विधानसभा
निवडणुकीच्या निमित्ताने
देशाचे प्रभावशाली भाजपा नेते नरेंद्र मोदी आणि भक्तांनी आर्य चाणक्य ठरवलेले अमित
शहा ह्यांचा घोडा पश्चिम बंगालच्या ममता दीदींनी अडवला! सबंध देश केवळ आपल्याच
साम्राज्यात आणण्याची सत्ताकांक्षा विधानसभा निवडणुकीच्या निकालात काल पराभूत
झाली. तामिळनाडूतही द्रमुकने अण्णा द्रमुकला सत्तेवरून खाली खेचले. फक्त आसाम
राज्यात भाजपाच्या सत्तेला काँग्रेस किंवा अन्य पक्ष धक्का लावू शकले नाही.
अर्थात भाजपाने घडवून आणलेल्या ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर ते अपेक्षितच होते.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला विरोधी पक्षाचे स्थान मिळाले. त्यामागे भ्रष्टाचाराने
बरबटलेल्यांना पावन करून घेण्याचे भाजपाचे धोरणच कारणीभूत आहे.
भाजपाचे धोरण ममतादीदींच्या तृणमूल काँग्रेसला धक्का लावू शकले नाही. भाजपाचा
धक्का लागला तो काँग्रेस आणि डाव्या आघाडीला. प्रादेशिक म्हणून हिणवण्याची आणि
त्यांना गृहित धरण्याची चूक काँग्रेसने केली होती. तीच चूक मोदीप्रणित भाजपानेही
केली. म्हणूनच ममता बॅनर्जींचा विजय हा केवळ त्यांचा वैयक्तिक विजय मानला जाणार
नाही तर देशभरातल्या प्रादेशिक पक्षांच्या अस्मितेचा विजय मानला जाईल. मुख्य
म्हणजे भाजपाच्या अमर्याद महत्त्वाकांक्षेचा पराभव मानला जाईल.
नंदीग्राममध्ये ममतादीदींच्या पराभवामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ ह्या शिवाजीमहाराजांच्या
उद्गारांची आठवण दिल्लीतल्या एका पत्रकाराला झाली! राहूल गांधींना पराभूत
करण्यासाठी अमेथीत स्मृती पराभव केला त्या वेळी भाजपाने सूक्तासूक्त मार्गचा अवलंब
केल्याचा आरोप होताच. अमेथीमध्ये यशस्वी ठरलेला चाणक्य नीतीचा हा प्रयोग
नंदीग्राममध्येही करण्यात आला. तरीही ममता बॅनर्जी मतमोजणीत विजयी ठरल्या.
त्यांच्या विजयाबद्दल उपस्थित झालेला वाद योग्य त्या फोरमवर लढवण्याचे आव्हान ममता
बॅनर्जींनी लगेचच स्वीकारले. ममता बॅनर्जींच्या वैयक्तिक जयापजयापेक्षा तृणमूल
काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये गेल्या खेपेपेक्षा दोन जागा अधिक मिळाल्या इकडे
दुर्लक्ष करता येणार नाही. ममता बॅनर्जी, जयललिता आणि समता ह्या तिघांनी वाजपेयी सरकारच्या काळात सभ्य
राजकारण करणा-या लालकृष्ण आडवाणींना उठाबशा काढायला लावल्या होत्या! परंतु
सध्याच्या आत्ममग्न भाजपा नेत्यांना ह्या सत्याचा बहुधा विसर पडला असावा.
भारताचा इतिहास असे सांगतो की, केंद्रातल्याप्रमाणे देशभरातील
सा-या राज्यात काँग्रेसची सत्ता आणण्याचा प्रयत्न काँग्रेसलाही कधी जमला नाही.
खुद्द पंडित नेहरूंच्याच काळात पट्टमथाणू पिल्ले ह्यांचे विरोधी सरकार केरळात आले
होते. नंतरच्या काही वर्षांत दाक्षिणात्य राज्यांपैकी तामिळनाडू आणि आंध्रातही
काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लागला. उत्तरेत बडी आघाडी स्थापन करून काँग्रेसच्या
सत्तेला शह देण्याचा जबरदस्त प्रयत्न झाला होता. पण तो यशस्वी झाला नाही. त्या
काळी अयशस्वी ठरलेला प्रयत्न आणीबाणी नंतरच्या काळात जयप्रकाशजींच्या पुढाकाराने
झालेला प्रयत्न मात्र यशस्वी झाला. २०१४ साली केंद्राची सत्ता ताब्यात
घेण्याचा गुजरातच्या नेत्यांनी केलेला प्रयत्न कसा यशस्वी झाला हे सर्वज्ञात
आहे. सत्ताप्राप्तीचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला खरा;
पण भारताचे मूलभूत धोरण फिरवून
टाण्याच्या ध्येयपूर्तीचा विचार केल्यास तो अजून शंभर टक्के यशस्वी झाला नाही.
मोदींच्या दुस-या सत्ताकाळात पंजाबच्या शेतक-यांनी भव्य मोर्चा काढून
शेतक-यांनी मोदी सरकारपुढे आव्हान उभे केले. अशाच प्रकारचे आव्हान पश्चिम
बंगाल आणि तामिळनाडू ह्या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निकालाने भाजपापुढे उभे
केले आहे. विरोधकांनी भाजपा नेतृत्वापुढे उभ्या केलेल्या ह्या आव्हानात सध्या तरी
अनेकांना फारसा दम वाटणार नाही. उगमाच्या ठिकाणी नदीची धार लहानशीच असते. परंतु
जसजशी नदी समुद्राच्या दिशेने प्रवास करते त्यावेळी तिचा प्रवाह अक्राळविक्राळ रूप
धारण करतो. गंगेचे रूप गंगासागरलाच पाहावे! गोदावरीचे रूप काकीनाड्यासच पाहावे!!
सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे मोदी सरकारपुढे उभ्या
केलेल्या आव्हानाचे स्वरूप वरवर पाहिल्यास क्षीणच वाटेल. महाराष्ट्रात भाजपाचे
बहुमत असूनही सरकार स्थापन करण्याच्या बाबतीत शरद पवारांनी पुढाकार घेतला आणि
पाहता पाहता सत्तेचा प्याला फडणविसांच्या हातातून हिसकावून घेतला. कर्नाटकच्या
निवडणुकीनंतर काँग्रेसने कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला
होता. पण येडुरप्पांनी तो काही दिवसातच हाणून पाडला. मध्यप्रदेशात कमलनाथांना
जास्त काळ सत्ता टिकवता आली नाही. राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यात गेहलोतना कसेबसे
यश मिळाले होते. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचे त्रिभाजन केले असले तरी जोपर्यंत
तेथे निवडणुका घेतल्या जात नाही तोपर्यंत तेथली सत्ता ख-या अर्थाने भाजपाच्या
हातात येणार नाहीच. केवळ जम्मूची सत्ता भाजपाकडे राहणार आहे. अर्थात जम्मूत
भाजपाचे वर्चस्व पूर्वीपासून आहे.
ह्या विधानसभा निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पाची
राज्यात सत्ता हस्तगत करण्यासाठी निवडणूक बाँडच्या कालव्यातून भाजपाकडे मोठ्या
प्रमाणावर पैशाचा ओघ आला. तोच पैसा वापरून भाजपाने मतदारांची शक्ती
आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही असे म्हणणे भाग
आहे. ह्यातून एकच दिसले, खरीखुरी लोकशक्ती पैशाने विकत घेता
येत नाही. केंद्रात मिळालेल्या दोन वेळा मिळालेल्या बहुमताचा राज्यांच्या विधानसभा
निवडणुकीत फारसा उपयोग झाला नाही. चाणक्यनीतीचाही फारसा उपयोग झाला नाही.
मात्र, भाजपाचे एक ध्येय साध्य झाल्याचे
दिसले. भारत काँग्रेसमुक्त झाला! देश काँग्रेसमुक्त करण्याच्या बाबतीत
भाजपाच्या कर्तृत्वापेक्षा काँग्रेसममधील दुर्बळ नेतृत्वच अधिक कारणीभूत ठरले.
केरळमध्ये शंभर सभा घेऊनही संयुक्त आघाडीला केरळात यश मिळाले नाही. वेळोवेळी
आत्मपरीक्षण करण्याखेरीज काँग्रेसला पर्याय नाही. राखेतून काँग्रेस पक्ष उभा
करायचा तर देशभरातला अवघा काँग्रेसजन मेळवावाच लागेल!
रमेश
झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment