Monday, August 12, 2019

पुन्हा सोनियाचे दिवस!

दिवसभर चाललेल्या भवती न भवतीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधींची निवड झाली. ह्यावेळची त्यांची निवड गांधी घराण्याची सून म्हणून झालेली नाही, तर भाजपाने उभे केलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयारी असलेले नेतृत्व म्हणून झाली आहे! सोळाव्या आणि सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव आणि राहूल गांधींची अपेशी कारकीर्द ही पार्श्वभूमीदेखील सोनिया गांधींची अध्यक्षपदी करण्यात आलेल्या निवडीमागचे कारण आहे. राहूल गांधींनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजिनामा दिला होता. राजिनामा मागे न घेण्याच्या बाबतीत राहूल गांधी ठाम राहिले. दरम्यान प्रियांका गांधींच्या नावाची अध्यक्षदासाठी चर्चाही सुरू झाली. परंतु काँग्रेसवर होत असलेल्या घराणेशाहीच्या आरोपातून प्रियांका गांधी आणि राहूल गांधींची सुटका झाली नाही. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भुईसपाट झाली त्याची अनेक कारणे असली तरी घराणेशाहीचा आरोप नरेंद्र मोदींसकट सर्व बिगरकाँग्रेस पक्षांनी लावून धरला. पुढेही लावून धरतील. पंतप्रधान नरेंद्रही निवडणूक प्रचारात घराणेशाहीच्या आरोपावर भर दिला. शिवाय गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्यात प्रचाराची धुरा प्रियांका गांधी-वधेरा ह्यांच्यावर सोपवण्यात येऊनही राहूल गांधी पराभूत झाले. म्हणूनच प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा जास्त जोर पकडू शकली नाही. काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा कोणावर सोपवावी ह्याचा पक्षात विचार सुरू झाला तेव्हा एकीकडे सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन, खर्गे मोतीलाल व्होरा ह्या तिघा बुजूर्गांची नावे घेतली गेली तर दुसरीकडे मुकुल वासनिक, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट ह्या नव्या दमाच्या तरूण नेत्यांची नावे घेतली गेली.
अनेक नेत्यांची नावे घेतली गेली तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस अध्यक्षपदाचे शिवधनुष्य नेहरू-गांधी घराण्याव्यतिरिक्त कोणाला उचलता येईल की नाही ह्याबद्दलची सा-या काँग्रेसजनाची धाकधूक लपून राहिली नाही. अध्यक्षपदाच्या नावासाठी कोणी फारसा जोर लावला नाही. म्हणूनच निरनिराळ्या राज्यांच्या समितीत अध्यक्षाच्या नावावर विचारविनिमय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या विचारविनमयातून एकच निष्पन्न झाले. ते म्हणजे राहूल गांधींनाच अध्यक्षपदाचा राजिनामा मागे घेण्याची विनंती करावी. आपल्या कारकिर्दीत पराभव झाला ही बाब राहूल गांधींच्या मनास लागली असावी. म्हणून त्यांनी राजिनामा मागे न घेण्यास साफ नकार दिला. अर्थात कार्यकर्ता म्हणून काम करण्यास त्यांची ना नाही.
खरे तर, राजीव गांधी काय किंवा सोनिया गांधी काय कुणीच काँग्रेसमध्ये येण्यास आणि सत्ताप्राप्त करण्यास हपापलेले नव्हते. मनमोहनसिंगांनी देऊ केलेले मंत्रिपदही स्वीकारण्यास राहूल गांधी तयार झाले नाही. राजीव गांधींच्या राजकारणात प्रवेश करण्यास सोनिया गांधीही सुरूवातीला अनुकूल नव्हत्या. काँग्रेसच्या सरचिटणीसपदी स्वतःच्या विश्वासातली व्यक्ती हवी अशी इंदिरा गांधींची इच्छा आणि राजकारणाच्या रेटा ह्यामुळे राजीव गांधींनी मनाविरूध्द काँग्रेसचे सरटिचणीसपद स्वीकारले ही वस्तुस्थिती सोनियाजींच्या चरित्रलेखकाने नमूद केली आहे. राजीवजींच्या विषण्ण चित्तावर त्यांच्यातल्या कर्तव्यभावनेने मात केली हे उघड आहे. राजीव आणि सोनियांची मानसिकता लक्षात घेतली तर त्यांनी मिळवलेले यश अभूतपूर्व होते. महात्मा गांधींच्या खुनानंतर नाथूरामना भेटण्यासाठी गांधीचींचे ज्येष्ठ पुत्र हिरालाल तुरूंगात गेला. नाथूरामवर खटला भरू नये असे त्याचे मत होते.
महात्मा गांधी पं. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी ह्यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचे रसायन अद्यापही विरोधकांना उलगडलेले नाही. त्यांना आणि त्यांच्या कुटंबियांना  भानवा नाहीत असे गृहित धरण्याची चूक देशभरातला प्रत्येक जण करतो. विरोधकांनाही जनप्रक्षोभ झाला तर हवा आहे. म्हणूनच पन्नास वर्षे नेहरू-गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप विरोधकांनी लावून धरला. अजूनही लावून धरत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी अन्य मुद्दा त्यांच्याकडे नाही असा त्याचा अर्थ होतो. देशातील राजकारणावर ओझरती जरी नजर टाकली तर असे लक्षात येते की घराणेशाहीचा वृक्षाच्या फांद्या देशभरातल्या सा-या पक्षात पसरल्या आहेत. आणि त्याबद्दल विरोधक सोयिस्कर मौन पाळतात!
दिल्लीत राष्ट्रीय राजकारणास नेमके कसे वळण लागेल ह्याचा भरवसा कोणालाही देता आलेला नाही. नको नको म्हणत असताना सोनिया गांधींनी १९ वर्षे काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. खुद्द नेहरू आणि इंदिरा गांधी ह्यंनाही एवढा प्रदीर्घ काळ काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवता आले नाही. सोनियाजींचे अध्यक्षपद हंगामी असले तरी हंगामी हे विशेषणाला फारसा अर्थ नाही. भाजपाच्या हातातली सत्ता हिसकावून घेण्यात सोनियाजींच्या अध्यक्षीय कारकिर्दीत काँग्रेसला यश मिळाले तर हवा तितका काळ त्या अध्यक्षपदावर राहू शकतात. २००४ च्या निवडणुकीत विपरीत परिस्थितीशी सामना करून काँग्रेसप्रणित आघाडीचा सत्ता आणण्यात सोनियाजींना यश मिळाले होते. आता परिस्थिती वेगळी आहे. मोदींसारख्या बलाढ्या नेतृत्वाखाली भाजपाला टक्कर देणे त्यांना कितपत जमेल हा खरा प्रश्न आहे. रालोआबरोबर वाटचाल करणा-या पक्षांनी रालोआला सोडले नाही. भाजपानेही त्यांना सोडून दिले नाही. काँग्रेसबरोबरही जुने मित्र असलेले पक्ष आहेत. प्रश्न आहे तो सपा, बसपा, तृणमूल काँग्रेस, कम्यनिस्ट, बिजू जनता दल ह्यासारख्या एकारलेल्या व्यक्तिवादी पक्षांच्या वाटचालीचा! त्या सर्वांना काँग्रेसबरोबर आणण्यात सोनिया गांधींना यश मिळाले तरच त्यांच्या सोनिया गांधींचे कर्तृत्व कालातीत ठरेल. ते यश मिळेल का  हा खरा आजघडीचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर कोणालाच देता येणार नाही. एक मात्र म्हणता येईल, महाराष्ट्र आणि झारखंड ह्या राज्यातल्या विधानसभा निवडणुकांमुळे सोनियांच्या दिवसात काँग्रेसपुढे संधी उभी राहू शकेल. २०२० मध्ये हरयाणातली निवडणूकदेखील सोनिया गांधींपुढे निश्चितपणे संधी उभी करणार. मध्यप्रदेश आणि कर्नाटकचे आव्हान सोनियाच्या दिवसात काँग्रेसपुढे आहेच.
रमेश झवर

No comments: