Monday, January 28, 2019

कामगारमित्र जॉर्ज फर्नांडिस

जॉर्ज फर्नांडिस हे मंत्री झाले तरी शेवटपर्यंत काम करणा-या माणसाचे मित्र राहिले.संरक्षणमंत्री असताना त्यांनी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी पोस्टिंग असलेल्या सैनिकांच्या बदल्या केल्या. सैनिकांच्या बदल्यांच्या प्रकरणात तोपर्यंत मंत्र्याने एकदाही लक्ष घातले नाही. माझे सहकारी पडबिद्री आणि मधु भावे ह्या दोघांनी त्याला जास्तीत जास्त प्रसिध्दी दिली. स. का. पाटलांविरुद्ध जॉर्ज फरनांडिसांनी निवडणूक लढवली त्यावेळी त्यांची घोषणा होती, ‘तुम्ही स. का. पाटीलना पाडू शकता!’ मराठी, गुजराती इत्यादि सर्वच भाषेत छापलेल्या पोस्टरमध्ये ही एकमेव घोषणा होती. स. का. पाटील हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यांना पाडणं कुणालाच शक्य नव्हतं. परंतु फर्नांडिस ह्यांनी तो पराक्रम करून दाखवला. ह्या पराभवाविरूध्द स. का. पाटीलनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले.
मराठाचे संपादक आचार्य अत्रे ह्यांनी स. का. पाटील हयांच्याविरुद्ध खोट्या बातम्या छापण्याचा धडाका लावला. आचार्य अत्रे हे जॉर्ज फर्नांडिस ह्याचे दोस्त असल्यामुळे मराठाने खोट्या बातम्या छापल्या त्या खोट्या बातम्यांमुळेच स. का. पाटलांचा पराभव झाला असा स. का. पाटलांच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादाचा सारंश होता. त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावताना कोर्टाने निकालपत्रात म्हटले होते, आचार्य अत्रे आणि जॉर्ज फर्नांडिस भले मित्र असतील परंतु त्यांची मैत्री आणि बातम्या हयांचा नेक्सस पाटील ह्यांच्या वकिलांना सिध्द करता आला नाही. अर्थात पाटलांच्या पराभवावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले! वस्तुतः बहुतेक बातम्या मधु भावेंनी दिल्या होत्या. कारण, स. का. पाटीलना मराठा शत्रू मानत होता.
लोकसत्तेत पडबिद्रीला भेटायला तो नरिमन पॉईंटवर यायचा. खालून फोन केला की पडबिद्री त्याला भेटायला खाली जात असे. इंडियन एक्स्प्रेसचे चीफ रिपोर्टर मनु देसाईदेखील त्याला भेटायला खाली जात असे.रेल्वे संपाला विरोध करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बॅलार्ड पियमधल्या ग्रँट हॉटेलात रोज प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सुरूवात केली. रेल्वे मुख्यालयाबाहेर प्रेसकॉन्फरन्स घेण्याचे हे पहिलेच उदाहरण म्हटले पाहिजे. रेल्वे संप यशस्वी झाल्याचा दावा खोडून काढण्यासाठी रेल्वेतर्फे रेल्वे गाड्या धावताहेत असे दाखवणारी छायाचित्रेही प्रसृत केली जात. परंतु ती मुंबई विभागाची नव्हती. ह्याचा अर्थ रेल्वे संप फक्त मुंबई विभागात शळंभर टक्के यशस्वी झाला होता. देशाच्या अन्य भागातील रेल्वेवर संपाचा परिणाम झालाच होता.
पडबिद्री बातमी लिहीत असताना मी त्याला फर्नांडिसच्या नावामागे संपसम्राट हे विशेषण लाव असे सुचवले. त्यानेही माझी सूचना लगेच मान्य केली.
आज मला वाटते, ‘कामगारमित्र’ हेच विशेषण जॉर्ज फर्नांडिसला लावणे जास्त योग्य ठरेल.

रमेश झवऱrameshzawar.com

No comments: