छोटी पूंजी दुकानदार को खाती है बडी पूंजी
ग्राहक को खाती है! देशभरातल्या एक कोटी व्यापा-यांना लागू पडणारे हे सत्य शेतक-यांना जरा
जास्तच लागू पडते. शेतक-यांना 34 हजार 12 कोटींची कर्जे माफ करण्याचा निर्णय फडणविसांनी
घेतला. अन्य राज्यातल्या एकत्रित कर्जमाफीपेक्षा महाराष्ट्रातल्या एकत्रित
कर्जमाफीचा आकडा निश्चित मोठा आहे. परंतु कर्जमाफीचा मोठा आकडा ही काही अभिमानाने
मिरवण्याची बाब नाही. महाराष्ट्रात शेतीचा खर्च अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक
आहे आणि अन्य कोणत्याही राज्यातल्या शेतक-यांपेक्षा महाराष्ट्रातील शेतक-यांचे
उत्पन्न कमी आहे. महाराष्ट्राकडे कृषीतंत्र अन्य कोणत्याही राज्यापेक्षा अधिक आहे.
निदान ते कमी नक्कीच नाही. परंतु शेतक-यांना पीक काढणे परवडत नाही. जे शेत मोठ्या
शेतक-यांना भरभरून देते तेच शेत लहान शेतक-यांना मात्र उपाशी ठेवते. म्हणूनच शेती मोठी
असो की लहान, शेतीची सर्व कामे यांत्रिक पध्दतीने आणि वेळच्या वेळी हवामानाचा
मुहूर्त साधून वेळच्या वेळी केली तरच शेतीतून सरप्लस उत्पन्न निघू शकेल. म्हणूनच
शेती करण्यासाठी लागणारी सर्व यांत्रिक साधने खेरदी करण्यासाठी तडकाफडकी कर्जे
दिले गेले पाहिजे. अन्यथा कर्जमाफीमुळे तूर्तास खुशाललेला शेतकरी पुढील एकदोन
हंगामापर्यंत पुन्हा संकटाच्या गर्तेत सापडून कर्जबुडव्या, कर्जापायी आत्महत्या
करणारा हा राज्यातील शेतक-यांचा लौकिक पुसला जाणार नाही. शिवसेना सत्तेत राहून
शेतक-यांच्या बाजूने उभी राहिली ह्याबद्दल उध्दवजींचे कौतुक केले पाहिजे.
त्याचबरोबर इथे हेही नमूद करणे भाग आहे की दोन्ही काँग्रेस आणि नव्याने उदयास आलेले
शेतक-यांचे नेते ह्यांनी शेतक-यांसाठी लढा दिला नसता तर उशिरा का होईना, मुख्यमंत्री
देवेंद्र फ़डणवीसांनी कर्जमाफीचा गांभीर्याने विचार केला नसता. विकासाचे राजकारण
करू नये हेच पथ्य शेतक-यांच्या प्रश्वांविषयी जेव्हा जाईल तो महाराष्ट्राचा सुदिन! कर्ज काढून शेतक-यांची सरकारने कर्जे माफ केली हे योग्यच आहे. आता आणखी
थोडे कर्ज काढून शेती करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची यंत्रे खरेदी करण्यासाठी शंभर
टक्के कर्जे दिली दिली पाहिजे. तरच शेतक-यांच्या पायात रूतलेला नादारीचा काटा निघू
शकेल. यांत्रिक शेतीमुळे बेकारी वाढेल असल्या वादात मी जाऊ इच्छित नाही. शहरात
संगणक आणि रोबो तर ग्रामीण भागात शेतीसाठी लागणारी सर्व तणनाशक फवारणी, पेरणी,
तोडणी, उफननी ह्यासारखी सर्व यंत्रे! ही यंत्रे चालवणे
मुळीच अवघड नाही. एकदोन दिवसांच्या प्रशिक्षणाने जमू शकते. हो. आणखी एक --
सगळीच्या सगळी जमीन लागवडीखाली आणा. केरळात नारळ लावलेला नाही अशी एक फूटही जागा
नाही. तसे महाराष्ट्रभूमीत जिथे काही लावले नाही अशी एकही फूट जागा दिसता कामा
नये. शेती जगवा, शेतकरी जगवा हाच बदलत्या महाराष्ट्राचा मंत्र आहे!
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment