Friday, August 2, 2019

सावकारशाही व्यवस्थेचा बळी

ज्याला झाडावरून उतरता येते त्यानेच झाडावर चढावे असे जैन धर्मात एक सुभाषित आहे. उद्योगपती सिध्दार्थ कर्जाच्या वृक्षावर चढला खरा; परंतु कर्जाच्या वृक्षावरून त्याला उतरता आले नाही. ह्याचा अर्थ त्याने उतरण्याचा प्रयत्न केला नाही असा नाही. त्याने प्रयत्नांची शिकस्त केली. त्यात यश न आल्याने नेत्रावतीत उडी मारून आयुष्या संपवावे लागले. अर्थशून्य होत चाललेल्या जीवनाच्या पसा-यातून सुटण्यासाठी तो स्वतःहून मृत्युच्या स्वाधीन झाला !
 कॅफे कॉफी डे चे संस्थापक अध्यक्ष व्ही. जी. सिध्दार्थची आत्महत्या हा सावकरशाहीचा बळी असल्याचे मी काल लिहले होते. माझी पोस्ट अनेकांना झोंबली. सिध्दार्थने हवालात पैसे गमावले असतील अशी प्रतिक्रिया एक पोस्टकर्त्याने व्यक्त केली तर दुस-या एकाने मला काही माहित नसताना मी जजमेंट का पास करावे अशी टीका केली! सावकारशाहीचा बळी ह्या माझ्या मुद्द्याला त्यांनी विरोध दर्शवला. पोस्टकर्त्याचे लेखनस्वातंत्र्य मला मान्य असल्याने मी त्यांचा युक्तिवादाचा प्रतिवाद करत बसलो नाही. एकच म्हणावेसे वाटते की त्यांना वृत्तपत्रातल्या बातम्यांचा तपशील नीट समजला नाही. सिध्दार्थच्या उपक्रमाला ज्यांनी प्रायव्हेट इक्विटी स्वरूपात रक्कम दिली ती त्यांना परत हवी होती. आयकर खात्याने कॅफे कॉफी डेची इक्विटी जप्त केल्याने प्रयत्न करूनही प्रायव्हेट इक्विटी सिध्दार्थ एनकॅश करून देऊ शकला नाही. प्रायव्हेट इक्विटी हा वरवर शेअर दिसत असला तरी तो ब्वहंशी कर्ज कम शेअरचा प्रकार आहे हे आर्थिक जगात वावरणा-या सगळ्यांना ठाऊक आहे. मुंबई शेअर बाजारात ब्लॉक डील नावाचा एक प्रकार मध्यंतरी प्रकार सर्रास सुरू झाला होता. जरा विचार केल्यास हाही कर्जाचाच मार्ग असल्याचे ध्यानात येईल! मात्र हे कर्ज बॅलन्सशीटमध्ये कर्ज ह्या हेडखाली दाखवले जात नाही एवढेच. जुन्या सावकारशाही व्यवस्थेचेच हे नवे रूप!  फेसबुकच्याच नव्हे तर, लाखो वृत्तपत्रांच्या वाचकांना हा प्रकार नेमका काय असतो हे माहित नाही. त्यात त्यांचा दोष नाही. देशात लाखो लोक वित्तव्यवहार निररक्षर आहेत! राजकाकरणी आणि उच्चअधिका-यांचा तर वित्त निरक्षरात पहिला नंतर लागेल!
सिध्दार्थच्या आत्महत्या प्रकरणी पोलिस तपास चालू आहे. त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येण्याची शक्यता कमीच आहे. बाहेर आले तर एवढेच सत्य बाहेर येई की सिध्दार्थने आत्महत्या केली, जे सर्वांना माहित आहे. मरावे परि कीर्तीरूपे उरावे, असे समर्थांनी म्हटले आहे. कॅफे कॉफी डे ही कंपनी अगदी पाश्चात्य धर्तीवर उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो यशस्वीही झाला. मात्र, कंपनी उभी करण्यासाठी आणि ती अविरत चालवण्यासाठी जे सतत्याने करावे लागते तेही सिध्दार्थने केले. नाही केले असे म्हणता येत नाही. मात्र ते करत असताना त्याची दमछाक झाली. हे उघड आहे. सिध्दार्थ सत्प्रवृत्त होता. म्हणूनच त्याचे नाव एक अपेशी उद्योगपती अशा अपकीर्ती रूपानेच उरणार आहे.
सिध्दार्थ सत्प्रवृत्त होता. व्यापारउद्योगात केवळ सत्प्रवृत्त असून चालत नाही. ठक भेटला तर त्याला महाठक व्हावे लागते. सिध्दार्थला महाठक होता आले नाही!  वित्तीय संस्थांचे बडे अधिकारी, उच्चपदस्थ आयकर अधिकारी, कोणताही सौदा सफाईने करणारे धूर्त स्टॉकब्रोकर, बनेल नेते, बनचुके कर्मचारी पुढारी ह्या सगळ्यांना सिध्दार्थ उद्योगाच्या दैनंदिन लढाईत पुरा पडू शकला नाही. अर्थात उद्योगयुध्दात अनेक उद्योगपती मित्ररूपाने वावरणा-या शत्रूला पुरे पडू शकत नाहीच. किंबहुना ह्या सगळ्यांना हाताळणारा हुषार, बेरकी चालू मध्यस्थ लागतो. एवंगुणविशिष्ट मध्यस्थ सिध्दार्थला मिळाला नसावा.
सिध्दार्थच्या मृत्यूनंतर कॅफे कॉफी डे च्या व्यवहारांची छाननी सुरू झाली आहे. त्यामागे कॅफी कॉफी डे ही कंपनी वाचवण्यापेक्षा कॅफे कॉफी डे कडून सगळा पैसा कसा सुरक्षित काढून घेता येईल ह्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. अन्यथा ही कंपनी चालवायला प्रयत्न करणे अजिबात अशक्य नाही. पण ज्याने त्याने आपले बघावे असा सध्याचा काळ आहे. ह्या काळात तो प्रयत्न कोण करणार? आणि का करणार?
शेतक-यांच्या आत्महत्या आणि उद्योगपतीची आत्महत्या ह्यात साम्य नाही हे मलाही मान्य आहे, कर्ज थकल्यामुळे दोघांना आत्महत्या करावी लागणे हे एक साम्य तर नक्कीच आहे! शोतकरी असो की व्यापारी वा उद्योजक, त्याला आत्महत्या करावी लागणे हे नामुष्कीचेच. ती व्यक्तीची जितकी नामुष् तितकीच समाजाची! आपला समाज आतून किडून चालला आहे हे घगधगते वास्तव. त्याला भ्रष्ट प्रशासन जितके जबाबदार आहे तितक्याच निव्वळ आपकमाईसाठी हपापलेल्या वित्तीय संस्थादेखील कारणीभूत आहेत. सदैव संधीच्या शोधात असलेल्या राजकारण्यांबद्दल न बोललेच बरे.
रमेश झवर


No comments: