Tuesday, December 22, 2020

नवा कोरोना , नव्याने धास्ती

ब्रिटनमध्ये नव्याने आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे केवळ ब्रिटनवासियांचेच धाबे दणाणले आहे असे नाहीतर युरोप, अमेरिका आणि भारताचे तसेच अखाती देशांचेही धाबे दणाणले हे नाकारण्यात अर्थ नाही. सरकार सतर्क असून घाबरण्याचे कारण नाही, असे जरी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन एकीकडे सांगत असले तरी दुसरीकडे  ब्रिटनबरोबर भारताची विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय हवाई वाहतूक खात्याने घेतला! ब्रिटनबरोबर केवळ भारतानेच हवाई वाहतूक बंद केली असे नव्हे तर पोलंड, स्पेन, स्वित्झर्लंड, रशिया, जॉर्डन, आणि हाँगकाँग ह्याही देशांनीही विमान वाहतूक रद्द केली. जगभरातील अनेक विमाने लंडन मार्गे जात असल्याने अनेक देशांना स्वतःच्या हवाई सीमा बंद कराव्या लागतील. आरोग्य मंत्रालयातील संबंधितांचा गट पुन्हा कार्यान्वित झाला हे चांगले झाले. कोरोनाच्या नव्या लाटेला तोंड कसे द्यावे लागेल ह्याच्यावर तज्ज्ञांना पुन्हा खल करावा लागेल. मुळात ब्रिटनमध्ये आलेला कोरोना किती नवा, किती जुना हे निश्चित करावे लागले. त्याशिवाय मोठ्या उत्साहने जगभर सुरू झालेल्या लशीकरणाच्या कार्यक्रमात बदल करावा लागेल ते निराळा!  आधीच्या संशोधित लशींमुळे नव्या कोरोनाचाही प्रतिकार करता येईल का हेही तपासून पाहावे लागेल.
भारतात अजून तरी फारशी घबराट माजलेली दिसत नसली तरी मुंबई शेअर बाजारावर मात्र ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनाचा परिणाम लगेच जाणवला. सोमवारी सेंसेक्स १४०७ अंकांनी घसरला. अनेक कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य घसरले! घसरणे हे शेअर बाजार मुळीच नवे नाही. परंतु ह्या वेळचे सेंसेक्स घसरण्यास  नव्या कोरोनाचा वाढता प्रभाव कारणीभूत आहे. बाजारातल्या सूचिबध्द कंपन्यांना बसलेल्या कंपन्यांचा फटका नेहमीसारखाच असला तरी संबंधितांची उमेद खच्ची करणारा आहे.  ह्या पडझडीचा फटका संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला बसेल किंवा काय हे अद्याप कोणालाही सांगता येणार नाही. कोरोना कहर आणि नाताळ साजरा करणा-यांची नेहमीप्रमाणे होणारी अलोट गर्दी ह्या दोन कारणांची महाराष्ट्र सरकारनेही दखल घेतली. राज्यातील पालिका हद्दीत संचारबंदीचे पुनरागमन झाले! संचारबंदीचा काळ रात्रीचा असल्याने संचारबंदीचा फारसा परिणाम होणार नाही असा युक्तिवाद करण्यात आला असला तरी तो खरा नाही. मंबई-पुण्यात उद्योगचक्र अहोरात्र फिरत असते हे लक्षात घेता संचारबंदीच्या दुष्परिणामातून महानगरांची सुटका होणे जर कठीणच! कोरोनासह जगण्याची सवय करण्याचा आशावाद मनाशी बाळगून जनजीवन सामान्य सुरू व्हायला नुकतीच सुरूवात झाली होती. दरम्यानच्या काळात आलेल्या विमान प्रवाशांना पुन्हा एकदा दोन्ही प्रकारच्या क्वारंटाईनला सामोरे जावे लागणार आहे. प्रवासी वाहतूकच बंद पडण्याचा धोका असल्याने परिणाम पर्यटण, इस्पितळे इत्यादींवर होऊ शकतो. औषधे, अन्नधान्य  आणि भाजीपाला ह्यापूर्वीच महाग झालेलाच आहे. नजीकच्या काळात महागाईची पुन्हा नव्या दमाने वाटचाल होण्याची भीती कशी नाकारणार? ब्रिटन आणि अमेरिकेतही नाताळच्या सणानिमित्त बाजारात खाद्यपदार्थांच्या टंचाईला तोंड द्यावे लागेल अशी भीती वाटू लागली आहे. ती अगदीच अनाठायी आहे असे म्हणाता येणार नाही. अन्नसाठा कमी झाला अशातला भाग नाही. पण बाजारात अन्नधान्याचा आणि खाद्यपदार्थांचा तुटवडा जाणवणार असेल तर त्यावर सरकारकडे कोणतीच उपाययोजना नाही हेही तितकेच खरे! नव्या कोरोनाची लागण लहान मुलांनाही होऊ शकते, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. महत्त्वाचे म्हणजे जगभरातल्या लस टोचण्याच्या कार्यक्रमात बदल करण्याची वेळ आली तर काय करायचे अशी समस्या उद्भवू शकते. आतापर्यंत उत्पादित झालेल्या लशींतले काही घटक बदलावे लागतात की काय ह्यावरही संशोधकांना काम करावे लागले. लशीत बदल करण्याचा प्रश्न आला तर तो कोणत्या स्वरूपाचा करावा हेही संशोधकांनी पूर्वीच ठरवलेले असावे हे मान्य केले तरी लसनिर्मिती करणा-या औषधी कंपन्यांना काही काळ लशींचे उत्पादन स्थगित ठेवावे लागणारच! दुसरे महत्त्वाचे म्हणजे लशींचा वापर शेवटी डॉक्टर्स मंडळीच करत असतात. लस टोचल्यानंतर गुण येणार नसेल तर ते  लस टोचणे बंद करतील हे उघड आहे. नव्या कोरोनाबद्दल वैद्यकीय क्षेत्राची  स्पष्ट प्रतिक्रिया अजून तरी व्यक्त झाली नाही. नव्या कोरोनाची नव्याने धास्ती असे वातावरण मात्र तयार होत आहे. प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या बाबतीत आणि रूग्णांवर इलाज करण्याच्या बाबतीत भारत हा नेहमीच जगाच्या बरोबरीने वागत आला आहे. कोरोनाची भारतातली पहिली लाट आटोक्यात येण्याच्या बेतात असल्याचे आकडेवारी पाहून वाटते.  मास्क आणि दो गज की है जरूरी ही घोषणा अजून तरी प्रासारमाध्यमातून ऐकवली जात आहे. घोषणेची जरूर अजून संपलेली नाही असे एकूण चित्र आहे. कोरोनाविरूध्दचे प्रचारक थकले, पण कोरोना थकलेला नाही! तो नव्या दमाने येऊ पाहात आहे हा चिंतेचा विषय आहे.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार


No comments: