेले नाही एवढे मात्र निश्चित. त्याची पत्नी ही व्हिएतनाममध्ये स्थायिक झालेल्या मूळ चीनी वंशाची असून तिचे कुटुंब अमेरिकेत निर्वासित म्हणून आले. साहजिकच प्रिसिला चॅनचे शिक्षण अतिशय कष्टात पार पडले. तिने आजीआजोबाच्या संसारालाही हातभार लावला. हॉर्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कशी तिचे प्रेम जुळले आणि दोघांचे लग्न झाले. आयुष्यात केलेल्या कष्टाची प्रिसिलाला आजही आठवण असावी. म्हणूनच आपल्या कन्येच्या पिढीतील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काही करण्याची इच्छा तिने मार्ककडे व्यक्त केली असावी. नव्हे, तिने तसा आग्रहही धरला असेल. म्हणून शैक्षणिक मदतीसाठी चॅन झुकरबर्ग इनिशेटिव्हनावाची ट्रस्टवजा कंपनी स्थापन करण्याची घोषणा मार्कने केली. ही घोषणा करताना दानाचा हेतूही त्याने अतिशय कल्पकरीत्या स्पष्ट केला. मंगळवारी जन्माला आलेल्या तान्हुलीच्या नावे त्याने चक्क एक पत्र लिहीले असून त्या पत्राचा आशय अतिशय नाट्यमय आहे. ह्या पत्रात मार्क झुकरबर्ग म्हणतो, मॅक्झिमा (मुलगी जन्माला येण्यापूर्वीच मार्क झुकरबर्ग आणि त्याची व्हिएतनामी चीनी वंशाची पत्नी चॅन तिचे मॅक्झिमा असे नामकरण केले आहे.) तुझ्या पिढीच्या मुलांचे भरणपोषण होऊन त्यांचा अभ्युत्कर्ष होण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. शिक्षणामुळेच शिशुतील कुलूपबंद असलेले दैवी गुण हे कुलूप उघडून विकसित होत असतात.
जगात अशा प्रकारचे धर्मदाय ट्रस्ट स्थापन करणारा मार्क झुकरबर्ग एकटा नाही. जगभरात 134 जणांनी अशा प्रकारचे ट्रस्ट स्थापन केले असून भारतातही अझिम प्रेमजी, शिवा नाडर, रतन टाटा, नंदन निलकेणी  वगैरे दहा जणांनी आपल्या संपत्तीतून मोठाल्या रकमेच्या देणग्या देऊन धर्मदाय ट्रस्ट स्थापन केले आहेत. मार्कचे वैशिष्टय म्हणजे हा ट्रस्ट त्याने अतिशय तरूण वयात स्थापन केला आहे. तसेच आतापर्यंत धर्मदाय ट्रस्ट स्थापन करण्यासाठी देण्यात आलेल्या रकमेपेक्षा मार्कने दिलेली 45 अब्ज डालर्सची रक्कम सर्वाधिक आहे. वॉरेन बफेनेदेखील स्वतःच्या मालकीच्या 99 टक्के धर्मदाय ट्रस्टसाठी दिले होते. परंतु त्यांच्या शेअर्सच्या किमतीपेक्षा मार्कच्या मालकीच्या शेअर्सची किंमत दोन अडीच अब्जांनी अधिक आहे.
मार्कची धर्मदाय ट्रस्टची घोषणा म्हणजे एक मार्केटिंग फंडा असल्याची टीका करण्यात आली आहे. परंतु अशा प्रकारचा हेत्वारोप कोणावरही करता येण्यासारखा आहे. प्रचंड नफा होतो तेव्हा आयकर भरण्यापेक्षा धर्मदाय ट्रस्ट स्थापन करण्याचा मार्ग जगभरातले उद्योगपती चोखाळतात हे सत्य आता सगळ्यांना मान्य  आहे. ह्या अर्थाने सगळ्या देणग्या सहेतूकच असतात. लीगल इव्हॅजन इज नो इव्हॅजन’  असा दृष्टीकोण अनेक न्यायाधीश व्यक्त करतात. भरमसाठ कर भरूनही अनेक कंपन्यांचा नफा कमी होत नाही. उलट तो वाढतच चालला आहे. सध्या भारतासह जगातील अनेक देशात बहुतेक माहिती तंत्रज्ञान कंपन्या गडगंज नफा कमावतात. ह्या नफ्यावर ते सरकारला करही भरतात. सरकारी कर भरणात आयटी कंपन्यांचा लक्षणीय वाटा आहे. ह्या कंपन्या सरकारचा कर मुकाट्याने भरत असल्या तरी नॉलेज वर्कर म्हणून ओळखल्या जाणा-या कर्मचा-यांच्या पिळवणुकीतूनच त्यांना एवढा नफा कमावणे शक्य होते ही वस्तुस्थिती लपून राहिली नाही.
सिलीकॉन व्हॅलीत दिसून येणारे हे वास्तव बंगळूरमध्ये तर विशेष विदारक स्वरूपात दिसून येते. विशेष म्हणजे ह्या क्षेत्रात कामाचे तास निश्चित नाही. वेळेचे बंधन नाही. गुणी सॉप्टवेअर इंजिनीयरलाही लाचारीचे जिणे पत्करावे लागते. हाजी हाजी करून नोक-या टिकवाव्या लागतात. प्रोजेक्ट लीडरच्या लहरीमुळे ज्याला बेंचवर बसावे लागले नाही असा इंजिनीयर क्वचितच पाहायला मिळतो. आयटी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः इंजिनीयर असल्यामुळे कोणाचीही दादफिर्याद ऐकली जात नाही. कंटाळा आला असेल तर नोकरी सोडण्याखेरीज तरूण इंजिनीयरपुढे पर्याय नाही. कु-हाडीचा दांडा गोतास काळ अशी ही स्थिती आहे. आयटी कंपन्यांकडून प्राप्त होणा-या सेवांच्या संदर्भात ग्राहक समाधान म्हणत असाल तर तीही परिस्थिती फारशी चांगली नाही. अजूनही संगणक वापराच्या बाबतीत प्लग अँड प्लेऐवजी प्लग अँड प्रे अशी अवस्था आहे. खरे तर, पे अँड प्ले असा हा सशर्त व्यवहार अस्तित्वात आहे!  प्राप्त परिस्थितीत अनेक कंपन्यांना कायद्याच्या कचाट्यातून मार्ग काढण्यासाठी काही तरी करावेच लागते. अन्यथा त्यांना नफा कमावता येणारच नाही. आणि समजा, नफा कमावला तरी तो चोरापोरांच्या हाती पडणार नाही ह्याची खात्री देता येत नाही.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सगळे काही कुजले आहे असे इथे मुळीच सुचवायचे नाही. फेसबुक किंवा गूगल ह्यासारख्या सन्माननीय कंपन्या निश्चित अपवाद आहेत. ह्या वातावरणात मार्क झुकरबर्गच्या धर्मदाय ट्रस्टकडे संशयाने पाहिले जाणार हे खरे आहे. परंतु भरपूर संपत्ती प्राप्त झाल्यानंतर संपत्तीचा काही अंश का होईना दान द्यावासा वाटणे ही मानवी मनाची सहज प्रवृत्ती आहे हे नाकारून कसे चालेल? मार्क झुकरबर्ग काय किंवा वॉरन बफे काय हे साधूसंत नाहीत. मिळालेल्या उत्पन्नातून थोडा पैसा ते स्वतःपुरता काढून घेणारच! बिल गेटस्, बजाज, बिर्ला, टाटा ही सगळी मंडळी दानधर्म करताना तेव्हा त्यांची नजर स्वार्थ आणि परमार्थ ह्यावर असतेच असते. ते काही शिर्डीचे साईबाबा किंवा ब्रम्हचैतन्य गोंदवलेकरमहाराज ह्यांच्यासारखे निःस्वार्थी आणि त्यागमय जीवन जगणारे संत नव्हेत! म्हणूनच एक मात्र निश्चितपणे सांगावेसे वाटते की दानाचा थोडासा जरी अंश योग्य मार्गे खर्च झाल्यास दानाचा हेतू सफल झाला असे मानले पाहिजे. कोणत्याही दानाचा हेतू शंभर टक्के कधीच सफल झाल्याची उदाहरणे जगाच्या इतिहासात फारच कमी आहेत. उलट, धर्मदाय संस्थात काही अपवाद वगळता जास्तीत जास्त अफरातफरी झाल्याचे दिसून येते. अगदी वर्ल्ड ट्रेड सेंटर उद्ध्वस्त झाल्यानंतर मदतीसाठी जमवण्यात आलेल्या निधीतही अफरातफर झाली! किती मुलांना शिक्षण मिळणार हा मुद्दा महत्त्वाचा नाही. एका जरी मुलास मार्कच्या ट्रस्टचा फायदा मिळणार असेल तरी त्याचा हेतू सफल झाला असे मानले पाहिजे. मार्कच्या घोषणेच्या संदर्भात विश्वात्मक देवाच्या तोंडून एकच उद्गार निघणे शक्य आहे, हा होईल दान पसावो!

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: