माझे गुरू पहिल्या भेटीत माझे गुरू नव्हते! एका शनिवारी ते मला म्हणाले, ‘साहेब, या रविवारी. तुमची माझ्या मित्रमैत्रिणींशी ओळख करून देईन.’
पोषाखाकडे पाहिल्यावर ते अजिबात
गुरू वाटत नव्हते. सफेद पँट. सफेद शर्ट. रेल्वेच्या लाईन स्टाफपैकी एखाद्या रेल्वे
कर्मचा-याचा पोषाख असतो तसा त्यांचा पोषाख होता. ही व्यक्ती साधी नाही. ते गुरू
आहेत, ह्याची कल्पना मला माझ्या मित्रानं आधीच दिली होती. म्हणूनच त्यांच्याकडे
जाण्याची माझी टाळाटाळ सुरू होती.
‘कशाला माझी चेष्टा करता?’ मी
‘मी गरीब माणूस ! मी कशाला बरं तुमची चेष्टा करीन?’
न येण्याच्या माझ्या सगळ्या सबबी
सांगून झाल्या होत्या. जायचे नसेल तर ‘रात्रपाळी
आहे’ ही माझी पेटंट सबब होती. १९८१ साली ऑक्टोबर महिन्यात दत्ता
सामंतांनी लोकसत्तेत संप सुरू केला. गोएंकांनी लगेच ‘क्लोजर
नोटिस’ लावली. त्यामुळे नकार देण्याची माझी रात्रपाळीची सबब पार
निकालात निघाली.
‘ठीक आहे. येतो मी रविवारी!’
ठरलेल्या दिवशी मी त्यांच्याकडे
गेलो. त्यांनी माझी ज्ञानेश्वरांची आणि मुक्ताईची म्हणजे त्यांच्या अभंगांची जुजबी
ओळख करून दिली. नंतर नामदेव आणि तुकारामांचीही ओळख अभंगांव्दारे करून दिली. हाच
माझा मित्र परिवार! अन् हो! सर्वात शेवटी माझी
स्वत:चीही ओळख मला करून देण्याचा आदेश त्यांनी पीठासीन दानवेमहाराजांना दिला. लोकांना
स्वतःची ओळख करून देण्याचा प्रकार जरा चमत्कारिक वाटेल. मलाही तो प्रकार चमत्कारिक
वाटला. हळुहळू काही वर्षांनी माझ्या लक्षात आले की, अरे हीच तर माझी खरी ओळख!
कार्यक्रम संपला!
मी- दक्षिणा काय देऊ?
गुरू- साडेतीन अडके!
आधी मला काही बोध झाला नाही. नंतर
लक्षात आले की साडेतीन मात्रेच्या मंत्राने सुरू होणारा षडाक्षरी मंत्र मनातल्या
मनात उच्चारून त्यांना चरणस्पर्श करायचा!
'आता ओळख वाढवणे तुमच्या मर्जीवर आहे. ओळख वाढवायची इच्छा
असेल तर वाढवा. नसेल इच्छा तर नका वाढवूं!...'
मला निरोप देण्यासाठी ते
स्टेशनपर्यंत आले. माझ्या हातात त्यांनी शेंगदाण्यांची पुडी ठेवली.
बहुतेक सारे मंत्र तर छापील पुस्तकात दिलेलेच
असतात. त्यावर ते म्हणायचे, बंदुकीची गोळी हाताने फेकून कुणाला ठार मारता येत
नाही. गोळी ही बंदुकीतूनच मारायची असते. बंदुकीचा खटका कसा दाबायचा हेही
महत्त्वाचे असते. मंत्रासोबत त्यांनी एक गुह्यही दिले. ते गुह्य मला सर्वस्वी नवे
होते. मलाच ते नवे होते असे नाही. असंख्य अनुग्रहित म्हणवणा-यांना ते माहित नसते
असे म्हटले तरी चालेल! अगदी सुरूवातीपासून ‘गुरू संस्था’ बदनाम होण्याचे हे एक कारण आहे. तो मंत्र कोणता अशी पृच्छा कुणी केली तर
त्याचे उत्तर मी देणार नाही. गुरूपदिष्ट विद्या चव्हाट्यावर बोंबलून सांगायची
नसते, अशा अर्थाची ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे.
बीए मराठीच्या अभ्यासक्रमात ज्ञानेश्वरीचा एक
अध्याय अभ्यासावा लागतो. माझ्या वेळी तिसरा अध्याय होता. प्रा. सुधाकर जोशी
ह्यांनी तो अध्याय तन्मयतेने शिकवला ह्यात शंका नाही. त्या विषयात मला भरपूर
मार्क्स मिळाले. परंतु मला तो अध्याय समजला असे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. तुम्हाला
मी माझे मित्र ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ आणि रामदासांची ओळख करून देईन
असे मला गजाननमहाराज अटक ह्यांनी कबूल केले होते. दुस-या कार्यक्रमाच्या वेळी त्याची
त्यांना मी आठवण करून देताच ते म्हणले, असं करू या आधी ज्ञानेश्वरांपासून सुरूवात
करू या...
मी तयार आहे, असे त्यांना सांगितले खरे; पण खरं सांगायचं तर माझाच माझ्यावर विश्वास नव्हता. स्केप्टिक नसेल तर तो
पत्रकार कसला? विचारायचे म्हणून मी विचारले, माझ्याकडून मी
काय केले पाहिजे?
‘ज्ञानेश्वरीचे २१ दिवसांचे पारायण! ’
‘बस्स?’
‘हो. पारायण करताना अर्थविवेचन वाचण्याची गरज नाही. फक्त ओव्यांवरून बोट
आणि नजर फिरवायची! उच्च कंठाने वाचण्याची गरज नाही...
तुम्हाला बुवा व्हायचं असेल तर मोठ्यानं वाचा!’
शंभर लुच्चांचा एक बुवा आणि हजार बुवांचा एक
महाराज ही उक्ती वारकरी मंडळात प्रसिद्ध आहे. महाराज म्हणाले, आपल्याला काय व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.
त्यांनी मात्र एक मात्र नक्की ठरवलं होतं- ज्ञानेश्वरी जगायची! वारकरी शिक्षण संस्थेत अभ्याक्रम पुरा केल्यानंतर त्यांचे गुरू मामासाहेब
दांडेकरांनी त्यांना विचारले, अटक तू काय
करायचं ठरवलं आहे? कीर्तने-प्रवचने करायची
इच्छा असेल तर खुशाल कर माझा तुला आशिर्वाद आहे. मी मामांना मला चालतीबोलती ज्ञानेश्वरी
जगायचीय्! मामांनी त्यांना तथास्तु म्हटलं.
लालबाग येथील बहिणीचे घर सोडून कर्जतजवळ दहिवली
गावात त्यांनी भाड्याने जागा घेतली. अर्थात मामांच्या सल्ल्याने! कुणी विचारायला आलं
तर ते त्यांना ३-४ किलोमीटरवर शिरसे तमनाथ
येथे घेऊन जायचे. त्याला व्यवहाराच्या चार गोष्टी सांगत असत. अर्थात हा त्यांचा उद्योग
शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशी चालायचा. ते टेलिफोन खात्यात नोकरीला होते.
सकाळी सातसाडेसातची लोकल पकडून ते कामावर जात. ‘सेंट्रल
गव्हर्नमेंटची नोकरी नॉट अ जोक!’ ते गंमतीने म्हणायचे.
नोकरीत बॉसला सांगितल्याखेरीज त्यांनी कधीच सुटी घेतली नाही. मुंबई बंद वगैरे
भानगड असेल तर आदल्या संध्याकाळी मी बहिणीकडे मुक्कामला जात. दुस-या दिवशी चालत १०
वाजता थेट ऑफिसमध्ये पोहचत! शनिवार- रविवारच्या बैठकीतून
पुढे भगवाननाना कांबळे, अप्पा कांबळे, दानवे इत्यादि १०-१२ जणांचा शिष्य परिवार
जमा झाला. अध्यात्माचा विषय त्यांनी कधीच काढला नाही, व्यावहारिक अडचणींवर सुचेल
ते उपाय आल्या गेल्यांना त्यांनी सुचवले. एकदा
त्यांना एका शिष्याने विचारलेच. मामांनी तुम्हाला असं काय दिलं की ज्यायोगे तुम्ही
आमच्या हरेक अडचणींवर उपाय सुचवतां?
‘तुमची इच्छा असेल तर ते गूढगम्य रहस्य मी तुम्हालाही सांगेन!’
शेवटी पौर्णिमेचा दिवस ठरवला. शिरशाला अप्पा
कांबळेंच्या घरी छोटी बैठक ठरवली. ज्ञानेश्वरीची प्रत आणि मामांचा फोटो त्यंच्याकडे
होताच. रात्री बरोबर १२ वाजता कार्यक्रम सुरू केला. ‘ओम नमोजी आद्या’ ह्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीपासून
त्यांनी सुरूवात झाली. एक तुकारामाचा अभंग आणि नामदेवाचा अभंग बस्स! नंतर ते
म्हणाले, ‘तुम्ही सगळ्यांनी बोलायचे आहे. सुचेल ते बोला. मी फक्त
ऐकणार ! पहाटे ४
वाजेपर्यंत ते प्रत्येकाचे अनुभव, विचार, अभंग काय वाट्टेल ती बडबड लक्षपूर्वक ऐकून
घेत. बरोब्बर चार वाजता त्यांच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग सुरू व्हायचा.
गुह्यासह बीजमंत्र, गुरू परंपरा, दर्शन कसे
घ्यायचे हे दानवेमहाराजांनी शिकवले. ज्याची इच्छा नव्हती त्यांला अर्थातच मंत्र
घेण्याची त्यांनी अजिबात सक्ती केली नाही.पसायदानाने कार्यक्रम संपला.
असे हे वैष्णव पंथीय संस्कार केंद्र बरीच वर्षे
सुरू होते! कुठे पताका नाही. भगवा ध्वज नाही. शिरसा येथील वैष्णव पंथीय संस्कार
केंद्राची परंपरा इतर वारकरी संस्कार केंद्रापेक्षा थोडी वेगळी होती. ज्येष्ठ शिष्याला पीठासनावर बसण्याचा
आदेश त्यांनी दिला. ते स्वतः बाजूला पोत्यावर बसायचे. ‘तुमच्या
प्रश्नाची उत्तरे तुम्हीच शोधा’ असे एकूण वैष्णव संस्कार
केंद्राचे अनुच्चारित धोरण होते.
१९९४ सालीच अटकमहाराज समाधीस्थ झाले ! समाधी म्हणजे इच्छेने देह ठेवणं, देह सोडणं!
आत्मतत्त्व परमतत्त्वात विलीन करणं, सहज विलीन होणं, अशी त्यांनी स्वतःच समाधीची
व्याख्या केली होती.
रमेश झवर
No comments:
Post a Comment