अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका वार्ताहराला बोलावून मुलाखत
दिली. 'जैसी सोच वैसा शब्द' हे एक वाक्य उच्चारून मोदींनी राफेल प्रकरणाच्या अनुषांगाने
त्यांच्यावर राहूल गांधींनी केलेल्या विशिष्ट आरोपाचा महत्त्वाचा मुद्दा गाळून
टाकला. संसदेत काँग्रेसने केलेल्या टिकेच्या भडिमाराला उत्तर देण्याचेही पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी टाळलेच! राफेल खरेदी व्यवहारातील सरकारचा, खरे तर,
पंतप्रधानांचाच बचाव करताना जेटली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राचाच
आधार घटट् पकडून पंतप्रधानांच्या आणि
संरक्षण मंत्री ह्या दोन्ही भूमिकेत शिरले. न्यायालयीन निकालाचा आधार घट्ट पकडून
ठेवत जेटलींनी जुन्याच उत्तराची पुनरावृत्ती तर केलीच; शिवाय राहूल गांधी खोटे बोलत असल्याचा प्रत्यारोप
केला.
राफेल विमानांचे
भारतात उत्पादन करण्यासाठी फ्रान्सबरोबर करण्यात आलेल्या करारात ऑफसेट कंपनी
म्हणून हिंदुस्तान एरानॉटिक्सऐवजी नव्याने स्थापन झालेल्या रिलायन्स डिफेन्सचे नाव
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचवले ह्या आरोपाला जेटलींनी जुनेच उत्तर दिले. रिलायन्स
डिफेन्सचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुचवल्याचे माजी फ्रेंच अध्यक्ष होलांदे
ह्यांनी राहूल गांधींना सांगितले होते खरे; परंतु दुस-याच
दिवशी होलांदेंनी त्याचा
इन्कार केल्यामुळे राहूल गांधी तोंडघशी पडले ह्याचाच
फायदा जेटलींनी घेतला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या वक्तव्याचे उपकथानक
वगळता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापलीकडे राफेल प्रकरणावर संसदीय चर्चा फारशी
पुढे जाऊ शकली नाही.
संसदेच्या संयुक्त
समितीमार्फत राफेल प्रकरणाची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी सरकारने फेटाळल्यामुळे
हा विषय आता तरी जेथल्या तेथेच ठप्प झाल्यात जमा आहे. आता हा विषय निवडणुकीच्या
प्रचारसभात वापरण्याचा काँग्रेसचा मार्ग जसा मोकळा झाला तसा काँग्रेस
नेते राहूल गांधी खोटारडे असल्याचा आरोप करण्याचा भाजपाचा मार्ग मोकळा झाला. आरोप
करण्याचा आणि वैयक्तिक निंदानालस्ती करण्याचे रान भाजपा आणि काँग्रेसला मोकळे मिळणार! राफेल प्रकरणाननिमित्त संसदीय राजकारणाच्या मर्यादा पुन्हा एकदा
स्पष्ट झाल्या.
लोकसभा
चर्चा आरोपप्रत्यारोपांच्या पलीकडे जाऊ शकलेली नाही. त्याचा एक परिणाम असा की लोकसभा बेफाट आरोप आणि निंदानालस्ती ह्यातून आपल्या
निवडणुकीतल्या प्रचारसभांची सुटका नाही. माझ्या भ्रष्टाचाराचा मुद्दा बाजूला ठेवा,
आधी तुमच्या भ्रष्टाचाराचे बोला, ह्या अंगाने राष्ट्रीय नेत्यांच्या भाषणे होत राहिली
तर सामान्य
वकुबाच्या नेत्यांना जानवं, शेंडी, हनुमानाची
जात ह्याखेरीज अन्य विषय शिल्ल्क उरलेले नाही. देशात घसरत चाललेले जीवनमान,
पर्यावरण, कृषि-वाणिज्य, शिक्षण, संशोधन, वाढते अनारोग्य, वाढती गुन्हेगारी, कर्जबुडवेगिरीमुळे
बँकांची झालेली खस्ता हालत हे विषय आहेत. ते फक्त तोंडी लावण्यापुरते !
नोक-यातले आरक्षण,
सीमातंटे, स्पेशल पॅकेज, नद्यांचे पाणीवाटप जातीवाद-जमातवाद, भाषिक गट आणि त्यांचे
प्रश्न हे सगळे सुखनैव नांदत रहाहतील असेच चित्र देशात दिसत आहे.
काँग्रसने 70 वर्ष
सत्ता उपभोगली, आम्हाला 10 वर्षे तरी द्याल की नाही? हा
एकमेव प्रश्न भाजपा नेते गेली चारसाडेचार वर्षें जनतेला विचारत
आले. हाच प्रश्न आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा जनतेला विचारत राहणार! जनतेच्या
मनातही अर्थात काही प्रश्न उमटत असतात ह्याचे मात्र भाजपाला भान दिसत नाही. कोणते
प्रश्न जनतेच्या मनात उमटू शकतील? उदाहरणार्थ राफेल विमान
खरेदी व्यवहारात पंतप्रधानांनी जर खरोखरच काही चुकीचे केले नसेल तर संसदीय चौकशीला
नकार का? 'कर नाही
त्याला डर कशाला?' असा साधासुधा प्रश्न सामान्य माणसांच्या मनात
उमटलेला असू शकेल! महिन्यातून एकदा आकाशवाणीवर 'मनकी बात' सांगून जनतेशी मुक्तसंवाद
साधणारे पंतप्रधान 137 कोटी जनतेचे मनोगत व्यक्त करणा-या संसदेत प्रतिसाद देण्याचे
पंतप्रधान का टाळू इच्छितात? वर्षाच्या पहिल्या दिवशी देशातल्या प्रमुख मुद्रित
आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नोप्रश्नांची उत्तरे
देण्याचे पंतप्रधानांनी का टाळले? त्यांना प्रश्न नको, उपप्रश्न तर बिल्कूल नको
आहेत! आपल्या
कारभारशैलीसंबंधी तर कुठलीही शंकाच कुणी उपस्थित करू नये, अशीच त्यांची सुप्त इच्छा
असावी.
रमेश झवर
www.rameshzawar.com
No comments:
Post a Comment