पाच वेळा मुख्यमंत्री झालेल्या सुश्री जयललिता
ह्यांच्या आयुष्याचा उंच गेलेला हिंदोळा अखेर काल सायंकाळी थांबला. त्यांना
इस्पितळात हलवण्यात आल्यानंतर सुरूवातीचे काही दिवस त्या आजारी आहेत म्हणजे
त्यांना नेमके काय झाले आहे ह्याबद्दल अजिबात
बातम्या आल्या नाही. शेवटी संबंधितांना त्यांच्या आजारपणाची माहिती जनतेला
देणे भाग पडले. काल पहाटे कार्डियाक अॅरेस्टमुळे त्यांची तब्येत खूपच खालावली.
त्यात फुफ्फुसही काम करेनासे झाले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे
इस्पितळाने जाहीर केले तेव्हा त्यांच्या आयुष्याच्या अखेरची घटका भरत आल्याची
कल्पना सगळ्यांना येऊन चुकली. लोकप्रिय नेत्याच्या मृत्युचा अनुभव देशाला नवा
नाही. परंतु अन्य प्रांतातल्या लोकप्रिय नेत्यांची आणि जनतेचे उदंड प्रेम
लाभलेल्या तमिळ नेत्यांची तुलना करता येणे अशक्यच आहे! अखेर जयललिता गेल्या! गेली 68
वर्षें सतत वरखाली झोका घेणा-या त्यांच्या आयुष्याचा हिंदोळा कायमचा थांबला!
राजकारण आणि सिनेमा सृष्टी मुळातच अजबच दुनिया
म्हटली पाहिजे. ह्या दोन्ही क्षेत्रात अफाट यश मिळवणा-यांबद्दल जनमानसात कुतूहल तर
असतेच. परंतु ते निव्वळ कुतूहल असत नाही. यशस्वी अभिनेता-अभिनेत्री तसेच राजकाणी
ह्यांच्याबद्दल जनसामान्यांत कुतूहलाबरोबर प्रेमादराचीही भावनाही असते! त्यांचे
स्थान सामान्य लोकांच्या अंतःकरणात आईवडिलांप्रमाणेच असते. जयललिताच्या जाण्याने
तमिळ जनतेची ‘अम्मा’ इहलोकातून निघून गेली. तमिळ जनमानसावर
झालेला हा तडिताघातच! सामान्य माणसाच्या अंतःकरणात जयललितांना स्थान मिळण्याचे
कारण त्यांच्या चित्रपटातल्या भूमिका आणि त्या भूमिकांनुरूप त्यांचे राजकारणातले
वर्तन! राजकीय विश्लेषण करण्यासाठी आयुष्यभर लेखण्या झिजवणा-या पत्रकारांना
जयललितांच्या लोकप्रियतेचे गमक लक्षात येऊ शकले नाही. जनमानसावर महाभारतातल्या आणि
कथाकादंब-या तसेच सिनेमात साकार झालेल्या व्यक्तीरेखांचाही प्रभाव असतो. म्हणूनच
लोकप्रिय नेत्यांच्या प्रभावाचा विश्लेषक वेध घेऊ शकत नाही. जयललिता ह्या
सुरूवातीपासून एमजीआर ह्यांच्या निष्ठावंत अनुयायी होत्या. काँग्रेसच्या
राजकारणाला विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या द्रविड मुनेत्रा कझगमचे नेतृत्व
जेव्हा अण्णा दुराईंकडे आले तेव्हा एमजीआर अण्णा द्रमुकमध्ये सामील झाले. तेव्हा
जयललिताही त्यांच्याबरोबर अण्णा द्रमुक पक्षात आल्या.
ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या जयललिताला आपण
आयएएस व्हावे असे वाटत होते. लोकांचे आयुष्य पालटण्याचा कामात सहभागी व्हावे असे
त्यांना वाटत होते. त्या आयएएस झाल्या नाहीत. नियतीने त्यांना सिनेमा क्षेत्रात
नेले. सिनेमात भूमिका करता करता त्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचल्या.
त्या चांगल्या एकदा नाही तर पाचदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. पंतप्रधान
इंदिरा गांधी पंतप्रधानपदावर आल्यानंतर गरीब माणूस हा राजकारणाचा केंद्रबिंदू
झाला. जयललिताही सामान्य कुटुंबातून आलेल्या असल्यामुळे गरीब माणूस हाच
त्यांच्याही राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला. सिनेमाची त्यांना विशेष आवड होती असे
नाही. संधी मिळाली म्हणून त्या सिनेमात गेल्या. सौंदर्याची त्यांना देणगी होतीच.
सेटवर कॅमेरा सुरू होताच त्यांनी जीव ओतून
अभिनय केला. शूटिंग संपले की अनेक कलावंत वायफळ गप्पा मारत बसतात. जयललिता मात्र
पुस्तकात डोके खुपसून बसायच्या. तब्बल 148 सिनेमात काम करूनही त्यांची वाचनाची
आवड कमी झाली नाही. इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. हे प्रभुत्वच
त्यांची विशेष पात्रता समजून एमजीआरनी त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले.
निवडणुकीच्या राजकारणात त्यांना नेहमीच यश मिळाले असे नाही. एका निवडणुकीत तर
दणदणीत पराभवही त्यांच्या वाट्याला आला. हा पराभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीत
अडथळा मात्र ठरला नाही.
काँग्रेसला तामिळनाडूतून जवळ जवळ हद्दपार
करण्यात द्रमुकला यश मिळाले. तामिळानाडूमधली गेलेली सत्ता कांग्रेसला कधीच परत
मिळाली नाही. तामिळनाडूचे राजकारण गरीबांभोवती फिरत राहिले तरी त्या राजकारणात
काँग्रेसला स्थान उरले नाही. कुठलेही फारसे मोठे कार्यक्रम न आखता गरिबांना
स्त्रीपुरूषांना साडीचोळी आणि लुंगी देण्याचा धडाका द्रमुकने लावला. स्वस्त तांदूळ
देण्याची तामिळनाडूची योजना तर देशभर स्वीकारार्ह ठरली. भारताल्या सर्व राजकीय
पक्षात फूट पडली तशी ती द्रमुकमध्येही पडली. एमजीआर हे अण्णा द्रमुकचे नेते
झाल्यानंतर जयललितांचे भवितव्यदेखील अण्णा द्रमुकशी जोडले गेले. साहजिकच, द्रमुकचे
सर्वेसर्वा करुणानिधी ह्या प्रखर राजकीय विरोधकांशी त्यांना सामना करावा लागला.
तामिळनाडूत मात्र ह्या दोघांच्या विरोधाचे मूळ सिनेमात असल्याचे सांगितले जाते.
करूणानिधी हे तमिळ सिनेमाचे आघाडीचे पटकथालेखक! करूणानिधींच्या मनात आपल्याबद्दल
आकसाची भावना असल्याचा जयललितांचा समज झाला होता. तो खरा की खोटा हे सिध्द करता
येणार नाही. परंतु जयललिता आणि करूणानिधी ह्यांच्यातील विरोधाची ही पार्श्वभूमी
नजरेआड करता येत नाही. राजकीय आयुष्यातही तो विरोध वेळोवेळी प्रकट झालेला दिसून
आलाच.
जयललितांबद्दल त्यांच्या चाहत्यांत प्रेमादराची
भावना असली तरी त्यांच्या विरोधकात मात्र टोकाची व्देषभावनाही होती. त्यातूनच
भ्रष्टाचाराचे आरोप, नियमबाह्य संपत्ती बाळगल्याबद्दल छापे, कोर्टकचे-या,
पोलिसकोठडीतला
तुरूंगवास इत्यादींना तोंड देण्याची पाळी जयललितांवर आली. त्यांच्या वाईट
तब्येतीचीही त्यात भर पडली. ऐशीच्या दशकात त्या एकाएकी बेपत्ता झाल्याच्या बातम्या
वर्तमानपत्रात झळकल्या होत्या. वस्तुतः त्या बंगलोर येथील जिंदल निसर्गोपचार
केंद्रात संधीवाताच्या दुखण्यावर उपचार करून घेण्यासाठी त्या दाखल झाल्या होत्या.
वेळोवेळी पचवलेले दारूण पराभव, सभागृहात
विटंबना आणि कोर्टकचे-यातून जयललितांची क्वचितच सुटका झाली. ह्या परिस्थितीत
त्यांना शारीरिक अस्वास्थ्याने गाठले. अनारोग्याशी झुंज देत लोकप्रियता टिकवणे
सोपे नसते. परंतु स्वतःच्या आजारपणाला जयललितांनी बिलकूल महत्त्व दिले नाही.
जयललितांसारखी लोकप्रियता महाराष्ट्रात अलीकडे केवळ बाळासाहेब ठाकरे ह्यांना लाभली
होती. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेनेला सत्ता मिळवून दिली. परंतु स्वतः
मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मोह त्यांना झाला नाही. ब्राह्मणब्राह्मणेतर वादामुळे
महाराष्ट्र आणि तामिळनाडू ही दोन्ही राज्ये प्रदीर्घ काळ पीडित राहिली आहेत हे
माहित असूनही महाराष्ट्रात ब्राह्मणास मुख्यमंत्र्याची खुर्ची देऊन बाळासाहेब
ठाकरे ह्यांनी काँग्रेस राजकारणाचे समीकरण बदलून टाकले. तामिळनाडूतही द्रमुकने
नेमके हेच केले. जयललितांसारख्या ब्राह्मण स्त्रीला मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा मान
देऊन तामिळनाडूने एक प्रकारे काँग्रेसप्रणित राजकारणातली जातीयवादाची विषवल्ली
उपटून फेकून दिली. जयललिता आणि त्यांचे राजकारण केवळ तामिळनाडूतच नव्हे तर देशभर
स्मरणात राहील.
रमेश
झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment