Thursday, February 9, 2017

प्रचार-तीर्थावरील 'अडते'!

मुंबई, ठाणेसह 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदा 283 पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असून हजरों उमेदवार रिंगणात उभे आहेत. तिकीटवाटपाच्या काळात राजकीय संस्कृती वरपासून खालपर्यंत राज्यात सर्वत्र रसातळाला गेली होती. काही काळ राजकीय संस्कृतीची जागा कलह संस्कृतीने घेतल्यानंतर  उमेदवारी मागे घेण्याची तारीख उलटताच प्रचाराचा काळ सुरू झाला आहे. पूर्वी निवडणुकीचा हंगाम सुरू होताच प्रिंटिंग प्रेस, फ्लेक्स तयार करणारे आणि पोवाडे सादर करणारे कलाकार, रात्री कितीही वाजता आलेल्या प्रचारकांना जेवण आणि ग्लास पुरवण्याची सोय करणारी हॉटेले, रिक्शा-टॅक्सींचे घाऊक बुकिंग, निवडणूक सल्लागारांच्या मुक्कामासाठी ग्रेडनुसार हॉटेलबुकिंग, वृत्तपत्रीय प्रसिद्धीची कंत्राटे घेणारे ह्या सगळ्या न्हाव्या-भटांची पर्वणी सुरू होत असे.
निवडणूक हे लोकशाहीतले हत्याराविना लढायचे एक प्रकारचे युध्दच मानले गेले. आता रणधुमाळीची उपमा बाद झाली आहे. निवडणूक प्रचाराला बाजार मानण्याचे वर्तमानपत्रांनी ठरवले आहे. मुंबई आणि नॅशनल शेअर बाजारात निफ्टी ट्रेडिंगसह अनेक प्रकारच्या प्रॉडक्टची जोरदार खरेदीविक्री चालते त्याप्रमाणे पेडन्यूजचा मोठा बाजार सुमारे महिनाभर चालणार आहे. बातम्यांच्या ह्या बाजाराचे वैशिष्ट्य असे की पुरवणी बुक करणा-या उमेदवारांना बातम्यांचेही पॅकेजही घेता येणार आहे मात्र, हा सगळा व्यवहार रतन खत्रीच्या मटक्याप्रमाणे बिनबिलाचा आणि रोकडचा व्यवहार राहणार  हे उघड आहे. उमेदवाराला पॅकेज विकणा-या पत्रकारास व्यवस्थापनाकडून 'रोख अडत'ही मिळणार!  हे प्रकार गेल्या दहा-पंधरा वर्षांत सुरू झालेलेच होते. आता त्याचा रिफाईन्ड विस्तार होणार ह्यात शंका नाही. विशेष म्हणजे लहान आणि मध्यम स्वरूपाच्या मॅनेजमेंट त्यात सहभागी असतील. त्याचा एक परिणाम असा होईल की मोठ्या समजल्या जाणा-या मिडियालाही संशयाचा फायदा मिळणार नाही.
टीव्ही मिडियात थेट विदेशी गुंतवणूक आल्यामुळे भारतीय मालकांच्या चॅनेल्सना आपले चॅनेल नफ्यात चालवणे भाग होते. म्हणूनच अण्णा हजारेंच्या उपोषणास आणि आम आदमी पार्टीखेरीज दुसरे काहीच चॅनेलवर दाखवायचे नाही ह्यासाठी मालकांनी कंबर कसली होती. विशेष म्हणजे त्यासाठी पत्रकारांच्या स्वातंत्र्याची बडबड बंद करणे आवश्यक होते. त्यासाठी तर कुशल पत्रकाराऐवजी 'पुढे आलेल्या' नवपत्रकारांना चॅनेलप्रमुख नेमण्यात आले. त्याचाच फायदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने घेतला आणि काँग्रेसविरूद्ध प्रचाराची राळ उडवून दिली. ह्या प्रचारात भाजपाच्या कार्यक्रमापेक्षा काँग्रेसी नेत्यांच्या भ्रष्टाचारावर अधिक भर होता. ह्याउलट मिडिया व्यवहारात काँग्रेस कमी पडली. बड्या देणग्या उभ्या करण्याचे तंत्र माहित असूनही काँग्रेसला हवा तितका पैसा जमवता आला नाही! एकवेळ पैसा जमवला असताही. परंतु त्याचा काँग्रेसला उपयोगही झाला नसता!  कारण, एका पक्षाचे कंत्राट-बुकिंग झाल्यानंतर दुस-या पार्टीस बुकिंग मिळालेही नसते.  
सध्या लहानमोठ्या प्रिंटप्रेस मिडिया कंपन्यांकडे अत्यल्प भांडवल असून मूळ भांडवलाच्या अवघे काही टक्के विदेशी भांडवल घेण्याची त्यांना परवानगी आहे. अनेक मिडिया कंपन्यांचे भांडवलच मुळात इतके अल्प आहे की स्वतःचे भांडवल अधिक परदेशी भांडवल मिळवून भांडवलाची बेरीज जास्त होत नाही. ह्या परिस्थितीत मिडिया कंपन्या चालवण्यासाठी त्यांना पॅकेजची कसरत करावी लागली नाही तरच नवल म्हणावे लागेल. मिडियाच्या भ्रष्टाचाराचे समर्थन करण्याचे कारण नाही. लोकशाहीतली संसद, न्यायसंस्था आणि सरकार हे तीन खांब हलू लागल्यावर मिडियाचा चौथा काल्पनिक खांब डळमळू लागला असेल तर त्याबद्दल आश्चर्य वाटू नये. शेवटी देशातल्या वातावरणाचेच प्रतिबिंब मिडियात पडत असते.
महापालिका आणि जिल्हा परिषद निव़णुकीतही जो उमेदवार प्राभावी 'लक्ष्मीदर्शन' घडवून आणू शकेल किंवा जो उमेदवार 'लक्ष्मीयंत्र' हातात देईल तोच उमेदवार विजयी होणार हे स्पष्ट आहे. भारतीय लोकशाहीचे हे वास्तव प्रत्येकाला स्वीकारावे लागणार असेच चित्र सध्या दिसत आहे. लोकशाहीतला लक्ष्मीदर्शनाचा हा काळ लगेच बदलणार नाही. मात्र, 'शारदादर्शना' काळ जेव्हा सुरू होईल तेव्हा लक्ष्मीदर्शनाचा काळ बदलणारच. देशाच्या जीवनात होणारे हे बदल 'सायकलिक चेंज' स्वरूपाचे असतात.  'सायकलिक चेंज'चा अर्थ चक्र हळुहळू फिरत राहते आणि ते कधी ना कधी मूळ जागी येते. सेवाभावी उमेदवार, कष्टाळू प्रचारक, त्यागी आणि निष्ठावान नेते हे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कालचक्र थांबले की आपण म्हणतो तो जुना काळ पुन्हा नव्याने अवतरणार!
ह्या पार्श्ववभूमीवर ह्या 'मिनी विधानसभा' निवडणुकीच्या निकालाविषयी कसलेही भाष्य करून उपयोग नाही. उडदामाजी काळेगोरे निवडण्यासारखे ते ठरेल. कारण, धनसंपन्न उमेदवारांचा प्रचार आणि निवडणूक व्यवहारातले बारकावे क्षमता नसलेली नवी पिढी पुढे आली आहे. प्राप्त परिस्थितीत भाकित करणे आणि निकालाचा अर्थ विषद करणे भल्याभल्यांना शक्य होईल असे वाटत नाही.

रमेश झवर
www.rameshzawar.com

सारंग दर्शने ह्यांचे भाषण 
फोडिले भांडार 
http://phodile-bhandar.rameshzawar.com/wordpress/ 

No comments: