दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली ह्यांच्यातली हमरीतुमरी आता थेट कोर्टात गेली. अरूण
जेटलींवर दिल्ली क्रिकेट असोशिएशनमधील भ्रष्टाचाराचा आरोप करूनत आम आदमी पार्टी
थांबली नाही. दिल्ली क्रिकेट असोशिएशनमधील अरूण जेटलींच्या कारकिर्दीतल्या
भ्रष्टाराची चौकशी करण्यासाठी आयोगही नेमला आहे. त्याआधी मुख्यमंत्री अरविंद
केजरीवालांचे प्रमुख सेक्रेटरी राजेंद्रकुमार ह्यांच्या कार्यालयासह घरांवर
सीबीआयने छापे घालून दिल्ली सरकारची खोड काढली होतीच. ह्या परिस्थितीत मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल ह्यांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांच्यावर अरूण जेटलींनी
अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा दाखल केला. एखाद्या मोहल्ल्यात सामान्य वकुबाची माणसं
जेव्हा राजकारण करतात तेव्हा पोलिसात एकमेकांविरूद्ध चॅप्टर केसेस दाखल करतात. हाच
प्रकार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अर्थमंत्री अरूण जेटली ह्यांच्यासारख्या
राजकारणात बडी धेंडे म्हणून ओळखल्या जाणा-यात
सुरू झाला आहे. ह्या निमित्ताने गल्लीचे राजकारण दिल्लीत म्हणजे केंद्रीय राजकारणात
प्रवेश करते झाले आहे. दिल्लीची जाहली गल्ली! ‘गल्ली’च्या ह्या गलिच्छ राजकारणाचे शिंतोडे अर्थमंत्री
अरूण जेटली ह्यांच्यावर जसे उडाले तसे ते नरेंद्र मोदी सरकारच्या अब्रूवरही
उडाल्याशिवाय राहणार नाही.
‘हवाला प्रकरणातून
लालकृष्ण आडवाणी जसे निर्दोष सुटले तसे अरूण जेटलीदेखील चौकशीतून सहीसलामत सुटतील’, असे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. मोदींचे हे विधान कितीही सावध असले तरी अरूण जेटली
हे नरेंद्र मोदींचे मित्र आहेत हे लोकांना माहित आहे. म्हणून मोदींचे जेटलींच्या
संदर्भातले उद्गार प्रसिद्ध होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना आडवाणींनी राजीनामा
दिला होता, ह्याची विरोधकांनी आठवण करून दिली. अरूण जेटलींनीही नैतिक कारणावरून
राजीनामा द्यावा अशी मागणी सुरू झाली. अरूण जेटलींविरूद्ध निर्भीड आरोप करणा-या
कीर्ती आझादना भाजपाने निलंबित केले. पण आता शत्रूघ्न सिन्हा कीर्तींच्या पाठीशी
उभे राहिले आहेत. कीर्ती आझाद हे दिल्ली क्रिकेट असोशिएशनशी संबंधित असतानाच्या
काळापासूनच अरूण जेटलींच्या विरूद्ध तर शत्रूघ्न सिन्हाही एकूणच भाजपा नेत्यांच्या
विरोधात! तसं पाहिलं तर कीर्तींचे
भांडण वैयक्तिक आहे. दिल्ली क्रिकेट असोशिएशनच्या कारभारापुरतेच ते सीमित आहेत.
दिल्ली असोशिएशनतर्फे बांधण्यात आलेल्या स्टेडियमची कामे देताना बोगस
कंत्राटदारांना मोठमोठाल्या रकमा दिल्याचा आरोप अरूण जेटलींवर आहे. दिल्ली क्रिकेट
असोशिएशनशी संबंधित खासदार कीर्ती आझाद अरूण जेटलींवर आधीपासूनच आरोप करत आले
आहेत. राजकीय वातावरण बदलताच त्यांना जोर चढला. बिशनसिंग बेदीचीही त्यांना साथ
लाभली. आता जेटलींवर आरोप करणा-यात हॉकी फेडरेशनचे माजी अध्यक्ष के पी गिल हेही
सामील झाले आहेत. क्रिकेटच्या बॅटबरोबर आता हॉकी स्टिकही सामील झाली असून हॉकी
इंडियाला कायदेशीर सल्ला देण्यासाठी अरूण जेटलींची मुलगी सोनल जेटली हिची नेमणूक
करण्यात आल्याचा आरोप गिल ह्यांनी केला. हॉकी इंडियाचे अध्यक्ष बत्रा हे जेटलींचे
मित्र आहेत. मित्राकडे शब्द टाकून अरूण जेटलींनी आपल्या कल्पवृक्ष कन्येला
कल्पवृक्ष बहाल केला. ललित मोदी प्रकरणातही ललित मोदींचे वकीलपत्र घेणा-या सुषमा
स्वराजांच्या कन्या बासुरी स्वराज ह्यांचा उल्लेख झाला होताच. काँग्रेसचे माजी
अर्थमंत्री चिदंबरम् ह्यांचे चिरंजीव कार्तिक ह्यांच्यावरही एन्फोर्स
डायरेक्टरेटने छापा घातला आहे. मुलाबाळींवर करण्यात आलेल्या आरोपांची सत्यासत्यता आता
न्यायालयात सिद्ध करण्याखेरीज इलाज नाही. पण भारतीय लोकशाहीत सत्तेच्या खुर्चीतून
खाली खेचण्याचे राजकारण मुळी सुरू होते ते कोर्टात! अन् सत्तेच्या राजकारणाच्या खेळाचा शेवट होतो
तोही कोर्टात!
काँग्रेसमध्ये जसे घडले तसेच आता भाजपामध्ये घडू लागले आहे. पंतप्रधान
होण्यासाठी नरेंद्र मोदींचे सत्तेचे राजकारण उद्योगपतींच्या संघटनेत केलेल्या
भाषणाने झाले होते. मोदींना भाजपामध्ये खुद्द लालकृष्ण आडवाणी, यशवंत सिन्हा,
सुषमा स्वराज ह्यांचा विरोध होताच. हवेचा रोख पाहून लालकृष्ण आडवाणी आणि यशवंत
सिन्हांनी विरोध मुकाट आवरता घेतला. सुषमा स्वराज ह्यांची वर्णी मंत्रिमंडळात
लागली. त्यामुळे विरोधाचा आवाज न काढता त्यांनी स्वतःला सावरून घेतले. ह्याउलट,
कीर्ती आझाद आणि शत्रूघ्न हे तितके प्रबळ विरोधक नाहीत. तरीही त्यांचा भाजपा नेत्यांविरूद्धचा
त्यांनी उठवलेला आवाज पुष्कळ बुलंद म्हटला पाहिजे. शत्रूघ्न सिन्हाही आता
कीर्तींच्या बाजूला उभे राहिले आहेत. सिन्हांना बिहारमध्ये पद मिळवण्याची इच्छा
होती. पण त्यांना सिनेअभिनेतापेक्षा जास्त किंमत भाजपाने दिली नाही. बिहार
विधानसभा निवडणुकीच्या काळात नेतृत्व आपल्याकडे येईल अशी सिन्हांना आशा होती. पण त्यांची
संपूर्ण निराश झाली. ह्या पार्श्वभूमीवर शत्रूघ्न सिन्हा एकूणच भाजपा नेतृत्वाच्या
विरूद्ध झाले आहेत. ह्या दोघांच्या मागे संघातली किंवा भाजपातली कोणी बडी हस्ती
नाही.
मोदी सरकार अधिकारारूढ झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरे आणि
‘मनकी बात’मध्ये गुंतून पडले
आहेत. त्यामुळे सरकारचे समर्थन करण्याची जबाबदारी जवळ जवळ अरूण जेटलींवर आहे. ते
सतत नरेंद्र मोदी सरकारच्या प्रवक्त्याच्या भूमिकेतच वावरत आहेत. ललित मोदींना मदत
करण्याचा आरोप वसुंधरा राजेंवर आला. त्या आरोप प्रकरणी सुषमा स्वराजही अडचणीत
आल्या. त्यांचा बचाव करण्यासाठी नरेंद्र मोदी उभे राहिले नाही; उभे राहिले ते
अरूण जेटली. सुषमा स्वराज ह्यांचाच नव्हे, तर संसदेत सरकारचा राजकीय बचाव करण्यास वेंकय्या
नायडू आणि अरूण जेटली ह्यांच्याखेरीज कोणीच पुढे आला नाही. आता अरूण जेटलींवर
स्वतःचा बचाव करण्याची पाळी आली आहे. त्यासाठी अजून तरी कोणी पुढे आला नाही.
त्यामुळे जेटलींवर कोर्टाची पायरी चढण्याची पाळी आली आहे. अरविंद केजरीवालांच्या
चौकशी आयोगाला बदनामीची फिर्याद हे अरूण जेटलींचे उत्तर आहे. आरोप कितीही वैयक्तिक
आणि मर्यादित असले तरी भाजपात पर्यायाने केंद्राच्या राजकारणात निश्चितपणे ठिणग्या
उडायला सुरूवात झाली आहे. आता ठिणग्यांचे रूपान्तर ज्वालात करण्याचे काम काँग्रेसकडून
किती चोखपणे बजावले जाते ह्यावर दिल्लीचे राजकारण अवलंबून राहील. कदाचित ज्वाला
उफाळतील. विझूनही जातील! दिल्लीचे स्वतःचे सरकार मजबूत करण्याची
आम आदमी पार्टीची तर भाजपा सरकारला कसेही करून छळायचे हीच काँग्रेसची तूर्तातूर्त
रणनीती!
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment