Wednesday, January 23, 2019

राजकारण बदलणारा होकार!

भारतीय जनता पार्टी, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी आणि देशभरातल्या असंख्य लहानमोठ्या पक्षांविरूद्ध दोन हात करण्यासाठी इंदिराजींची नात आणि राहूल गांधींची भगिनी प्रियंका गांधी-वडेरा ह्यांना पूर्व उत्तरप्रदेशाचे काँग्रेसचे चिटणीसपद देऊन राहल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तोफ डागली. प्रियंका यशस्वी झाल्या तर काँग्रेसलासत्तेचा सोपान प्राप्त होऊ शकेल आणि अयशस्वी ठरल्या तर काँग्रेसचे नुकसान काहीच नाही! आतापर्यंत राहूल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेणा-या प्रियंकांनी काँग्रेसमधले लहानमोठे कोणतेही पद भूषवले नाही की कधी कोणतीही निवडणूक लढवण्याचीही इच्छा बाळगली नाही. त्यांची पूर्व उत्तरप्रदेशच्या कांग्रेस सरटिचणीसपदाची नेमणूक करताना आपले सहकारी ज्योतिरादित्य सिंदिया ह्यांच्यावर पश्चिम उत्तरप्रदेशाची जबाबदारीही राहूल गांधींनी सोपवली. 
भाजपाला पराभूत करण्यासाठी उत्तरप्रदेशासह देशभरात अन्य पक्षांबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न राहूल गांधींनी वर्षभऱ चालवला होता. कदाचित हा प्रयत्न करत असताना अनेक नेत्यांची कोती मनोवृत्ती राहूल गांधींनी जवळून पाहिली असावी. भाजापाला विरोध करण्यासाठी एकत्र येण्यापेक्षा स्वतःचे घोडे दामटण्यावरच सगळ्यांचा भर असल्याचे लक्षात आल्यावर राहूल गांधींनी घराण्याचे ठेवणीतले अस्त्र बाहेर काढले. 'उत्तरप्रदेशात काँग्रेस पुढे नेण्याची' जबाबदारी  प्रियंकावर सोपवून ह्यापुढे आक्रमक पवित्रा स्वीकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक हा काँग्रेसच्या जीवनमरणाचा प्रश्न ते मानत आहेत हे स्पष्ट होते. त्यांचा हा निर्णय हा 'हतो वा प्राप्यसि' धर्तीचाच आहे.
गेली अनेक वर्षे राहूल गांधी घराणेशाहीच्या टीकेबरोबरच वैयक्तिक निंदानालस्तीलाही तोंड द्यावे लागले. प्रियंकाच्या राजकारण प्रवेशावर नेहमीप्रमाणे भाजपाने घराणेशाहीची शिक्का मारला. वास्तविक काँगेसवर घराणेशाहीचा आरोप करण्याचा विरोधकांना नैतिक अधिकार नाही. भाजपासकट सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या मुलामुलींना आणि नातेवाईकांना आजवर निवडणुकात तिकीटे दिली आणि सत्तेची पदे दिली. जम्मूकाश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असे एकही राज्य नाही की ज्या राज्यात नेत्यांची मुलेमुली सत्तेच्या राजकारणात सहभागी झालेली ऩाहीत. काँग्रेसचे नेतृत्व घराणेशाहीच्या राजकारणातच अडकून पडले आहे अशी वारंवार टीका करणारे फार मोठे लोकशाहीवादी नेते लागून गेले आहेत असेही नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने भाजपाला सत्ता मिळवून दिली असेल परंतु मिळालेल्या सत्तेचे भाजपाला चीज करता आले नाही हीही वस्तुस्थिती आहे. ह्या परिस्थितीला नरेंद्र मोदींचे एककल्ली नेतृत्व त्याला कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. मोदींच्या काळात काही ठराविक उद्योगपतींना फायदा व्हावा असेच धोरण राबवण्यात आले हेही आता स्पष्ट झाले आहे.  मोदींच्या कारभारशैलीविषयी भाजपात अनेकांना आक्षेप घ्यावासा वाटला तरी मोदींविरूद्ध पक्षात मतप्रदर्शऩ करण्याची चोरी आहे! म्हणून कोणीही मोदींवर स्पष्टपणे टीका करण्यास पुढे यायला तयार नाही. मुद्दा असो वा नसो, नेहरू आणि काँग्रेसवर दुगाण्या झाडण्याची खोडच नरेंद्र मोदींना जडली. त्या खोडवर संघचालक मोहन भागवत ह्यांनीच बोट ठेवले. भूतपूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांना व्याख्यानाला बोलावून काँग्रेसजनांचा मान राखला पाहिजे हे भागवतांनी मोदींना अप्रत्यक्षपणे दाखवून दिले. विजय मल्ल्यांशी तडजोड करायला हरकत नाही हे सार्वजनिक बांधकाममंत्री नीतिन गडकरी ह्यांच्या तोंडून सुचवले त्यामागे संघ नेतृत्व असावे. ह्याचाच फायदा शिवसेनेने घेतला. नरेंद्र मोदींऐवजी नितीन गडकरी जर भाजपाचा चेहरा असेल तर भाजपाबरोबर युती करण्याचा विचार करू असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेचा हा थेट पवित्रा खूपच धाडसी आहे. संजय राऊतनी तो अगदी सहज शब्दबध्द केला. हे सगळे संकेत मोदींच्या विरोधात जाणारे आहेत.
काँग्रेसला पर्याय शोधण्याची जनतेला इच्छा होती म्हणूनच जयप्रकाशजींच्या प्रयत्नाने 1978- 1979 साली जनता राजवट आली. परंतु सत्ता राबवण्याचे कौशल्य नसल्यामुळे जनता पार्टीला अल्पकाळात सत्तेवरून खाली उतरावे लागले होते. त्यानंतर नरसिंह रावांच्या सत्ताकाळानंतर भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता मिळाली. पण रालोआला सत्तेवरून खाली खेचण्यात सोनिया गांधींच्या नेतृवाला यश मिळाले. आता मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित आघाडीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी राहूल गांधींनी प्रियंकाची मदत घेतली आहे. उत्तरप्रदेशातल्या 80 जागांवर वर्चस्व स्थापन केल्याखेरीज केंद्रात कोणालाही सत्ता प्राप्त झालेली नाही. उत्तरप्रदेश हे भाजपाच्या केंद्रीय सत्तेचे गंडस्थळ आहे. तेच फोडले तर काँग्रेसचा विजय दृष्टीपथात येण्याची शक्यता ओळखून प्रियांकाची मदत राहूल गांधींनी घेतली आहे. काँग्रेसला यशापयश मिळवून देण्याचे साम्रर्थ्य प्रियांकाकडे आहे की नाही ह्या मुद्द्यावर तूर्तास चर्चा करण्यात अर्थ नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वाचे यशापयश जसे काळाने ठरवले तसे प्रियांकाचे यशापय़ काळच ठरवणार! राजकारणात उतरण्यास नेहमीच नकार देत आलेल्या प्रियंकास ह्या वेळेस होकार द्यावासा वाटला हेच देशाचे राजकारण बदलणार असे सुचित करणारे आहे.

रमेश झवर

www.rameshzawar.com

No comments: