पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप
ह्यांनी व्हाईट हाऊसमध्ये मुत्सद्दी राजकारणातल्या रीतीनुसार भव्य स्वागत केले. एके कळी नेहरूंचे सोविएत
रशियात जसे दिव्यभव्य स्वागत सोहळे व्हायचे अगदी त्याच थाटात अध्यक्ष ट्रंप
ह्यांनीदेखील मोदींच्या दिव्यभव्य स्वागताचा बार उडवला. जानेवारीपासून अध्यक्षपदी
विराजमान झाल्यानंतर ट्रंपना वेगवेगळ्या आपत्तींना
तोंड द्यावे लागले अशातला भाग नाही; परंतु ते मुरब्बी राजकारणी नाहीत हे अनेक वेळा स्पष्ट झाले. विशेषतः नको
त्या गोष्टी बोलण्याची ट्रंप ह्यांची खोड जात नसल्यामुळे टपून बसलेल्या मिडियाने
त्यांची रेवडी उडवायला सुरूवात केली. अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचे पुतिन ह्यांच्या
कथित हस्तक्षेपासंबंधी करण्यात आलेल्या आरोपावरून फेडरल ब्युरो प्रमुखाशी तर
त्यांचे वाजलेच होते. त्याखेरीज नाटोचा खर्च, पर्यावरणविषयक पॅरीस करारतून त्यांनी
घेतलेली माघार इत्यादि कारणांवरून ट्रंप ह्यांच्याविरूध्द टीकेची झोड उठली. त्या टीकेच्या
पार्श्वभूमीवर त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणात नरेंद्र मोदींच्या रूपाने मित्रच
गवसला. जागतिक राजकारणात वैयक्तिक लौकिक प्रस्थापित करण्याची मोदी आणि ट्रंप ह्या
दोघांनाही मनोमन इच्छा असल्याने दोघांची मैत्री काही काळ तरी निर्वेध चालू राहणार.
परराष्ट्र राजकारणात दोन देशात होणा-या
करारांची शब्दरचना मतलबी असली तरी दोन्ही देशात जे ठरले त्याला वेळोवेळी मुरड घालण्याचा
प्रसंग अनेकदा येतो. त्यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यात प्रथम दर्शनी निर्माण झालेल्या
मैत्रीचा निश्चित उपयोग होतच असतो. मोदी आणि ट्रंप हे दोन्ही नेते त्यादृष्टीने जवळ
आले आहेत.
'अमेरिका फर्स्ट' ही ट्रंप ह्यांची
घोषणा तर 'मेक इन इंडिया' ही मोदींची घोषणा.
दोघांच्या घोषणा एकमेकांना पूरक आहेत. त्यांच्या दोघांच्या घोषणा ह्या घोषणाच
असल्यामुळे त्या दोघांनाही आपल्या धोरणाला मुरड घालावीच लागणार आहे. एका परीने त्याची
सुरूवातही झाली. एच1 बी व्हिसाचा विषय मुळातच न काढण्यात आला नाही तर केवळ चीनी
समुद्रातील वावर ह्यापुरता हा विषय संकुचित न ठेवता इंडो पॅसिफिक असा उल्लेख करून
चीनबरोबरच्या कटकटींचा विषय ट्रंप-मोदी चर्चेतून खुबीदारपणे वगळला. एच-1 बी
विषयाचा आढावा घेतला जात असल्याची सबब पुढे करून हा विषय दोन्ही नेत्यांच्या चर्चेत
येऊ दिला नाही. दोन्ही नेत्यांच्या निवेदनात आशिया खंडातील राजकीय परिस्थितीचा
संदर्भ टाळता येणे शक्यच नाही. म्हणून दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश म्हणून
पाकिस्तानचा सरळ सरळ नामोल्लेख शिखऱ परिषदेत करण्यात आला तर 'इंडो-पॅसिफिक' समुद्रात स्वैरसंचार,
ह्या प्रदेशावरून उड्डाण वगैरे विशेषणे वापरून चीनच्या दंडेलीचा उल्लेख टाळण्यात
आला. थोडक्यात, राजकीय भांडणतंट्याचा स्पष्ट उल्लेख न करता दोन्ही देशांनी भावी
काळात आपापल्या देशांचा निर्णय घेण्याचा मार्ग दोन्ही देशांनी खुला ठेवला आहे.
एकूण ट्रंप ह्यांची भूमिका पुष्कळशी भारतानुकूल असल्याचे ह्या निवेदनात
दिसून आले. दहशतवादाचा पुरस्कार केल्याबद्दल अमेरिका केवळ सरळ सरळ पाकिस्तानला
जबाबादार धरायला तयार नाही तर दहशतवाद्यांचा म्होरक्या सईद सलाउद्दीनला जागतिक
दहशतवादी घोषित करून अमेरिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ह्यापुढचे पाऊल म्हणजे
अफगणिस्न-पाकिस्तानबद्दल भारतानुकूल सयुक्तिक भूमिका घेण्याची भारताची इच्छादेखील
अमेरिकन परराष्ट्र खात्याने मान्य केली. ह्या सगळ्यात नवे काहीच नाही. नवे काय
असेल तर मोदी आणि ओबामांच्या मैत्रीप्रमाणे मोदी आणि ट्रंप ह्यांची गळाभेट!
भारत-अमेरिका व्यापारी सहकार्याचे पर्व दोन्ही देशात वाजपेयींच्या काळातच
सुरू झाले होते. वाजपेयीकालीन करारांच्या थोडेसे पुढे पाऊल टाकणे ही दोन्ही देशांची
गरज होती. भारत अमेरिका व्यापार सध्यातरी भारताला जास्त अनुकूल आहे. कदाचित् तो
समसमा करण्याच्या हेतूने एफ 16 एफ 17 लढाऊ विमाने अमेरिकेकडून खरेदी करण्याचे
मोदींनी मान्य केले असावे. येत्या कळात भारताला इंधनक्षम युरेनियमची गरज भासणार
आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय न्युक्लर ग्रुपकडून भारताने इंधनक्षम युरेनियम किंवा
हवे ते आण्विक इंधन भारताने घेणे अमेरिकेला पुरेसे आहे. ट्रंप ह्यांच्या धोरणामुळे
भारताच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यात उद्योगाने ह्यापूर्वीच मार खाल्ला आहे हे
निश्चित. परंतु अमेरिकेत रोजगारनिर्मिती करण्यासाठी अमेरिकेतच सॉफ्टवेअर कंपन्या
स्थापन करण्याचे भारतातल्या कंपन्यांनी जाहीर केल्यामुळे ट्रंपमहोदय संतुष्ट झाले
असावेत. भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांना सर्व प्रकारे मदत करू असे आश्वासन मोदींनी
ट्रंपकडून घ्यायला हवे होते. पण प्रथम भेट आणि तीही भारावून गेलेल्या वातावरणात
झाल्याने भारताने हा विषय काढला नाही. भारताला आणि मोदींना मित्र मानल्याने कदाचित्
पुण्यातल्याप्रमाणे अन्य शहरातही ट्रंप टॉवर्स उभे राहतील.
असो. भारत-अमेरिका संबंधांचे प्रकरण दोन्ही देशांच्या परराष्ट्र खात्याने
एकूण नीट हाताळले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा आतल्या पानावरून
पहिल्या पानावर आला!
रमेश झवर