Saturday, May 1, 2021

पुनावाला म्हणतात...


कोवीशील्डचे उत्पादन करणा-या सीरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या फोनला कंटाळले म्हणून तूर्त ते लंडनला निघून गेले आहेत. सरकारने त्यांना 
वाय सुरक्षा दिली होती. तरीही ह्याला लस पुरवा, त्याला आधी पुरवा अशा प्रकारच्या विनवण्या करणारे फोन त्यांना यायला सुरूवात झाली. ह्या विनवण्या असल्या तरी विनवणीकर्त्यांची नारेमाप अपेक्षा आणि अत्यंत आक्रमक भाषाशैली लपून राहिली नाही. लंडनमधील टाईम्सला मुलाखत देताना त्यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. तूर्त तरी त्यांनी भारतातून काढता पाय घेतला आहे हे खरे.

मी एकटा किती पुरा पडणार?’  असे सांगत त्यांनी इंग्लंडमध्ये कोवीशील्डचे उत्पादन करण्याचाही इरादाही पूनावालांनी सूचित केला. लंडन टाईम्यला मुलाखत देताना त्यांच्या ह्या भावना व्यक्त झाल्या. ते म्हणाले, प्रत्येकाला लस हवी आहे. इतकेच नव्हे ती इतरांच्या आधी हवी आहे! परंतु  ती त्यांना इतरांच्या आधी का हवी आहे ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. सगळे जण माझ्या एकट्याच्या खांद्यावर जबाबदारी असल्याचे समजून बोलतात. ऐंशी कोटी डॉलर्सची गुंतवणूक करून सीरमने लशीच्या मात्रांची धमता १५ कोटींवरून २५ कोटींपर्यंत वाढवली. तरीही माझ्यावर नफेखोरीचा आरोप झालाच. वस्तुतः कोवीशील्ड ही जगातल्या कुठल्याही लशीपेक्षा स्वस्त आहे. कोवीशील्डची किंमत किती कमी आहे ह्यांची ग्वाही केवळ इतिहास देईल असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, अचानक भयंकर कोरोनाची दुसरी लाट आली. अशी लाट येईल हे कुणाच्या ध्यानीमनी नव्हते. अगदी परमेश्वर झाला तरी त्यालाही दुसरी लाट येईल हे सांगता आले नसते.

पूनावाला ह्यांच्या बोलण्यात हताश झाल्याचाच सूर अधिक आहे. भारतातल्या वातारवरणामुळे ते वैतागले. त्यांचा वैताग हा एकंदर पारशी माणसांच्या स्वभावाला धरूनच आहे. संवेदनशील स्वभावाचे उद्योजक कंटाळून जावेत हे पूर्वीचेच वातावरण देशात अजूनही कायम आहे हेच ह्या निमित्ताने स्पष्ट झाले.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार


No comments: