Saturday, March 11, 2017

'झुकानेवाला'चा विजय!

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए! उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड ह्या दोन्ही राज्यात भाजपाला मिळालेला विजय हा भाजपाचा नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचा आहे. आपल्या देशाला करिष्मा असलेला नेता हवा असतो. मोदींच्या रूपाने तो देशाला मिळाला. जनतेला अभ्यासू नेता नको आहे. जमेल तशी आणि जमेल तेव्हा इतरांवर सतत कुरघोडी करून स्वतःचे घोडे नाचवणारा नेता जनतेला हवा आहे. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड ( एके काळचा उत्तरप्रदेशचाच बव्हंश भाग ) विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले ह्याबद्द्ल आश्चर्य वाटायला नको. अशाच प्रकारचा विजय पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्यांच्याकडे वा त्यांनी नेमलेल्या नेत्यांकडे काँग्रेसचे नेतृत्व होते तेव्हा काँग्रेसलाही मिळत असे. इंदिरा गांधी ह्यांच्या नावावर दगडालादेखील जनतेने निवडून दिले होते!  काँग्रेसच्या सत्ताकाळात तत्कालीन विरोधी पक्षांची जी गत होत होती तीच गत आज काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांची झाली.
समाजवादी पक्षात ऐन निवडणुकीच्या वेळी उद्भवलेले पितापुत्रातील भांडण, नेतृत्वहीन काँग्रेस, दलितत्व हेच ज्यांचे भांडवल त्या मायावतींची बसपा किंवा अचाट कल्पना करून राजकीय मन्वंतर घडवून राजकारणात उतरलेला आम आदमीसारखा पक्ष ह्या सगळ्यांचे भवितव्य विधानसभा निकालाने सील झाले. मोदींविरूध्द लाट कधी येते ह्याची वाट पाहण्याखेरीज त्यांना राजकीय कामगिरी बजावण्याची संधी मिळणे अवघडच राहणार आहे. विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचा दावा अमित शहा दावा करत आहेत. मात्र, त्यांचा दावा पोकळ आहे. गोवा, पंजाब आणि मणीपूरच्या जनतेला भाजपाला अभिप्रेत असलेला भाजपाप्रणित विकास नको आहे असा अमित शहांच्या दाव्याचा अर्थ असल्याचे लोकांच्या लक्षात आले तरी खुद्द अमितभाईंच्या लक्षात आले नाही.
'नमामि गंगे' प्रकल्पाचा डांगोरा पिटण्यात आला. परंतु अजून तरी गंगा शुचिर्भूत झालेली नाही हे गंगेच्या काठी असलेला प्रत्येक शहरवासी हे जाणून आहे. उमा भारती मात्र प्रकल्पाच्या प्रेझेंटेशनमध्येच अडकलेल्या आहेत. भारी नोटा चलनातून बाद करून काळ्या पैशाविरूद्ध पुकारलेल्या युध्दास जनतेने पावती दिली हाही भाजपाचा दावा मान्य करता येण्यासारखा नाही. मुळात काळा पैसा म्हणजे काय हेच जनतेला समजत नाही. काळा पैशाविरूद्ध युद्ध ही राजकारणाची भाषा आहे. ती गरिबांना झुलवण्यासाठी आहे. त्रास भोगण्याची सवय असलेल्या गरिबांना मात्र ते उमगलेले नाही. 'गरीबी हटाव' ह्या घोषणेचे जे राजकारण झाले, नव्हे केले गेले! तेच राजकारण नरेंद्र मोदींच्या नित्य नव्या घोषणांचे सुरू आहे! मुळात भाजपा आणि काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांची जातकुळी एकच आहे हे निवडणूक प्रचाराच्या काळात दिसले. पुढील वर्षी येणा-या अन्य राज्यांच्या निवडणुकातही ते दिसेल.
भारतीय लोकशाहीत तुल्यबळ विरोधी पक्षाचा अभाव हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे वास्तव ह्याही विधानसभा निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा निष्पन्न झाले. एके काळी भाजपाची ( तेव्हाच्या जनसंघाची ) जी स्थिती होती तीच स्थिती आजच्या काँग्रेसची स्थिती आहे. भाषा गरिबांना चुचकारण्याची आहे, फक्त राजकारणी बदलले! काँग्रेसचीच भाषा भाजपाच्या तोंडी आहे. काँग्रेसच्या तोंडी सर्वसमावेशकतेची भाषा होती. भाजपाच्या तोंडीही सर्वसमावेशतेची भाषा आहे. परंतु त्या भाषेत हिंदूत्वाखेरीज अन्य कुणाचाही समावेश नाही. विकासाच्या भाषेचेही हेच त्रांगडे आहे! नरेंद्र मोदी ह्यांचे उजवे हात अर्थमंत्री अरूण जेटली ह्यांच्या तोंडी जी विकासाची भाषा आहे त्या भाषेत विदेशी गुंतवणूकदारांना झुकते माप तर कर भरणा-या नागरिकांना लाथा आहेत. अत्यल्प व्याजदर, जीडीपी ह्याखेरीज त्यांच्याकडे अन्य मुद्देच नाहीत. मुळात विचारमंथन नसेल तर मुद्दे येणार कुठून?  गेल्या अडीच वर्षांत विदेशी गुंतवणूकदारांसाठी पायघड्या घालण्यात जेटली व्यग्र आहेत.
जे राजकीय पातळीवर तेच प्रशाकीय पातळीवर!  नेत्यांना वाचाळतेचे वरदान तर प्रशासनास नाकर्तेपणाचे वरदान! दडपून बोलणारे पंतप्रधान मोदी, युतीआघाडीच्या राजकारणात भांडणतंट्याला आलेला ऊत, वैमनस्याचा विसर न पडलेले मंत्रिमंडळात एकमेकांचे सहकारी हे सगळे भाजपा राज्यात जोरात सुरू आहे. काँग्रेसवाल्यांची खिल्ली उडवण्याची नेतृत्वशैली भाजपा नेत्यांनी पुरेपर अंगी बाणवली आहे. सत्तेबरोबर येणारे शहाणपण भाजपाला मान्य नाही. आज देशात काय चित्र आहे? निष्प्रभ रिझर्व बँक, ताशेरेबाजीग्रस्त न्यायासंस्था, सर्वोच्च तपाससंस्थांच्या प्रमुखांची हलगर्जी, लोकप्रतिनिधींचे सर्वोच्च सभागृह आणि प्रसारमाध्यमे ह्याविषयी बेफिकीरी हे सगळे चित्र अस्वस्थ करणारे आहे. ह्या संस्थांबद्दल जनतेला एकेकाळी लोकांना आदर होता. अलीकडे आदराची भावना फारशी उरलेली नाही. साध्या मतदार याद्यांच्या दुरूस्तीचे कामदेखील प्रशासनाला अचूक करता आले नाही. अजूनही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडून येतात! डिजिटल पेमेंट करण्याची राज्यकर्त्यांची भाषा तर कमिशनबाजी ही बँकांची भाषा! कमिशनबाजीचा हा अनुभव सर्व  क्षेत्रात व्यापून उरला आहे. महागडा शाळाकॉलेज प्रवेश, बेकारी, बेबंद वेतनकपात, मनासारखे पीक येऊनही शेतक-यांची हलाखी हे चित्र बदलण्याची आशा नाही. शहरी भागात गळ्यातले मंगळसूत्र खेचण्यापासून ते मुलीबाळीवरील बलात्काराचे गुन्हे तर ग्रामीण भागात जातीधर्माच्या नावाखाली व्देषभावनेचे बेफाम प्रकटीकरण ह्यामुळे देश पीडित आहे. वृध्द आणि स्त्रियांची अनारोग्याची स्थिती पूर्वीइतकीच दयनीय आहे. हे सगळे दूर करण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती काँग्रेसकडे नव्हती म्हणून भाजपाला जनतेने सत्ता दिली. पण जनतेचे नैराश्य संपलेले नाही. राजकीय इच्छाशक्तीचे अभिवचन अजून तरी जेत्यांकडून मिळालेले नाही. काय पाहायला मिळत असेल तर विजयाचा उन्माद आणि हिडीस जल्लोष!

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: