2016 वर्षांला निरोप
देताना मनात संमिश्र भावना आहेत! व्यक्तीप्रमाणे राष्ट्राच्या आयुष्यातही बरेवाईट प्रसंग येतात. स्मृती
ठेऊन जातात. कटू आणि गोड. 'राजा कालस्य कारणम्' असे महाभारतले वचन
आहे. एरव्ही वर्ष 2016 काही आगळेवेगळे नव्हते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी
ह्यांच्या एका भाषणासरशी वर्ष 2016चा चेहरा पार पालटला गेला. जुना काळ सरला.
डिजिटल पेमेंटचा नवा काळ सुरू झाला. 2016 वर्ष संपता संपता भारी नोटा चलनातून बाद झाल्या.
'राजा'च्या निर्णयाने
काळा पैशावाल्यांना धक्का बसला की नाही मला माहित नाही. परंतु एक बदल मला पाहायला
मिळाला.
आयुष्यभर स्वतःची कामे स्वतः करणे हा माझ्या ओळखीच्या आजीचा
नियम. तो त्यांनी कधीच मोडला नाही. मुली सासरी गेलेल्या. त्यांच्या संसारात गढून
गेलेल्या! कुणाकडूनही
सहानुभूतीचा याचना त्यांनी केली नाही. कध्दी कध्दी कुणाला काही काम असे त्यांनी
सांगितले नाही. ह्या ब्यायंशी वर्षांची आजी पाय-या चढून वर आल्या. दारावरची बेल ऐकून
मी दार उघडले. संथ पावले टाकत त्या आत आल्या. अडीअडचणीच्या वेळी उपयोगी पडावे
म्हणून साठवून ठेवलेल्या 500-1000 च्या साडेदहा हजार रूपयांच्या नोटा त्यांनी
माझ्या हातावर ठेवल्या.
'ह्या नोटा बदलून
आणून द्याल का?' आजी.
एके काळी त्या पश्चिम रेल्वेत नोकरीला होत्या. डोंबिवली ते व्ही. टी. अपडाऊन करणा-या. नोकरी करणा-या स्त्रियांच्या पहिल्या पिढीतल्या. पेन्शन आणली की
त्यातून खर्च भागवत एखादी नोट शिल्लक टाकण्याची सवय त्यांनी स्वतःला लावून
घेतलेली. कॅश इन हँड इज कॅश ओन्ली ह्या तत्त्वावर त्यांची दृढ श्रध्दा. काकुळतीने
केलेली त्यांची विनंती मला नाकारता येणे शक्यच नव्हते.
त्या नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभे राहणे मला शक्यच नव्हते. म्हणून
त्या नोटा माझ्या खात्यात भरण्यासाठी मी वेगळ्या रांगेत उभा राहिलो. तीन तास
रांगेत उभे राहून मी त्या नोटा माझ्या खात्यात जमा केल्या. परंतु त्यांना दोन
हजारांच्या नोटा नको आहेत. बँकेत पाचशे रुपयांच्या नोटा कधी येतील ह्याची मी वाट
पाहात आहे. त्या आल्या की साडेदहा हजार रुपयांच्या नोटा त्यांच्या स्वाधीन केल्या
की मी जबाबदारीतून मुक्त.
एकंदर 2016 हे वर्ष विचित्ररीत्या धक्कादायक ठरले!
आता थोड्या वेळात सूर्य मावळतीला जाईल. सायंकाळच्या सीमेवरून वर्ष 2017 मला खुणावते आहे, मी येतोय्! ह्यावेळी माझ्या
मनात एकच विचारतरंग डोकावतोय्. येणारे 2017 हे वर्ष तरी त्रासाचे नसू दे. मला हे माहित आहे की,
बदल घडला की आपण म्हणतो काळ बदलला आहे! वस्तुतः काळ बदलत
नाही, बदलतो ते आपण. Change
denotes time. परिस्थिती बदलते, आपण म्हणतो काळ बदलला!
रमेश झवर
No comments:
Post a Comment