Monday, January 7, 2019

म-हाटी संस्कृतीची बेअब्रू


यवतमाळ साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल ह्यांना आधी निमंत्रण द्यायचे आणि नंतर ते निमंत्रण रद्द करणारा ई मेल पाठवायचा ही निव्वळ मराठी साहित्य संमेलन आयोजित करणा-या मराठी साहित्य महामंडळाचीच नव्हे तर राज्यातल्या तमाम म-हाठी जनतेची आणि म-हाटी संस्कृतीची बेअब्रू आहे. एखाद्याला मानाने बोलवावे आणि कुठलेही समर्पक कारणे ( घरात मृत्यू, अपघात वगैरेसारखी ) न देता त्याला येऊ नका असे सांगणे हे निश्चितपणे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. संमेलनात कोणी गोंधळ घालण्याची धमकी देत असेल तर त्यांची समजूत काढण्याऐवजी उच्चपदस्थांमार्फत त्यांच्याशी बोलणी करायचा प्रयत्नही आयोजकांनी केला नाही. नयनतारांच्या विचारांमुळे राज्यकर्त्यांची पंचाईत होण्याचा आयोजकांना धोका दिसला असेल तर त्यांच्या बुध्दीची कींव करावीशी वाटते. उद्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे, कार्यक्रम कुठले करायचे, पैसा कसा उभा करायचा वगैरे बाबींचा तपशीलवार विचार करून निर्णयघेणे हा संमेलन भरवणा-या स्थानिक मंडळींच्या अधिकारक्षेत्रातला विषय असल्याचा खुलासा साहित्य महामंडळातर्फे करण्यात आला. त्यांचा हा खुलासा कितपत सयुक्तिक आहे? वस्तुतः साहित्य संमेलनाचे निमंत्रण स्वीकारण्यापूर्वी स्थानिक इच्छुकांशी विचारविनिमय, चर्चा करण्याचा साहित्य महामंडळाचा प्रघात आहे. तो प्रघात पाळला गेला का? यवतमाळचे निमंत्रण स्वीकारताना स्थानिक मंडळींची बौध्दिक कुवत का जोखण्यात आली नाही? संमेलन भरवण्याची आर्थिक कुवत जितकी महत्त्वाची तितकीच बुध्दी कुशलताही महत्त्वाची   असते हे ह्या 'निमंत्रण-नकार' प्रकरणामुळे दिसून आले.
आणीबाणीच्या काळात क-हाडला भरलेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष दूर्गा भागवत ह्यांचे भाषण प्रक्षोभक होणारा हे क-हाडच्या आयोजकांना माहित होते. त्या भाषणाबद्दल दूर्गा भागवतांना तुरूंगात टाकण्याची तयारीही जिल्हा पोलिस प्रशासनाने चालवली होती. परंतु अध्यक्षांच्या अटकेमुळे भऱ संमेलनात अनवस्था प्रसंग उद्भवण्याचा धोका स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाणांनी ओळखला. त्यांनी स्वतः उच्चस्तरीय पोलिस अधिका-यांशी चर्चा केली. संमेलनाध्यक्षांची ज्या उद्देशाने तुम्ही त्यांना अटक करणार आहांत तो मुद्दा तर सफल होणारच नाहीच, उलट आणीबाणीविरुध्दच्या वातावरणात त्यांच्या अटकेच्या बातमीमुळे भरच पडेल असे य़शवंतराव चव्हाणांनी पोलिस अधिका-यांना पटवून दिले होते. त्यामुळे दूर्गा भागवतांना अटक करण्याचे पोलिसांनी टाळले!
ह्याच यवतमाळ शहरात सत्तरच्या दशकात एकाच मांडवात साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलनात आयोजित करण्यात आले होते. मी ह्या संमेलनाला वार्ताहर म्हणून उपस्थित होतो. यवतमाळचे संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून वादळी ठरले होते. विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाईंडरचा ह्या वादाला संदर्भ होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील वादाच्या एका बाजूला तेंडुलकरांचे पाठिराखे तर दुस-या बाजूला तेंडुलकरांचे विरोध मानले गेलेले विद्याधर गोखले असा सामना होता. विशेष म्हणजे लोकसत्ता कार्यालयात विद्याधर गोखले आणि विजय तेंडुलकर ह्या दोघांच्या केबिन्स शेजारी शेजारी होत्या! त्या वेळी परिसंवादात भाग घेणारे आणि उपस्थित श्रोते ह्या दोघांनी पाळलेला संयम आजही माझ्या स्मरणात आहे.
साहित्य संमेलने, चर्चा-परिसंवाद किंवा सांस्कृतिक मंचावर होणा-या कार्यक्रमात अलीकडे असहिष्णू मनोवृत्ती दिसून येते. अल्पबुध्दी वक्ते एकमेकांविषयी तसेच अनुपस्थितीत असलेल्यांविरूध्द अनुदार उद्गार काढतात. सर्रास दिसणारे हे चित्र पाहता सार्वजनिक मराठी जीवन कमालीचे गढूळ झाले आहे असे म्हणावेसे वाटते. महाराष्ट्रात आधीच्या पिढीने जे कमावले ते आजच्या पिढीने गमावले! अमृताते पैजा जिंकणा-या म-हाठी बोलीतले अमृतच आपण गमावून बसलो आहेत.
रमेश झवर  

www.rameshzawar.com

No comments: