उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव
मौर्य आणि दिनेश शर्मा ह्या दोघांनाची निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी
राजकारणात सिक्सर मारली आहे. आक्रमक हिंदूत्व आणि विकासाची मोदींनी घातलेली ही सांगड
नरेंद्र मोदींचे राजकीय स्थान पक्के करणार की त्यांच्या पायाखालची वाळू हलकेच
सरकवणार? ह्या प्रश्नाचे
निर्णायक उत्तर कोणालाही देता येणार नाही.
परंतु हा प्रश्न राजकारणात सतत चर्चिला जाणार! हिंदू युवा मोर्चाचे एके काळचे
संस्थापक गोरखपूरच्या गोरखनाथाचे मठाधिपती, आणि बेताल विधाने करण्याबद्दल प्रसिध्द
असलेले योगी आदित्यनाथ हे पाच वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. अशा ह्या योगी
आदित्यनाथांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद मिळणे स्वाभाविक ठरते.
जनमताचा भक्कम पाठिंबा असलेल्या योगी आदित्यनाथना मुख्यमंत्रीपदावर
बसवताना नरेंद्र मोदींना निश्चित सोपे गेले नसणार. योगी आदित्यनाथना खासदारकीचा
राजिनामा द्यायला लावून मुख्यमंत्रीपद देताना मोदी-शहा जोडगोळीने थेट
काँग्रेसस्टाईल काळजी घेतली आहे! योगी आदित्यनाथ हे संन्यासी आहेत. पूर्वश्रमिचे अजयसिंग बिष्ट! नाथसंप्रदायाच्या
दीक्षेची धार असलेले अस्सल ठाकूर. गणित विषयात त्यांच्याकडे बीएस्सीची पदवीही आहे.
कदाचित रूढ अर्थाने योगी आदित्यनाथ राजकारणात तरबेज नसतीलही; परंतु नाथ संप्रदायात
मह्त्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या 'आदेश परंपरे'त मात्र ते निश्चितपणे
मुरलेले आहेत. आदेश परंपरा म्हणजे संप्रदायाप्रति आणि संप्रदायप्रमुखाप्रति म्हणजेच
'नरेंद्रनाथां'प्रति अविचल निष्ठा.
सध्याच्या काळात निष्ठा हा गुण अत्यंत दुर्मिळ आहे. त्यातल्या त्यात निसरड्या
राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या उत्तरप्रदेशातल्या राजकारणात तर निष्ठा अति
दुर्मिळ सद्गुण! कदाचित् हा गुण
हेरून मोदींनी योगीजींना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्रीपद दिले असावे. सत्ता समतोल राखण्याची
काळजी घेण्यासाठीच योगी आदित्यनाथांनी न मागता दोन उपमुख्यमंत्री त्यांना देण्यात
आले.(शिवसेनेला मात्र हक्काचे उपमुख्यमंत्रीपद द्यायला मोदी-शहा तयार नव्हते.) ओबीसी
आणि ब्राह्मण्याची पार्श्वभूमी असलेले दोन उपमुख्यमंत्री देण्यामागे धूर्त चाल
आहे. अंतर्गत बंडाळी माजण्यापूर्वीच त्या बंडाळीचा बंदोबस्त करण्याचे हे सोल्युशन
अनोखे आहे.
एखाद्या संन्याशाने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसावे की बसू नये असाही एक
वांझ प्रश्न बुध्दिवंतांना पडू शकतो. आंध्रच्या मुख्यमंत्रीपदी एन. टी. रामाराव
बसले तेव्हा असा वांझ प्रश्न कुणाला पडला नव्हता. हंसपरंपरेतून आलेले सत्पालमहाराज
ह्यांना काँग्रेसप्रणित पुरोगामी आघाडीने रेल्वे खात्याचे राज्यमंत्रीपद दिले होते
ह्याचा अनेकांना विसर पडला आहे. संन्यासी आणि योगी ह्या दोघात तत्त्वतः फरक नाही.
ज्याचे संकल्प तुटलेले आहेत तो संन्यासी आणि जो कर्मफल ईश्वराला अर्पण करतो तो
योगी, अशी साधी सुटसुटीत व्याख्या नाथंपंथीय दीक्षा घेतलेल्या ज्ञानेश्वरांनी केली
आहे. योगी आदित्यनाथ हे योगीही आहेत. संन्यासीही आहेत. लोकसंग्रहाची आणि
लोकिहिताची कामे करण्याचे व्रत घेण्यास आपल्या संन्याशाला शास्त्राची मनाई नाही.
कायद्याची मनाई नाही. घटनेचीही मनाई नाही.
बेताल वक्तव्ये करण्याची सवय योगी आदित्यनाथांनी प्रयत्नपूर्वक घालवल्यास
लोकहिताची कामे करणारा प्रभावी मुख्यमंत्री असा लौकिक प्राप्त करणे त्यांना अशक्य नाही.
ह्याचा अर्थ त्यांनी मौनात जावे असा नाही. 'देशका विकास और सबका साथ' ही मोदींची घोषणा योगी आदित्यनाथांनी प्रामाणिकपणे अमलात आणली तर राजकारणात
उत्तरप्रदेशचा धाक कायम राहील. त्यांची स्वतःची कार्यशैली एकतंत्री असू शकते. ती
कार्यशैली त्यांना लोकशाहीच्या कोंदणात बसवावी लागेल. केवळ योगी आदित्यनाथांनाच नव्हे
तर, भाजपातील मोदींसकट अनेक नेत्यांना आपल्या कार्यशैलीला लोकशाहीच्या कोंदणात
बसवावे लागेल. लोकशाही म्हणजे तरी काय? विरोधकांची खिल्ली न उडवताना त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्याला
समर्पक उत्तर देण्याची मनोवृत्ती. ही मनोवृत्ती नवसत्ताधारी भाजपा नेते स्वभावात
बाणवणार नाहीत तोपर्यंत त्यांचे जनमानसातले स्थान दृढ होणार नाही.
निवडणुकीत मतदान करताना उमेदवाराचे संभाव्य कर्तृत्व पाहूनच लोक त्यांना
संधी देत असतात. काँग्रेसला तर जनतेने कैक वर्षें संधी दिली. त्या संधीचे सोने
करून उत्तरप्रदेशचा विकास करण्याऐवजी केवळ स्वतःचा विकास केला. म्हणूनच उत्तरप्रदेशातून
काँग्रेस नेस्तनाबूत झाली. मतपेटी ( आता
व्होटिंग मशीन ) सगळ्यांनाच संधी देत असते. नव्हे किंबहुना लोकशाही राज्याचे तेच
महत्त्वाचे वैशिष्टय आहे. संधीचे स्वतःसाठी सोने करणा-यांकडेही जरा जास्तच काळ
दुर्लक्ष करण्याचा जनतेचा स्वभाव आहे. परंतु त्या स्वभावालाही शेवटी मर्यादा आहेत.
काँग्रेसऐवजी बहुजन समाज पार्टी आणि मुलायमसिंगांची समाजवादी पार्टी ह्या दोघांनाही
उत्तरप्रदेशच्या जनतेने संधी दिली होती. त्या संधीचे त्यांनी सोने केले; स्वतःसाठी अन्
स्वतःपुरते! म्हणूनच त्यांना
जनतेने ह्यावेळी पाडले आणि भाजपा निवडून आला! परंतु निवडणुकीतल्या राजकारणाच्या ह्या शाश्वत सत्याचे भान भाजपाला
उरलेले दिसत नाही. काँग्रेसमुक्तीच्या उन्मादी मनःस्थितीतून भाजपाचे आमदार-खासदार बाहेर
पडायला अजूनही तयार नाहीत.
राजकारणांच्या निष्ठा सतत बदलत असतात, लोकांचीही मते बदलत असतात! लोकशाही राजकारणातल्या ह्या शाश्वत सत्याचा एकवेळ
आमदारांना विसर पडला असेल तर ते समजू शकते. परंतु मोदी-शहा आणि स्वतः योगी
आदित्यनाथ आणि त्यांच्या सहकारी नेत्यांना निवडणुकीच्या राजकारणातल्या ह्या शाश्वत
सत्याचा विसर पडल्यास उत्तरप्रदेशातच भाजपाचा पाडाव सुरू झाल्याशिवाय राहणार नाही.
मैनावतीच्या पाशात गुरफटलेल्या मच्छिंदरनाथांना बाहेर काढण्यासाठी शिष्य गोरखनाथ शिंगी
वाजवत गावात आला होता. सत्ताचक्रात गुरफटलेल्या नव्या मच्छिंदरनाथांना बाहेर
काढण्यासाठी नवा गोरखनाथ शिंगी वाजवत येणारच!
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment