भाजपाचे राष्ट्पतीपदाचे उमेदवार रामनाथ
कोविंद तर मीरा कुमार ह्या काँग्रेसच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार! रामनाथ कोविंद ह्यांच्यासारखा अल्पपरिचित का
होईना परंतु दलित उमेदवार शोधून काढताना भाजपाने
काँग्रेसवर नक्कीच कुरघोडी केली. काँग्रेस नेतेदेखील कच्च्या गुरूचे चेले नाहीत. एकूणच
निष्क्रीय राजकारणाच्या अडगळीत पडलेल्या मीरा कुमारींना शोधून काढून त्यांना काँग्रेसने
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. काँग्रेसची ही चाल केवळ भाजपाच्या बेगडी
दलितप्रेमाच्या राजकारणाला शह देण्यासाठीच आहे! भाजपाच्या कुरघोडीला सवाई कुरघोडी हेच काँग्रेसचे
उत्तर आहे. दलित उमेदावाराविरूद्ध दलित उमेदवार उभा करण्याचे हे राजकारण तसे नवे
नाही. फाटाफुटीच्या ह्या राजकारणाला साठ वर्षांची परंपरा आहे. फाटाफुटीच्य जोडीला जातीयवाद,
भ्रष्टाचार, मतदारांना लालूच, खोटी सहानुभूती आणि वेळप्रसंगी धाकदपटशा ह्या
लोकशाहीविरोधी गुणांनी निवडणुकांचे राजकारण सदैव ग्रासलेले आहे. निवडणुकांच्या
राजकारणाचा हा गढूळ प्रवाह राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही पसरत चालला आहे. मीरा कुमार
आणि रामनाथ कोविंद ह्या दोन्ही उमेदवारांतील लढतीला थेट दलित विरूद्ध दलित असे
स्वरूप आले नाही. येणाराही नाही हे खरे; परंतु ते बीजरूपाने दोन्ही पक्षांच्या
नेत्यांच्या मनात आहेच.
ह्या ताज्या अधोगतीचे खापर नेहमीप्रमाणे मोदीभक्त काँग्रेसवर फोडणार हे उघडच
आहे. परंतु रामनाथ कोविंद ह्यांचे राजकीय कारकीर्द इतकी फिकी आहे की सामान्यतः
त्यांना उमेदवारी देण्याचा विचार भाजपा नेत्यांच्या मनातही आला नसता. परंतु दलित राष्ट्रपतीपदासाठी
नेताच हवा असे भाजपाने आधीच ठरवल्याने रामनाथ कोविंद ह्यांचे नाव पुढे आले आणि
मोदी-शहांनी त्यांच्या नावांची घोषणा करून टाकली. सुशीलकुमार शिंदेसारख्या महाराष्ट्रातल्या
कर्तबगार नेत्याला उमेदवारी देण्यापेक्षा उत्तरप्रदेश आणि बिहारच्या नेत्याला उमेदवारी
दिली तर दलितांबरोबर प्रांतांनाही खूश करण्याचा विचार काँग्रेस नेत्यांनी केला. उमेदवारीच्या
राजकारणातले हे बारकावे ज्याप्रमाणे अंध मोदीभक्तांच्या टाळक्यात येणार नाही त्याप्रमाणे
उत्तरेकडील राजकारणापलीकडे विचार न करणा-या निष्ठावंत काँग्रेसभक्तांच्याही टाळक्यात
येणार नाही. रामनाथ कोविंद ह्यांची उमेदवारी हे देशातलली सत्ता प्रदीर्घ काळ
टिकवण्याचे साधन म्हणूनच वापरायचे असल्याने भाजपा नेत्यांनी ठरवले तर मीरा कुमारी
विजयी होण्याची शक्यता नाही हे पुरेपूर माहित असूनही भाजपा उमेदवाराला प्रतिकात्मक
विरोध करण्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीनेही आधीच ठरवून टाकले.
देशात रालोआकडे झुकलेला विरोधकांचा एक गट तर काँग्रेस पुरोगामी आघाडीकडे
झुकलेला विरोधकांचा दुसरा गट! राजकारणातले
हे जुने समीकरण नव्या नावाने वेळोवेळी सुरू होते आणि राजकारणाची गरज संपली की ते
संपुष्टात येते. सत्ताधा-यांसमवेत वाटचाल करणारा आणि सत्ताधा-यांच्या विरोधात काम
करणारा ही देशाची आडवीउभी विभागणी काँग्रेस सत्ताकाळात होती. भाजपा सत्ताकाळातही ती
कायम आहे. ही आडवीउभी विभागणी पुसून टाकण्याची ताकद आणि करिष्मा असलेल्या नेत्याची
उणीव अजून भासते. ती उणीव पंतप्रधान नरेंद्र मोदींना भरून काढता आलेली नाही.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनिमित्त दिसून आलेले हे वास्तव कोणाला आवडो न
आवडो, पण ते अस्तित्वात आहे हे नाकारता येणार नाही. हे राजकारणच प्रगल्भ लोकशाहीच्या
दिशेने वाटचाल करण्याच्या बाबतीत अडथळा ठरला आहे. गेल्या 25 वर्षांत आपण प्रगल्भतेऐवजी
प्रतिकात्मकतेकडे निघालो आहोत. राष्ट्रपती निवडणकीत सुरू झालेल्या दलित राजकारणाचा
ह्यापेक्षा वेगळा अर्थबोध नाही.
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment