महाराष्ट्र टाईम्सचे भूतपूर्व संपादक
गोविंदराव तळकवलर ह्यांचे निधन झाल्याची बातमी कन्फर्म करण्यासाठी सकाळी मला पुणे
आकाशवाणीचे उपसंचालक नितिन केळकर ह्यांचा फोन आला. त्यांच्या निधनाने मराठी
वृत्तपत्रसृष्टीतील लेखणीचा सम्राट काळाच्या उदरात गडप झाला. लोकमान्य टिळक,
गोपाळ
गणेश आगरकर, शि. म. परांजपे, अच्युतराव
कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, आचार्य अत्रे, ह. रा महाजनी
ह्या सगळ्या कर्तृत्ववान संपादकांच्या लेखणीतले सारे गुण गोविंद तळवळकरांच्या
लेखणीत उतरले होते. प्रसंगपरत्वे ते त्यंाच्या लिखाणात दिसतही असत. पाश्चात्य वाङ्मयात
बुडी मारण्याच्या त्यांच्या आवडीमुळे त्यांची शैली समृध्द झाली होती. समकालीन
भारतीय पत्रकारांच्या पत्रकारितेचे गुणविशेष त्यांच्याकडे आपसूक आले होते. त्याचे
खरे कारण हल्लीच्या पत्रकारांना चमत्कारिक वाटण्याचा संभव आहे. साहित्यिक, राजकारणी
आणि पत्रकारांशी संबंध ठेवूनही त्यांच्या गटातटात सामील न होण्याच्या त्यांचा
स्वभाव!
काहीसे एक्कलकोंडे आणि माणूसघाणे वाटणारे
गोविंदराव तळकर जाणूनबुजून कोणाशीही घनिष्ट संबंध ठेवायला तयार नव्हते. जोपर्यंत
स्वतःच्या अभ्युत्कर्षार्थ अहोरात्र फोनाफोनी करून धडपडणा-या लांगूलचालनवाद्यांची
संख्या महाराष्ट्रात कमी नाही. त्यांच्यापसून लांब राहणे त्यांना पसंत होते. लिहून
होत नाही तोपर्यंत आपल्या लेखणीला विटाळ होऊ नये असे त्यांना वाटत असे.
फिक्सिंगवाल्यांना ते सरळ सरळ कटवायचे. अशा मंडळींच्या गप्पांच्या फडात सामील होणे
म्हणजे त्यांच्या अर्धकच्च्या मतांचा नकळत स्वीकार करण्यासारखे ठरते हे त्यांना
माहित होते. म्हणूनच अशा लोकांपासून ते चार हात लांब राहात!
हा सगळा अनुभव त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या
प्रसिध्दी संचनालयात घेतला होता. संधी मिळताच महाराष्ट्र सरकारची नोकरी सोडून ते
लोकसत्तेत दाखल झाले. ह. रा. महाजनींनी त्यांना अग्रलेख आणि एडिट पेजचे काम सोपवले
खरे, परंतु सहसंपादकपदाचे स्वाभाविक प्रमोशन मात्र कधीच दिले नाही.
त्यामुळे पुन्हा संधी मिळताच लोकसत्तेता सोडून ते महाराष्ट्र टाईम्सच्या स्थापना
काळात महाराष्ट्र टाईम्समध्ये रूजू झाले. महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यांना संपादकपद
मिळाले, पण व्दा, भ. कर्णिक निवृत्त झाल्यावर. त्यांच्या काळात
पहिल्या पानापासून ते रविवार आवृत्तीपर्यंत महाराष्ट्र टाईम्स बदलला. बदलत राहिला!
गाणं, नाटक आणि सिनेमा हे मराठी माणसाचं वेड. ते लक्षात घेऊन तळवलकारांनी
रविवार आवृत्तीच्या संपादकांना उत्तेजन दिले. वृत्तसंपादक दि. वि, गोखले
ह्यांच्या प्रांतात तर तळवलकांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. वस्तुतः गोखले ह्यांची
राजकीय मते संघपठडीतली तर गोविंदरावांकडे रॉयवादी विचारांचा वारसा! ह्या दोघांचे
मेतकुट इतके उत्तम जमले की अनेकांचा त्यावर विश्वास बसत नसे.
राजकारण असो की साहित्यकारण, अर्थकारण
असो की औद्योगिक कारण, 'चालू' मंडळींना लांब ठेवण्यावर त्यांचा
कटाक्ष होता. चुकणा-या राजकारण्यांना ठोकण्याच्या बाबतीत ते कधीच चुकले नाहीत.
नागरी पुरवठा मंत्री भाऊसाहेब वर्तकांवर अग्रलेख लिहीताना जनरल नियाझी असे शीर्षक
देताना ते मुळीच कचरले नाही. यशवंतराव चव्हाणांच्या कर्तृत्वाबद्दल मात्र
त्यांच्या मनात आदराची भावना होती. तरीही त्यांच्या धोरणावर ते अधुनमधून टीका करतच
असत. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर डून बाईज अशी हेटाळणी त्यांनी केली तर
नवाकाळचो संपादक निळकंठ खाडिलकर ह्यांच्या अग्रलेखाच उल्लेख होताच 'मी
बालवाङ्मय वाचत नाही', असे बेमुर्वतखोर उत्तर त्यांनी दिले होते.
गदिमांच्या वक्तव्यावर लिहताना 'अण्णा, हात आवरा'
असे
त्यांनी लिहीले तर वसंत कानेटकारांच्या को-या करकरीत नाटकाचा एक आख्खा प्रवेशच
त्यांनी रविवार पुरवणीत छापला!
त्यांच्या लेखणीतच इतकी ताकद होती की तथाकथित
जनसंपर्काची त्यांना कधीच आवश्यकता भासली नाही. माझे जळगावचे मित्र भागवतराव चौधरी
ह्यांना तळवळकरांना भेटायची इच्छा होती. मी त्यांना म्हटले बहुधा आपल्याला त्यांची
भेट मिळणार नाही. परंतु आश्चर्यांची गोष्ट म्हणजे त्यांनी मला पाच वाजता भेटीला
बोलावले. दहा मिनीटां आटपा ह्या बोलीवर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये शिरलो. परंतु
प्रत्यक्षात भारावलेल्या अवस्थेत आम्ही एक तासानंतर बाहेर पडलो. तासाभरात त्यांनी
जळगाव जिल्ह्याची सारी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि साहित्यिक
कुंडलीच समजावून घेतली! त्यांच्या लेखणीला धार का असते हे मला त्या भेटीनंतर
लक्षात आले.
असा हा लेखणीचा सम्राट आता होणे नाही!
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment