आज राजीव गांधींचा स्मृती दिन! भारतात संगणक युगाची सुरूवात जर कुणी केली असेल तर राजीव गांधींनीच. इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधींचा शपथविधी झाला! परंतु त्यांचा त्यावेळच्या विरोधकांनी पाणउतारा केलाच. 'डून बाॅय" ह्यासारखे शेलके विशेषणे त्यांना लावले. वस्तुत: राजकारणात येण्याची त्यांना इच्छा नव्हती. 'दिल्ली' ही सामान्य माणसांना वाटते तितकी सोपी नाही. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये असे वातावरण खुद्द इंदाराजींच्या अवतीभवती होते. ह्या पार्श्वभूमीवर राजीव गांधींनी राजकारणात प्रवेश करावा असे इंदिराजींना वाटू लागले होते.
शेवटी त्यांच्या राजकारण प्रवेशाचा योग जुळवून आणला. 'सेक्रेटरी जनरल' असे काहीसे वेगळे पद इंदिराजींनी राजीवजींना दिले. काग्रेसमध्ये बाकीचे सगळे जनरल सेक्रेटरी, राजीव गांधी मात्र सेक्रेटरी जनरल! घटनाक्रम बदलत गेला आणि ते पंतप्रधान झाले. बहुतेक सेक्रेटरी जनरल्सनी हे राज्यांचे मुख्यमंत्रीपद साभाळलेले होते. इंदिराजींना वेळप्रसंगी साह्य करणं राजीव गांधींचे काम होतंच. कोणताही निर्णय घेताना तो धडाडीने घेणे आवश्यक असते. राजीव गांधींचा हा गुण ते पंतप्रधान झाल्यावर जनतेच्या लक्षात आला.
मंत्रिमंडळातील कुणालाही न दुखावता निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. शिखांची दंगल आटोक्यात आणताना त्यांची कसोटी लागली. श्रीलंकेत सैन्य पाठवण्याचाही निर्णय त्यांनी कर्तव्यभावनेने घेतला होता. फुटिर शक्तींना काबूत ठेवण्यासाठी श्रीलंका सरकारला मदत करण्यापलीकडे त्यांचा वेगळा हेतू नव्हता. परंतु त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागला. पेरूम्बदूरला निवडणूक प्रचार सभेत त्याच्यावर बाँबहल्ला करण्याचा तामीळ अतिरेक्यांचा कट यशस्वी ठरला. सत्कृत्य केल्याबद्दल राजीव गांधींना प्राणाचे मोल द्यावे लागले!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment