Sunday, January 1, 2017

नेताजी आणि भईयाजी!

पक्षान्तर्गत प्रतिस्पर्ध्यास पक्षातून काढून टाकणे, गरजेनुसार त्याला पुन्हा पक्षात प्रवेश देणे, खुर्चीवरून खाली खेचणे, पुन्हा खुर्चीवर बसवणे, फाटाफूट आणि त्यानंतर आवश्यक वाटले तर दोन्ही गटांचे विलीनीकरण, आकाश दुमदुमून सोडणारा जयजयकार हे सगळे भारतीय राजकारणाचे वैशिष्टय जेथून जन्मले त्या उत्तरप्रदेशातच त्याच शैलीच्या राजकारणाचा आणखी एक अध्याय लिहीला गेला! एके काळी काँग्रेसमध्ये असे राजकारण रंगत होते. त्याच शैलीत गेले तीन दिवस समाजवादी पार्टीत हे राजकारपण रंगले. मुलायमसिंग यादव ह्यांनी स्थापन केलेल्या समाजवादी पार्टीत 'राजनीती की जगह राजनीती और रिलेशन्स की जगह रिलेशन्स' असे वैशिष्ट्य ह्याही राजकारणात दिसून आले. चरणस्पर्शापासून ते सार्वजनिक ठिकाणी गळाभेट हेही उत्तरप्रदेशच्या राजकारणापेकी एक वैशिष्ट्य. समाजवादी पार्टीत रंगलेल्या राजकारणाचा थोडाफार तपशील इकडेतिकडे. परंतु रंग मात्र तितकेच गहिरे! जे घडले ते यादवकुळाला साजेसे होते अशीच ग्वाही इतिहासाला द्यावी लागेल; इतिहास लिहीला गेलाच तर!
ह्या राजकारणाची सुरूवात झाली ती फेब्रुवारीत होणा-या विधानसभा निवडणुकीत तिकीटाच्या यादीवरून. नेताजी मुलायमसिंग हे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते तर त्यांचे बंधू शिवपाल यादव हे अखिलेशच्या मंत्रिमंडळात एक मंत्री आणि सपाचे प्रदेशाध्यक्षदेखील. शिवपाल यादव आणि नेताजी मुलायमसिंग ह्यांना दोघांना जवळचे. बंधू शिवपाल हे मुलायमसिंगांचे जुने सहकारी. मध्यंतरीच्या काळात पार्टी सोडून गेलेले अमरसिंग पुन्हा समाजवादी पार्टीत परत आलेले. अखिलेशविरोधक शिवपाल ह्यांची अमरसिंगांशी जवळीक तर पार्टीतून हकालपट्टी झालेले राज्यसभा सदस्य रामगोपाल यादव हे अखिलेशजींचे जवळचे मित्र. अमरसिंग ह्यांच्यावाचून मुलायमसिंगांचे पान हलत नाही. शिवपाल आणि अमरंसिंगांच्या सल्ल्याने सुरू झालेल्या तीन दिवसांच्या ह्या खेळाची अखेर अखिलेशजींची समादवादी पार्टीच्या प्रमुखपदी नेमणुकी होण्यात झाली. रविवारी तर ह्या खेळाने उत्कर्षबिंदू गाठला. अखिलेशजींना 6 वर्षांसाठी पक्षातून हाकलणा-या खुद्द नेताजी आणि प्रत्यक्ष पिताजी असलेल्या मुलायमसिंग ह्यांनाच रविवारच्या अधिवेशनात पार्टीच्या नेतेपदावरून पायउतार व्हावे लागले.
सपाचे संस्थापक असलेल्या मुलायमसिंगांना आता पार्टीच्या मार्गदर्शकाची भूमिका बजवावी लागणार आहे. त्यांच्यावर हा अनवस्था प्रसंग त्यांचे पुत्र अखिलेशजी ह्यांनी आणला असे म्हणण्यापेक्षा तिकीट यादीत अखिलेशजींना नको असलेली नावे घुसवणारे काका शिवपाल आणि सल्लागार अमरसिंग ह्यांनी आणला. दोघांनी दिलेला बदसल्ला मुलायमसिंगांनी स्वीकारल्यामुळे आला असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. तिकीटवाटपाचे भांडण कुठपर्यंत लांबवावे ह्याचे भान ना नेताजींना राहिले ना त्यांना. बदसल्ला देणा-यांना राहिले. नेताजींनी मुख्यमंत्री अखिलेशजींनाच सहा वर्षांसाठी पार्टीतून काढून टाकले. अगदी काँग्रेसस्टाईलबडतर्फीच्या पार्श्वभूमीवर थेट पित्याशी दोन हात करण्यासाठी अखिलेशजी सिध्द झाले. ह्या काळात चुलतभाऊ खासदार रामगोपाल यादव आणि 229 आमदारांनी अखिलेशजींना साथ दिली.
आगामी निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या हाताताली सत्ता हिसकावून घेण्यासाठी भाजपा आणि बहुजन समाज पार्टी टपलेली असताना समाजवादी पार्टीत हा बखेडा उभा राहणे अत्यंत धोक्याचे आहे हे समाजवादी पार्टीतल्या बच्च्या बच्च्याला माहित होते. नेताजी आणि त्यांचे सल्लागार अमरसिंग आणि बंधू शिवपाल यादवना मात्र ते उमगले कसे नाही ह्याचे आश्चर्य वाटते. समाजावादी पार्टीचे मुस्लिम नेते आझमखान ह्यांना मात्र ते लक्षात आले. भाजपा आणि बसपा ह्या दोन शत्रूंपासून समाजवादी पार्टीस वाचवण्यासाठी आझमखाननी उचल खाल्ली. मुलायमसिंगांना राजकीय परिस्थितीची जाणीव करून देण्याची कामगिरी बजावत असताना त्यांनी पितापुत्राची दिलजमाई घडवून आणण्याचा निकराचा प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला. प्राप्त परिस्थितीत अखिलेशजींनी आणखी एक पाऊल पुढे टाकले. पित्याचा योग्य तो मान राखण्यास त्यांची ना नव्हती हे त्यांनी चरणस्पर्श वगैरे करून दाखवून दिलेले होतेच. रविवारी बोलावलेल्या पार्टीच्या खास अधिवेशनात त्यांनी सर्वांच्या साक्षीने मुलायमसिंगांना मार्गदर्शक घोषित करून पार्टी नेतृत्वाची सूत्रे अखिलेशजींनी स्वतःच्या हातात घेतली. मुलायमसिंगांनाच पदमुक्त केले. त्यामुळे त्यांचे सल्लागारही आपोआप गारद झाले. न रहेगा बांस न बजेगी बांसुरी!
समाजवादी पार्टीच्या नेतृत्वात बदल झाल्यामुळे मुस्लिमाधिष्ठित राजकारणाकडून विकासाभिमुख राजकारणाकडे उत्तरप्रदेशाचा प्रलास सुरू होईल का? आझमखानांच्या मदतीने अखिलेशजी समाजवादी पार्टीच्या नेतेपदी आले हे खरे; परंतु स्वतःची विकासपुरूष अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी मुख्यमंत्रीपदावर आल्यापासून चालवलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टी पुन्हा सत्तेवर आली तर त्यांच्या प्रयत्नास नक्कीच वेग येईल. नव्या मनुचा नवा शिपाई म्हणून ते ओळखले जातील का हा खरा प्रश्न आहे.
रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: