92 व्या अ. भा. मराठी साहित्य
संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे ह्यांचे भाषण केवळ साहित्यविश्वालाच गवसणी
घालणारे नाहीतर संपूर्ण ज्ञानिवज्ञानाच्या विश्वासाला गवसणी घालणारे आहे! गदिमांसारख्या कवीश्रेष्ठींचा ऋणनिर्देश करत असताना अरूणा ढेरे ह्यांनी वा.
वि. मिराशी, वि. भि. कोलते, राजवाडे ह्यांच्यासारख्या मध्ययुगीन साहित्याचा धंडोळा
घेणा-या थोरांचेही ऋण मोकळेपणाने मान्य केले. पूर्वसूरींनी केलेल्या कार्याचे
महत्त्व मान्य करताना त्यांनी सध्या व्यक्त होत असलेल्या तथाकथित परंपरा, विद्रोहादि
समूह भावनांवरही बोट ठेवले. सृष्टीशी संवादी जीवनशैली गमावून बसलेला मानव खरे तर
एकाकी झाला आहे ह्या विदारक सत्यावर अरूणा ढेरे ह्यांनी बोट ठेवल्यामुळे त्यांचे
भाषण साहित्यविश्वापलीकडे गेले. त्यांच्या चिंतनशील व्यक्तिमत्वामुळेच त्यांच्या
भाषणाने जणू काही विवेकाची मशालच पेटवली गेली. ह्या मशालीच्या उजेडात
साहित्यरसिकांना रस्त्याच्या वाटचालीतले खाचखळगे आपोआपच दिसावेत!
कोणाला तरी चिमटे काढत बसण्यापेक्षा अरूण ढेरेंनी एकूणच
परंपरावादावर बोट ठेवले. परंपरेतून मुक्त होणं म्हणजे परंपरा संपूर्ण नाकारणे
नव्हे, तर परंपरेतील विकनशील, प्रसरणशील आणि गतिशील घटकांना उचलून घेत कालबाह्य
घटकांची बेडी तोडणे! त्या परंपरांना कालसापेक्ष वळण
देणे! परंतु हे परिवर्तनवाद्यांच्या ध्यानात आले नाही. अरूणा
ढेरेंनी केलेले हे विवेचन परंपरेच्या गर्भाचा वेध घेणारे आहे. आपले समूह जीवन
दुःस्वप्न झाल्याचे जेव्हा अरूणा ढेरे सांगतात तेव्हा त्यांना पुष्कळ काही
अभिप्रेत आहे. माणसातल्या मीपणाची धूपच होत नाही ह्या एका वाक्यात त्यांनी फार
मोठा आशय व्यक्त केला आहे. संतसाहित्यात ज्यांनी अवगाहन केलेले आहे अशांनाच हे सुचू
शकते. अरूणा ढेरे ह्यांच्या अनेक उत्तम कविता रसिकांनी वाचल्या आहेत. 'मीपणाची धूपच होत नाही' ह्या एका वाक्यातच सध्याच्या
समूहप्रवृत्तीवर त्यांनी केलेले काव्यात्म भाष्य भावून जाते. 'अहंकाराचा वारा लागू न लागो' अशी संताची भाषा न
वापरता त्यांनी समूहाचे नेते आणि अनुयायी ह्यांच्यावर हे भाष्य केले. कोणाला तरी 'टार्गेट' करण्याचा उद्देश मनात न बाळगल्यामुळे त्यांना
हे शक्य झाले असावे.
संमेलनाच्या उद्घाटनाला नयनतारा सहगल ह्यांना निमंत्रण
देऊऩ आयोजकांनी वा साहित्य महामंडळाने ते मागे घेतल्यामुळे उसळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर
अरूणा ढेरे काय भाष्य करतात इकडे केवळ साहित्यरसिकांचेच नव्हे, तर संबंध महाराष्ट्रातील
मराठमोळ्या जनतेचे लक्ष लागलेले होते. काहीतरी गुळमुळीत वाक्य बोलून सफाईने त्या मार्ग
काढतील किंवा दूर्गा भागवतांप्रमाणे दूर्गेचा अवतार धारण करून भाषणात एकेकाला
रट्टे लगावतील अशी अनेकांची अपेक्षा होती. परंतु त्यांनी तसा एकारलेपणा केला नाही.
झुंडशाहीपुढे नमते घेणे अशोभनीयच हे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले. कुणीही यावं
आणि वाङ्मयबाह्य कारणांसाठी किंवा वाङ्मयीन राजकारणासाठी साहित्य संमेलनाला वेठीला
धरावं हे निंदनीय असल्याचे सांगून झुंडशाहीपुढे नमतं घेणे अशोभनीय असल्याचे त्यांनी
स्पष्ट केले हे फार चांगले झाले. साहित्य, राजकारण, समाजकारणादि क्षेत्रातील तमाम
भडकू मुलुष्ट्यांना हा एक वस्तुपाठ आहे.
व्दंव्दात्मकतेच्या पलीकडे जाणा-या वाटा अनेक आहेत ही
संमेलनाची भाषा अनेकांना आध्यात्मिक वाटण्याचा संभव आहे. पण ती तशी नाही. मतामतांचा
गलबला म्हणजेच व्दंव्द, हे काही मतस्वातंत्र्य नव्हे असेच अरूणा ढेरे ह्यांना म्हणायचे
आहे. समूहांना जोडणारे मार्ग मौखिक परंपरेत शोधायला पाहिजे आणि ते शोधत असताना
विवेक बाळगायला हवा ह्या त्यांच्या विवेचनाशी जर कोणी असहमत होणार असेल तर त्याची
फिकीर करण्याचे कारण नाही. साहित्यिकांपुढे असलेल्या समस्यांचे स्वरूप विषद करताना
त्यांच्या विवेचचनाने विवेकाची वाट सोडली नाही. गेल्या 50 वर्षांचा काळ हे दूसरा
प्रबोधनकाळ आहे असं त्या मानतात. ह्या पर्वातील आव्हानांचे स्वरूप जगड्व्याळ
असल्याचे त्यांचे मत वादातीत आहे. अन्य भाषेतील साहित्याचे वरवर जरी अवलोकन केले
तरी मराठी वाचक त्यांच्याशी सहमत होतील!
No comments:
Post a Comment