Saturday, February 18, 2017

वण्णकम् पालनीस्वामी

तामिळी राजकारण समजण्यापलीकडचे आहे. आपल्या नेत्यांवर अपरंपार प्रेम करणारी जनता इतर कोणत्याही राज्यात नाही. नेत्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे तमिळ जनता हे जग सोडून जाणारे केवळ तामिळनाडू राज्यातच आहेत. अण्णा दुराई ह्यांच्यावर सुरू झालेला प्रेमाचा वर्षाव जयललितापर्यंतच्या बहुतेक सा-या नेत्यांना लाभला. शशिकला तुरूंगात असूनही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव झालेला आहेच. शशिकलावर किमान 122 जणांची निष्ठा तर दिसलीच. शशिकलांनी निश्चित केलेले उमेदवार इडप्पकडी के. पालनीस्वामी ह्यांच्या गळ्यात अखेर मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. शशिकला ह्याच ख-या जयललिता ह्यांच्या ख-या वारसदार आहेत हे ह्या घटनेवरून सिध्द झाले. शशिकला देखील जयललिता ह्यांच्याइतक्याच लोकप्रिय आहेत. शशिकला ह्यांना सर्वोच्च न्यायालयाने तुरूंगवासाची आणि 10 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर घातलेली बंदीची शिक्षा पाहता त्यांच्या सुटकेची राजकीय जीवन पुर्ज्जीवित होण्याची शक्यता कमीच म्हटली पाहिजे. ह्याही उप्पर त्यांची शिक्षा कमी होऊन त्या राजकारणात परत फिरल्या तर तो एक चमत्कार मानावा लागेल. परंतु तामिळनाडू हाच देशात एक चमत्कार आहे. बाकीच्या राज्यात संतांचे दैवतीकरण झालेले पाहायला मिलते तर तामिळनाडूत नेत्यांचे दैवतीकरण पाहायला मिळते. ह्या संदर्भात औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यातही काही हंशील नाही.
अल्प काळासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले पन्नीरसेल्व्हम् ह्यांना जयललिताअम्मांची पुतणी दीपा जयकुमार ह्यांचा आणि 11 आमदारांचा पाठिंबा असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदी नेमण्यास शशिकला ह्यांचा विरोध होता. पालनीस्वामी ह्यांनाच मुख्यमंत्री करण्याची मनोमन योजना रचून त्यांनी आपल्या पाठीराख्यांसह रिसॉर्टचा रस्ता धरला. नगराध्यक्षापासून ते मुख्यंत्रीपदापर्यंत कोणतीही निवडणूक असो, आपल्या पाठीराख्यांना इतरांकडून फूस लावू  नये म्हणून सगळ्यांना तीर्थयात्रेला घेऊन जाण्यापासून ते रिसॉर्टमध्ये 'नजरकैदे'त ठेवण्याचा शिरस्ता देशभर रूढ झाला आहे. विशेष म्हणजे त्यात कोणाला वावगेही वाटेनासे झाले आहे. ह्या 'नजरकैदे'विषयी कोणालाच काही वाटत नसेल तर सभागृहात हाणामारी, कपडे फाडणे, अंगावर धावून जाणे, खुर्च्या-माईकची मोडतोड ह्याबद्दलही काही वाटण्याचे कारण नाही! हे सगळे लोकशाहीविरोधी आहे. परंतु जगभर मान्य झालेली लोकशाहीची तत्वे भारतीय जनतेला मान्य नाही. भारतात स्वतःची अशी लोकशाहीची 'खास आवृत्ती' अस्तित्वात आली आहे! लोकशाहीच्या ह्या खास भारतीय आवृत्तीत उपरोक्त प्रकार लोकांना अप्रतिष्ठादर्शक वाटत नाही. जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात लष्करी क्रांती झाली नाही आणि होण्यीच शक्यता नाही हेच आपल्या लोकशाहीच्या यशस्वितेचे गमक!
अण्णा द्रमुकच्या प्रादेशिक पक्षाची ताकद पाहिल्यावर स्वतःला अखिल भारतीय पक्ष म्हणवणा-या दोन्ही मोठ्या पक्षांच्या नेत्यांनाही मनातल्या मनात प्रादेशिक पक्षांचा हेवा वाटत असेल! तामिळनाडूतील प्रादेशिक नेत्यांचे रसायन आता अनेक राज्यांच्या नेत्यांपर्यंत पोहोचले आहे. उडियाचे बिजू पटनायक, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, महाराष्ट्रात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता उध्दव ठाकरे, उत्तरप्रदेशात मायावती आणि मुलायमसिंग ( आणि आता त्यांचे चिरंजीव अखिलेशसिंह ) इत्यादि नेत्यांपुढे राष्ट्रीय नेत्यांनाही दादापुता करावे लागते ह्यात सगळे आले. 'लोकशाहीची असली थेरं मला मान्य नाही', असे उद्गार एकदा शिवतीर्थावरच्या दस-या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे ह्यांनी काढले होते. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी देशव्यापी मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी काय केले असा सवाल उपस्थित झाल्यास त्याचे समर्पक उत्तर किती नेत्यांना देता येईल? आपल्याच पक्षातील प्रभावशाली नेत्यांचे पाय कापण्याचा उद्योग सर्वच पक्षात गेली कित्येक वर्षे सुरू आहे. मोठ्या पक्षातील मिळमिळीत सौभाग्यपेक्षा प्रादेशिक पक्षातले ढळढळीत वैधव्य पत्करले अशी स्थिती आहे. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची संकुचित मनोवृत्ती मान्य करूनही त्यांना मिळणारा लोकांचा भरघोस पाठिंबा मात्र मत्सर वाटावा असा आहे.  

विशेष म्हणजे 'इश्युबेस्ड पॉलिटिक्स' चा आव न आणता सरळ सरळ व्यक्तिपूजेचे राजकारण करत राहण्यातच प्रादेशिक पक्षांची ताकद सामावलेली आहे. म्हणून तर निम्म्या भारतात प्रादेशिक पक्षांचीच सत्ता आहे हे कसे नाकारता येईल? प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना केंद्रात नेतृत्व करण्याचा मोह नाही. बाळासाहेब तर कधी दिल्लीलाही गेले नाहीत. दिल्लीत मोठ्या पक्षआंच्या सत्तेला प्रादेशिक पक्षांचा आक्षेप नाही;  राज्यातली सत्ता मात्र आमचीच हा त्यांचा खाक्या आहे. तामिळनाडूत काही आमदार-खासदार निवडून आणण्याचा काँग्रेसप्रमाणे भाजपानेही प्रयत्नकरून पाहिला. परंतु दोन्ही द्रमुकांच्या ताकदीपुढे त्यांचे काही चालले नाही. हा अनुभव लक्षात घेऊनच तामिळनाडूतील राजकारण काळजीपूर्वक हाताळण्याचा सल्ला कार्यवाहक राज्यपाल विद्यासागर राव ह्यांना भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी दिला होता. तो सल्ला किती सार्थ होता हेच पालनीस्वामींच्या विश्वासनिर्दशक ठराव ज्या पध्दतीने संमत झाला त्यावरून दिसून आले. वण्णकम् पालनीस्वामी!
रमेश झवर
www.rameshzawar.com

'मिसिंग' मतदारराजा!
http://phodile-bhandar.rameshzawar.com/wordpress/

No comments: