Saturday, May 8, 2021

रुग्णसंख्या वाढवणारा विषाणू

भारतात सध्या आलेला कोरोना विषाणू वेगळ्या प्रकारचा आहे. कोरोनारुग्णांची भारतात संख्या वाढण्यास हा नवा विषाणू कारणीभूत आहे, असा निष्कर्ष ब्रिटिश आरोग्य खात्यातील संशोधकांनी काढला आहे. ब्रिटनमधील वेलकम सँगर इन्स्टिट्यूट कोविड१९ जेऩामिक्स इनिशेटिव्हज् ह्या संस्थेचे संचालक जेफ बॅरेट ह्यांनी सांगितले की बी.१.६१७.२ह्या विशिष्ट शास्त्रीय नावाने ओळखल्या जाणा-या ह्या विषाणृमुळे भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. भारतातही कोरोना विषाणूविषयक जेनॉम सिक्वेन्सिंगवर संशोधन सुरू झाले.  परंतु संशोधनाचा म्हणावा तितका स्पष्ट निष्कर्ष अजून तरी समोर आलेला नाही. तसा तो आला असता तर कोरोना नियंत्रण यंत्रणेने त्यानुसार कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत बदल केला असता. केंद्रीय आरोग्य खात्याकडून  केल्या जाणा-या दैनंदिन प्रेसब्रिफिंगमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख झाला नाही. अर्थात त्यात आपल्या संशोधकांची चूक नाही. केंद्र सरकारला आपल्या महान संस्कृतीबद्दल अतीव आदर असल्याने गोमुत्र प्राशन आणि गायत्री ह्या उपचारासंबंधी विचारविनिमयापलीकडे जाण्याची सरकारला इच्छा  नाही.

देशात जास्तीत जास्त लसीकरण मोहिम राबवणे हाच तूर्त तरी कोरोना रोखण्याचा मार्ग आहे, ह्या आरोग्य यंत्रणेच्या मताशी देशातील नामवंत डॉक्टरही सहमत आहेत. सुदैवाने भारतात सीरम आणि भारत बायोटेक्स ह्या दोन कंपन्यांनी भारतात लसनिर्मितीचा सपाटा लावला. परंतु लसपात्र नागरिकांची प्रचंड संख्या लक्षात घेता ही लसनिर्मिती पुरणार नाही हे उघड होते. तेव्हाच खरे तर, जास्तीत जास्त देशातून लस मिळवण्याचा प्रयत्न सरकारने करायला हवा होता. उशीरा का होईना, स्पुटनिकसारख्या रशियन लशी मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. अमेरिकेनेही लसनिर्मिती कंपन्यांसाठी अस्तित्वात असलेला पेटंट  कायदा तात्पुरता स्थगित करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे जगातील अनेक कपन्यांना कोरोना लशीचे उत्पादन करणे शक्य होईल. लशीच्या संदर्भात अमेरिकन सरकारने दाखवलेली कल्पकता आणि लवचिकता प्रशंसनीय आहे. अमेरिकेचे अनुकरण म्हणून की काय, भारतानेही कोरोना उपचारासाठी लागणारी औषध उत्पादनासंबंधीची बंधन शिथील केली.

आवश्यक तेवढ्या मात्रांची टंचाई असतानाही  १ मेपासून १८ ते ४५ वयोगतील सर्वांना लस देण्याची मोहिम सुरू करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. लसटंचाईची जबाबदारी केवळ महापालिकांवर सोपवून सरकार मोकळे झाले. त्याखेरीज मुठभर खासगी इस्पितळांनाही लस टोचण्याचा कार्यक्म हाती घेण्याची मुभा पूर्वीच देण्यात आली. ती कायम ठेवण्यात आली. सरकारच्या घोषणेमुळे मुंबई, ठाणे, कल्याण इत्यादि मोठ्या शहरात लशीकरण केंद्रावर उसळलेली गर्दी आटोक्यात आणण्याचे काम मुष्किल होऊन बसले. शेवटी पूर्वी सुरू असलेली वॉक इन पध्दत अवलंबण्याची वेळ आली. लस घेण्यासाठी पूर्व नोंदणी करता यावी म्हणून केंद्राने सुरू केलेल्या आरोग्यसेतु अपचा वापर भल्या भल्यांना करता येत नाही. बहुसंख्य लोकसंख्या डिजिटली अडाणी वर्गात मोडणारी आहे हे लक्षात घेऊन वॉक इन लसची पध्दत रीतसर सुरू ठेवणे योग्य ठरेल.  ह्या परिस्थितीत लसेच्छुंची झुंबड उडून कोरोनाच्या प्रसारास चालना मिळाली हे चांगले लक्षण आहे. झुंबड केल्याबद्दल लसेच्छुंना दोष देणेही योग्य ठरणार नाही. उलट लोक किती जागृक आहेत हेच झुंबडमुळे  दिसून आले. कोरोना नियंत्रणासाठी रांग नियंत्रणही तितकेच महत्त्वाचे आहे. संबंधितांनी तिकडे अधिक लक्ष पुरवणे निश्चितच गरजेचे आहे.  

भारतात कोरोनाची दुसली लाट येत असताना देशाचे दोघे बलवान नेते पश्चिम बंगालमध्ये दंग होते. निवडणुकीच्या माध्मयातून पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार आणण्याच्या पवित्र कार्यातून मोकळे होताच त्यांच्या चेल्याचपाट्यांनी  तिस-या कोरोना लाटेचे भाकित करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सध्या आलेल्या दुस-या लाटेकडे पाहात राहण्यापलीकडे आणि औषधे, ऑक्सीजन आणि अपु-या डॉक्टर आणि सहाय्यकवर्गांबद्दल तक्रारी करण्यापलीकडे राज्य सरकारे काही करू शकली नाही. अपु-या पुरवठ्याच्या तक्रारी देशीविदेशी वर्तमानपत्रात तर छापून आल्याच; शिवाय ५-६ राज्यांतील उच्च न्यायालयांनी केंद्र सरकारची भीडमुर्वत न  बाळगता सरकारी यंत्रणेला फटकारलेही. ह्या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाला लक्ष घातले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केंद्र सरकार योग्य त बोध घेईल अशी आशा आहे.

अनेक राज्यात कोरोना संकट हाताळण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्याचा मार्ग राज्य सरकारानी पत्करला आहे. कर्नाटकात तर टाळेबंदी जाहीर झालीदेखील! उत्तराखंड कुंभ मेळाव्याला सरकारने वेळीच बंदी न घातल्यामुळे खुद्द उत्तराखंडात आणि शेजारच्या राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातही परिस्थिती फारशी चांगली नाही. आता कोरोनामुळे देश हताश झाला आहे. सगळा देश रामभरोसे हिंदू हॉटेलसारखा झाला आहे. आपण एकविसाव्या शतकात वावरतो आहोत का ऋषीमुनींच्या रामायण-महाभारत काळात वावरत आहोत हा खरा प्रश्न आहे!

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: