Wednesday, April 13, 2016

युगपुरूष

युगपुरूष बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा शतकोत्तररौप्यमहोत्सवी जयंती आज देशभर साजरी होत आहे. महाराष्ट्र ही लोकोत्तर पुरुषांची खाण आहे. गेल्या शतकात ह्या खाणीत कितीतरी नररत्ने जन्माला आली. परंतु चळवळ, तत्त्वचिंतन, राजकारण आणि कायदा ह्या सर्वच शस्त्रांचा वापर करून अस्पृश्यतेचे कायमचे उच्चाटण करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव बाबासाहेब आंबेडकर! पाच हजार वर्षांपासून जन्माधिष्ठित गुलामगिरीचे जिणे जगणा-या लाखो समाजबांधवांची नरकयातनेतून कायमची सुटका करून त्यांना आत्मसन्मानपूर्वक मोकळा श्वास घेण्याचा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दाखवून दिला. महात्मा गांधींनी शस्त्राविना देशाला स्वतंत्र्य मिळवून दिले असेल तर बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांना मुलकी युध्दाविना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून दिले. गुलामगिरीविरूध्द अमेरिकन जनतेला नागरी युध्दाचा मार्ग पत्करावा लागला होता  ह्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांवना मिळालेले यश अभूतपूर्वच म्हणावे लागेल.
मागासवर्गिय घरात जन्मले तरी बाबासाहेबांना सुदैवाने शिक्षणाची संधी मिळाली. केवळ अस्पृश्य असल्याने त्यांना विद्यार्थी दशेत चटके सोसावे लागले. संस्कृत शिकण्याची आवड असूनही अस्पृश्य असल्यामुळे त्यांना संस्कृत शिकण्यास मज्जाव करण्यात आला. घरात वारकरी संप्रदायाचे वातावरण असल्यामुळे की काय त्यांना हिंदू धर्माबद्दलची त्यांची भूमिका मुळात अभ्यासकाची राहिली. बडोदे संस्थान आणि शाहू महाराज ह्यांच्या पुरोगामी धोरणामुळे त्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ह्याच काळात त्यांना अस्पृश्यतानिवारणाच्या प्रश्नात हात कसा घालता येईल ह्याचा विचार करण्यास पुरेपूर अवसर प्राप्त झाला. त्यामुळे भारतात आल्यावर त्यांच्या डोळ्यांसमोर सामाजिक कार्याची नेमकी दिशा स्पष्ट होत गेली. बडोदे संस्थानच्या शिष्यवृत्तीविषयक नियमांचा भाग म्हणून. नंतर राहायला जागाच न मिळाल्याने बडोदे संस्थानाच्या नोकरीतून त्यांची आपोआपच सुटका झाली. ह्या काळात अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक आहे अशी जाहीर भूमिका टिळक वगैरे पुढा-यांनी घेतली. तरीही बाबासाहेबांनी त्या वेळच्या अस्पृश्यता निवारण चळवळीत भाग घेतला नाही. ह्याचे कारण अर्थशास्त्र कायदा ह्यासारख्या विषयांचे अध्ययन करण्याची त्यांची तीव्र लालसा!
अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेऊन परतल्यावर ते पुन्हा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इग्लंडला गेले. ह्यावेळी त्यांना कोल्हापूर संस्थानाने आणि त्यांच्या एका मित्राने मदत केली. परदेशच्या वास्तव्यात अकेडेमिक अभ्यासाबरोबरच तेथली राज्यपध्दती, घटना, कायदे वगैरेंचेही त्यांनी परिशीलन केले. ते परदेशात असतानाच्या काळातच स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव ह्या विचारांचे वारे युरोपात वाहू लागले. ह्या सर्व गोष्टींचा खोल परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाला. त्यामुळे आपल्याकडची वर्ण व्यवस्था सेक्युलर असल्याचा दावा सनातनी मंडळी करत होती. परंतु हा दावा किती फोल आहे ह्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी स्वतःच घेतला होता. अस्पृश्यता निवारणाचे प्रयत्न देशात सुरू झाले नव्हते असे नाही. पण त्या प्रयत्नांच्या मर्यादा बाबासाहेबांच्या अचूक लक्षात आल्या होत्या.  सिंडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाल्यानंतर त्यांनी अस्पृश्यता निवारण प्रश्नावर जनजागृती घडवून आण्यासाठी अनेक सभा घेतल्या. हिंदू समाज ढवळून निघत होता. पण त्यातून काहीच निष्पन्न होत नव्हते. म्हणून त्यांनी अस्पृश्यताविरोधी आंदोलन प्रखर करण्यासाठी 1927 साली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. ह्याच वर्षी त्यांनी हरिजनांसाठी राखीव मतदारसंघाची मागणी करून राजकीय आघाडीही उघडली. त्यामुळे त्यांचा थेट काँग्रेसशी संघर्ष निर्माण झाला. त्यांच्या सत्याग्रहाला जोरदार प्रतिसाद लाभताच 1930 साली त्यांनी काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह करण्याचा निर्धार जाहीर केला. अस्पृश्यता निवारणार्थ संघर्ष सुरू ठेवताना ब्रिटिश सरकारवर दबाव ठेवण्याची राजकीय जागरूकता दाखवायला ते विसरले नाही. जे चातुर्य गांधीजींकडे होते तेच चातुर्य आंबेडकारांकडेही होते.  
हिंदू समाजाबरोबर संघर्ष सुरू केला तरी हिंदू समाज दाद देत नाही असे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी येवल्यात धर्मान्तराची घोषणा केली. त्यांच्या ह्या घोषणेने मात्र हिंदू समाज अस्वस्थ झाला. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ह्या त्यांच्या येवल्याच्या सभेत काढलेल्या उद्गारामुळे नाही म्हटले तरी हिंदू समाज हादरला. सावरकर, शंकराचार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादींना भूमिका घेणे भाग पडले. तरीही प्रत्यक्ष धर्मान्तर करण्याची तारीख उजाडली 14 ऑक्टोबर 1956 ह्या दिवशी! पण ह्या एकवीस वर्षांच्या काळात त्यांनी बौध्द धर्माच्या अनेक नेत्यांशी विचारविनिमय केला. बौध्द धर्माच्या तत्वांचे आकलन वाढवले. धर्मांतरामुळे आरक्षणाच्या फायद्यास मुकण्याची वेळ येऊ शकते हेही त्यांच्या लक्षात आले. पण दरम्यान ब्रिटिश काळातच भारतासाठी स्वतंत्र राज्य घटना तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्या हालचालीत बाबासाहेबांचा  सक्रीय सहभाग होताच.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटना समितीचे अध्यक्षपदच त्यांच्याकडे आले. त्या काळात सर्वांगिण स्वातंत्र्याचा उद्घोष करणारी घटना तयार करण्याची संधी मिळाली. भारतीय घटननेत समता, स्वातंत्र्य आणि बंधूभाव ह्या तत्त्वांचा समावेश करताना मागासवर्गियांना अन्य पुढारलेल्या समाजघटकांच्या बरोबरीने आणण्यासाठी शिक्षण आणि नोकरीत समान संधी मिळणे आवश्यक होते. त्यासाठीच 10 वर्षांच्या काळासाठी आरक्षणाची तरतूद करण्याची संधी त्यांनी मिळवली. सुदैवाने बाबासाहेबांना काँग्रेसचा पाठिंबा लाभला! पुढे ह्या सवलती नवबौध्दांनाही मिळाव्या असा प्रयत्न रिपब्लीकन नेत्यांनी केला. त्यातही त्यांना यश मिळाले. बाबासाहेबांना मिळालेले हे मोठेच राजकीय यश होते असे म्हटले पाहिजे. तरीही ह्या राजकीय यशाची अजिबात धुंदी त्यांनी स्वतःला चढू दिली नाही. दरम्यानच्या काळात पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय आणि मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन केले. राजकीय यशाइतकेच शिक्षण हाच मागासवर्गियांना पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीने आणण्याचा खरा मार्ग आहे ह्याचा त्यांना विसर पडला नाही. महार वतन कायदा आणि हिंदू कोड बिलाच्या बाबतीत मात्र त्यांना यश मिळाले नाही. पण त्यामुळे खचून न जाता त्यांनी मंत्रिपदाचा राजिनामा देऊन पुन्हा एकदा धर्मपुरुष म्हणून वेगळी वाटचाल सुरू केली. नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारों अनुयायांसह त्यांनी हिंदू धर्माचा कायमचा त्याग केला आणि बौध्द धर्म स्वीकारला. हिंदू धर्माबद्दल, विशेषतः ब्राह्मणवर्गाबद्दल त्यांनी कोणातही आकस न बाळगता त्यांनी धर्मान्तर केले.
भारताच्या इतिहासाने अनेक धर्मान्तरे पाहिली आहेत. काही तलवारीच्या जोरावर तर काही फसवून केलेली! पण बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह केलेले हे धर्मान्तर जाणीवपूर्वक केले होते. म्हणूनच त्यांचे धम्मचक्र परिवर्तन अभूतपूर्व असेच म्हणावे लागते. आजपर्यंत जगात अशा प्रकारचे धर्मपरिवर्तन कुठेच झाले नाही. होणारही नाही. जन्मापासून अन्याय करणारा धर्म आम्हाला नको असे जाहीररीत्या सांगत हजारों अनुयायांसह धर्मान्तर करणारा हा धर्मपुरूष! त्यांच्या धर्मान्तरास भीमयान म्हणायलाही हरकत नाही. ह्या अर्थाने बाबासाहेब हे युगपुरूष ठरले! ह्या युगपुरूषास शतकोत्तर रौप्यजयंतीनिमित्त वंदन.

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: