खणखणीत आवाजात लोकांना आवडणारी कव्वाली
म्हणत, हातातला चिमटा सटसट वाजवत रस्त्यात फिरणारे मस्त कलंदर फकीर-बैरागी आणि टिकठिकाणी
भरणारे उरूस ह्यांचे साहचर्य ज्याप्रमाणे अतूट आहे त्याचप्रमाणे साहित्य संमेलन
आणि निष्ठावान कवीलेखक आणि रसिक वाचक
ह्यांचे साहचर्यही अतूट आहे. यंदा डोंबिवलीत पु. भा. भावे नगरीत भरलेले साहित्य
संमेलन हा एक प्रतिवर्षी भरणारा उरूसच म्हटला पाहिजे. जत्रेत किंवा उरुसाला न
चुकता हजेरी लावणा-या फकिरी बाण्याने जीवन जगलेल्या लेखक-कवींच्या इमानाबद्दल
बिल्कूल शंका घ्यायला जागा नाही. साहित्य संमेलनास हजेरी लावणा-या मस्तकलंदर थोर
साहित्यिकांनी, कवींनी, लेखकांनी साहित्यकृतींबद्दलचे, कवितांचे चिंतन रसिकांसमोर
ठेवले. एकूणच मराठी भाषेच्या दूरवस्थेवरच खुद्द संमेलनाध्यक्ष, ख्यातनाम समीक्षक डॉ.
अक्षयकुमार काळे ह्यांनीच बोट ठेवले. नुसतेच बोट ठेवले असे नाही तर शिक्षणात इंग्रजी
आणि मराठीच्या समन्वयाची गरजही त्यांनी नेमकेपणाने लक्षात आणून दिली. आजवर होऊन
गेलेल्या अनेक नामवंत अध्यक्षांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी मुद्द्याला अचूक
हात घातला! मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे असे सांगणारे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आजची हिंदू संस्कृती माझी नाही, असे सडेतोड बोलून
दाखवणारे उद्घाटक ज्येष्ठ हिंदी कवी विष्णू खरे ह्यांची भाषणेही अध्यक्षांच्या
भाषणांशी सुसंवादी ठरली. ह्या सगळ्यांची भाषणे म्हणजे रसिकांना लुब्ध करणारी जुगलबंदीच
होती हे नमूद केलेच पाहिजे.
मराठी साहित्यसंमेलनात झालेल्या गहि-या चिंतनाच्या
संदर्भात काही प्रश्न उपस्थित होतात! हजार वर्षांपासून
अस्तित्व टिकवून धरलेल्या मराठी भाषेला उतरती कळा का लागली? मराठीची
ही उतरती कळा थांबवून मराठीला समृध्दतेच्या चढत्या कमानीवर नेण्याच्या दृष्टीने मराठी
राज्यकर्ते, विचारवंत, लेखक-कवी, साहित्यिक, थोर नाटककार, शिक्षण महर्षी, प्रकाशका
ह्या सर्वांनी काय केले? हिंदीच्या उन्नतीसाठी प्रत्येक केंद्रीय कार्यालयात
आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या कंपन्यात हिंदी अधिकारी नेमण्याची सक्ती केली. संपूर्ण
हिंदी विषय घेऊन पद्व्युत्तर शिक्षण घेणा-या तरूणांना सरकारच्या धोरणामुळे निदान नोक-या
तरी मिळाल्या. ह्याउलट, मराठी विषय घेऊन एम. ए. झालेल्या मराठी तरूणांना कनिष्ठ
पदावर नोक-या कराव्या लागल्या. नोक-या करत असताना त्यांनी टिळक-आगरकर आणि फुले-शाहू
आंबेडकर ह्यांच्यावर अखंड चर्चा केल्या. महाराष्ट्रात संस्कृत विद्यापीठ आहे;
परंतु मराठी विद्यापीठ नाही. कृषीविद्यापीठे आहेत. स्वतंत्र आरोग्य
विद्यापीठही स्थापन झाले. तंत्रशिक्षणाच्या नावाजलेल्या संस्थाही आहेत.
महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर साहित्य
संस्कृती महामंडऴ स्थापन झाले. त्यानंतर पाठ्यपुस्तक मंडऴ स्थापन झाले. यथावकाश मराठी
विकास संस्थाही स्थापन झाली. विश्वकोश आणि ज्ञानकोश माहितीच्या महाजालावर प्रकट
झाले. तरीही मराठीच्या संवर्धनासाठी भक्कम
असे फार मोठे कार्य झाले असे म्हणता येणार नाही. मराठी वैज्ञानिकांनी भारतभर नाव
कमावले. मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यास जयंत नारळीकर, माशेलकर,
गोवारीकर, विजय भाटकर ह्यांच्यासारखे कर्तृत्वान शास्त्रज्ञ आणि मराठी भाषातज्ज्ञ
ह्यांच्या मदतीने मोठा प्रकल्प राबवण्यास राज्य शासनाला कोणी मनाई केली होती?
विविध विषयांवर अध्यासन सुरू करण्याचे किती प्रस्ताव विद्यापीठांनी राज्य
सरकाला पाठवले? आज सत्तेवर असलेली मंडळी कालपर्यंत
विरोधक म्हणून वावरत होती. मराठीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी
किती वेळा लावून धऱली? मराठी विद्वानांच्या वाट्याला लाचारीचे
जिणे का आले? इतिहासाला विद्यार्थी मिळत नाही म्हणून अनेक
महाविद्यालयातले इतिहास विभाग बंद झाले. ते का बंद झाले ह्याची विद्यापीठांनी
कधीतरी चौकशी केली का?
मराठीचा चहू बाजूंनी सत्यानाश होत असताना
सत्तेचे आणि नेमणकींचे राजकारण करण्यात ही सगळी मंडळी गर्क होती. दर्जेदार मराठी
नियतकालिके एका पाठोपाठ बंद पडली. ती जगवण्यासाठी कुणीच काही केले नाही. वर्तमानपत्रांच्या
साहित्यविषयक आवृत्त्या शिस्तीत बंद करण्यात आल्या. साहित्यिकांच्या कर्तृत्वाला
जनतेकडून प्रतिसाद मिळवून देणारे एक मह्त्वाचे चॅनेल बंद झाले. आज घडीला रेडियो
आणि टीव्ही चॅनेलखेरीज प्रसिद्धीचे एकही साधन लेखक-कवींना उपलब्ध नाही. तेथे
प्रतिभावंतांपेक्षा सुमार लेखककवींना जास्त मानाचे स्थान आहे. पुस्तक प्रकाशन
व्यवसाय रडतखडत चाललेला आहे. परंतु ह्या व्यवसायाच्या समस्या समजून घेऊन प्रकाशन
व्यवसायाला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न कुठल्याही चेंबर ऑफ कॉमर्सने कधीच केल्याचे
आठवत नाही. विनाअनुदान मेडिकल आणि इंजिनीयरींग कॉलेज काढण्याचा खटाटोप करणा-या
शिक्षणमहर्षींना स्वस्त जागा सरकारने जागा दिल्या. मराठीसाठी काही करू इच्छिणा-यांना
स्वस्त जागा देण्याचा विचार करू असे काही सरकारने कधीच जाहीर केले नाही. फक्त
साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलन भरवण्यासाठी येणा-या खर्चाचा थोडा वाटा उचलण्याची
एक चांगली प्रथा मात्र गेल्या काही वर्षांपासून सरकारने पाडली हे सुदैवच!
सालाबादप्रमाणे मराठी साहित्य संमेलन
सोहळा उचित इतमामाने सुरू झाला. 'मांडवपरतणी'देखील तितक्याच इतमामामाने होणार आहे. साहित्य व्यवहार आणि साहित्यसंमेलन
ह्याबद्दल जेवढे लिहावे तेवढे थोडेच आहे! 'असो' ह्या एकाच शब्दाने साहित्य संमेलनावरील ह्या लेखाचा समारोप करणे भाग आहे!
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment