Friday, December 25, 2020

कृष्ण आणि ख्रिस्त

गीता जयंती आणि ख्रिस्त जयंती यंदा एकाच दिवशी दिवशी आली! महाभारत युध्द सुरू होण्यापूर्वी माझ्या आप्तस्वकियांना आणि वंदनीय गुरू द्रोणाचार्यांना आणि भीष्मपितामहानां मारून मला राज्य मिळवायचे नाही, असे सांगत अर्जुनाने ऐन युद्ध सुरू होण्यापूर्वी रणांगणातच सांगितले. युध्दसज्ज कौरवांना पाहून सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति अशी कबुली  त्या श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाने दिली. त्यावेळी त्याच्या हातातले गांडीव धनुष्यदेखील गळून पडले. श्रीकृष्ण त्याला म्हणतो, युध्दातून पळून जाणे हे क्षत्रियधर्माला शोभत नाही. युध्द करणे क्षात्रधर्माला अनुसरूनच आहे.  एवढेच सांगून  श्रीकृष्ण थांबला नाही तर ज्ञान, कर्म, योग भक्ती हे सर्व प्रकारचे धर्मोपासनेचे मार्ग अर्जुनाला त्याने समजावून सांगितले. गीतेत ज्ञान, कर्म आणि ईश्वर हे तीन कांड असून ह्या तीन कांडांची प्रश्नोत्तर स्वरूपात व्यासांनी चर्चा केली आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी  गीतेला कांडत्रयिणी हे विशेषण लावले आहे. ज्ञानेश्वर पुढे जाऊन असे म्हणतात की गीता ही श्रीकृष्णाची जणू वाङमयीन मूर्ती आहे! ७०० श्लोकांच्या गीतेचे पारायण अवघ्या दोनअडीच तासात पुरे होते. ह्याउलट बायबल हा मात्र महाग्रंथ आहे. येशू ख्रिस्ताने त्याच्या निकटच्या शिष्यांना वेळोवेळी केलेल्या उपदेशाचे सारगर्भ बायबलमध्ये आले आहे. हिंदू धर्मातील अनेक ग्रंथात श्रीकृष्णाला महात्मा ही पदवी दिली आहे तर ख्रिस्त हे येशुला मिळालेले सन्माननिदर्शक विशेषण आहे! ‘ख्रिस्त हे हिब्रू भाषेतील मसीहा  शब्दाचे भाषान्तर आहे. एखादा धर्म समजून घ्यायचा तर त्या धर्माचा प्रमाण ग्रंथ समजून घेण्यासारखे दुसरे साधन नाही. ख्रिश्चन धर्म समजून घेण्यासाठी बायबल

समजून घ्यावा लागेल. तो समजून घेण्यासाठी आणि समजावून देण्यासाठी जगात अक्षरशः हजारो बायबल स्कॉलट कार्यरत आहेत. तसेच गीतेवर असंख्य भाष्यकारांनी भाष्ये लिहली आहेत. अजूनही लिहीत आहेत.  हिंदू धर्मात ज्याप्रमाणे अनेक शैन वैष्णव, गाणपत्य इत्यादी संप्रदाय आहेत त्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मातही रोमन कॅथालिक आणि प्रोटेस्टंट हे दोन मुख्य पंथ तर आहेतच, शिवाय अनेक लहान पंथही आहेत. काकासाहेब कालेलकर एकदा विनोदाने म्हणाले होते की येशु ख्रिस्त जर ह्या काळात पुन्हा अवतरला तर कुठल्या पंथाचे अनुयायित्व पत्करावे असा प्रश्न त्याला पडल्याशिवाय राहणार नाही! अठराव्या-एकोणीसाव्या  शतकात युरोपातल्या राज्यसत्ता धर्मसत्तेच्या जोखडातून मुक्त झाल्या. स्वतःला धार्मिक म्हणवणारे अनेक जण सण, व्रतवैकल्ये साजरे करतात. परंतु धर्मपालनाने त्यांना कल्याण होतेच असे नाही.  किंबहुना ते जे काही करत असतात त्यालाच ते  खरे धर्माचरण समजतात! ख-याखु-या धर्मतत्त्वांची ओळख आणि त्यानुसार प्रत्यक्ष जीवन जगणारी माणसे मात्र क्वचितच भेटतात. तथाकथित धार्मिक लोकांपेक्षा स्वतःला प्रामाणिकपणे नास्तिक म्हणवून घेणारे परवडले असे म्हणायची वेळ आली आहे! समाजातल्या शिक्षित वर्गाची ही स्थिती तर गरीब आणि अल्पशिक्षित वर्गाची अवस्था कशी असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी.

ख्रिस्तानुयायांना प्रेषित येशु ख्रिस्ताने दहा आज्ञा देऊन ठेवल्या आहेत. त्या आज्ञेनुसार खिस्ती धर्मियांचे वर्तन अपेक्षित आहे. त्या १० आज्ञा अशा- १) माझ्या समोर तुम्ही कुठलाही अन्य देव मानू नये. २) तुम्ही मूर्ती बनवू नका. ३) तुम्ही विनाकारण देव देव करत बसू नका. ४) देवासाठी रविवारचा पवित्र दिवस- साबाथ-तुम्ही विसरू नका. ५) आईवडिलांबद्दल तुमच्या मनात सदैव आदराची भावना हवी. ६) तुम्ही कोणाची हत्या करू नका. ७) तुम्ही व्यभिचार करता कामा नये. ८) चोरी करू नका. ९)  शेजा-याविरूध्द  वेडेवाकडे बोलू नका. आणि १० ) एखादी गोष्ट मिळवण्यासाठी दुस-याचा मत्सर करू नका. आयुष्यात सर्वांशी प्रेमाच्या भावनेनेच वागले पाहिजे असा ख्रिस्ती धर्माचा आदेश आहे.  प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाच्या १० टक्के मदत गरजूंना केली पाहिजे ह्यावरही ख्रिश्चनांचा अधिक भर असतो. थोडक्यात, देव देव करण्याला महत्त्व  नाही, आचरणाला अधिक महत्त्व देण्यावर  ख्रिस्ती धर्माचा खरा रोख आहे. हा रोख दांभिकतेविरूध्द  आहे.

ङिंदू धर्मातही खरा रोख आचरणावरच आहे. आचारप्रभवो धर्मःअसे विष्णूसहस्रनामात स्पष्ट म्हटले आहे. गीतेच्या अकराव्या अध्यायात तर श्रीकृष्णाने अर्जुनासमोर आपले विराट रूप प्रकट केले. त्याआधीच्या दहाव्या अध्यायात तर कितीतरी रूपात आपणच आहोत हे उदाहरणांसह श्रीकृष्णाने सांगितले. ज्ञान, कर्म आणि योग तसेच भक्ती ह्या मार्गांचे सूत्र स्पष्ट करून झाल्यानंतर अवघी सृष्टीच आत्ममायेने मी निर्माण केली असे भगवान क्षीकृष्णाने स्पष्टपणे सांगित्ले. ख्रिस्ती धर्माच्या मतेही, ईश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. ह्या सगळ्या सृष्टीचे कर्तृत्व बायबलने ईश्वराला दिले आहे. माणूस घडवताना ईश्वराने जणू स्वतःचीच प्रतिमा निर्माण केली. स्वरक्षणार्थ माणसाने माझ्याकडे पाहावे असे ईश्वर सांगत असल्याचे बायबलमध्ये म्हटले आहे. सर्व मार्गामार्गांची चर्चा केल्यानंतर मामेकं शरण व्रज असेच श्रीकृष्णानेही अर्जुनाला शेवटी सांगितले. ईश्वरविषयक कल्पनेत बायबल आणि गीता ह्यात कमालीचे साम्य आहे.

थोडक्यात, ईश्वरनिष्ठा आणि अभिलाषारहित प्रेममय वागणूक हाच दोन्ही धर्माचा गाभा आहे. ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली त्याप्रमाणे भगवद्गीता ही माणसाला परमेश्वराने दिलेली घटना आहे, असे मामासाहेब दांडेकर प्रवचनकीर्तनात नेहमी सांगत. ख्रिश्चन धर्मानुयायांची संख्या जगात सर्वाधिक आहे. तुलनेने हिंदू धर्मांच्या अनुयायांची संख्या कमी आहे. अर्थात अनुयायांची संख्या हा काही धर्माच्या श्रेष्ठत्वाचा निकष नाही. धर्माची तत्त्वे आणि त्या तत्त्वांनुसार आचरण हा एकमेव श्रेष्ठत्वाचा निकष आहे.

सध्याच्या जगाची वाटचाल ख-या धर्माच्या दिशेने होत आहे का? जगातील व्यक्तीव्यक्तींच्या आयुष्याची वाटचाल कशी सुरू आहे? आत्मतत्त्व आणि ईश्वराचे रहस्य जाणून घेण्याची जिज्ञासा माणसाला खरोखर आहे का? तीर्थस्थळाला भेटी देताना त्याची भावना पवित्र असते की निव्वळ पर्यटकाची असते? हरघडीला त्याला भेदभाव-उच्चनीचता अमंगळ वाटते का? राजकारणात आणि नोकरीधंद्यात वैर आणि मत्सर भावनेने वागायचे नसते हे त्याला कळले आहे का? हजारों वर्षांपासून धर्माच्या नावाने बाजार सुरू होता. तसाच तो अजूनही सुरू आहे का? मशीद - मंदिराचे निर्माण म्हणजेच खरा धर्म समजायचा का?  दाढी वाढवून आणि भगवी वस्त्रे घालून फिरणा-याला धार्मिक मनोवृत्तीचा समजायचे का? गीताजयंती आणि ख्रिस्तजयंतीच्या निमित्ताने सामान्य माणसांच्या मनात हे प्रश्न उभे राहतात! आत्म्याचे स्वरूप जसे स्वसंवेद्य आहे तसे धर्माचे स्वरूपही स्वसंवेद्य आहे. म्हणूनच ह्या प्रश्नांची सोपी उत्तरे देता येणार नाहीत. द्यायचीच झाल्यास  ती ज्याची त्याने स्वतःला द्यावी!

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: