Friday, July 30, 2021

हाडाचा आमदार

ब-याचदा लेखकाचे वर्णन हाडाचा लेखक’ असे केले जाते. आमदारासारखा न वागणारे णपतराव देशमुख ह्यांचं वर्णन  हाडाचा आमदार असा करता येईल११ वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम गणपतराव देशमुख ह्यांच्या नावावर आहे. हा नुसताच विक्रम नाही. सांगोला ह्या त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येकाविषयी त्यांना आत्मीयता होती. त्यांच्याबद्दलची प्रत्येक मतदाराची भावनाही आत्मयतेची होती! १९७८ साली त्यांना शरद पवारांनी राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात घेतले. १९९९ साली विलासराव देशमुखांनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून घेतले होते. दोन वेळा मंत्रीपदाची झूल त्यांच्यावर पांघरली गेली तरी सामान्य माणसासारखेच वागण्याचा त्यांचा स्वभाव काही बदलला नाही. मुळात आमदारकी कधीच त्यांच्या डोक्यात भिनली नाही, तर मंत्रीपद त्यांच्या डोक्यात कसे भिनणार?

लाल निशाण गटाच्या अभ्यासवर्गात त्यांनी जो काही अभ्यास केला असेल तो त्यांना आयुष्यभर पुरलासुदैवाने विधानसभा कव्हर करणा-या माझ्या पिढीच्या पत्रकारांना विधानसभेत सरकारच्या धोरणाची चीरफाड करणारे आमदार म्हणून पाहायला मिळाले. प्रश्नोत्तराच्या तासापासून ते विधेयाकावरील चर्चेत त्यांनी भाग घेतला नाही असे कधीच झाले नाही. त्यामुळे ते बोलायला उभे राहिले की इकडेतिकडे फिरणारे सारे पत्रकार पटापट गॅलरीत येऊन बसायचे. त्यांच्या भाषणातला मुद्दा मिस होणार नाही ह्याची काळजी प्रत्येक वार्ताहर घ्यायचा. बहुतेक वर्तमानपत्रांचा नाईक सरकारला पाठिंबा असण्याचा तो काळ होता. तरीही गणपतरावांचे भाषण चुकवले तर संपादक आपल्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही हे प्रत्येक वार्ताहराला माहित होते. अर्थात त्यांचे भाषणही ऐकण्यासारखे होते. ते ऐकण्याची प्रत्येकाला उत्सुकता असायची. खुद्द अध्यक्ष शेषराव वानखेडे देखील त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत. वास्तविक ते शेकापचे निष्ठावंत आमदार. परंतु सरकारवर त्यांनी केलेली सोलीव टीका नेहमीच ऐकण्यासारखी होती.

सांगोला मतदारसंघात त्यांनी केलेल्या कार्याचा आणखी एक अज्ञात पैलू होता. तो मला अगदी योगायोगाने कळला. एकदा देशमुख पत्रकार संघात आले तेव्हा गप्पा मारण्याचा त्यांचा मूड होता. उपस्थित पत्रकारांशी गप्पा मारताना ते म्हणाले, सांगोल तालुक्यात डाळिंबाच्या लागवडीत मी लक्ष घातले. सांगोल्या तालुक्यातील हवामाव डाळिंबाला पोषक आहे हे माझ्या लक्षात येताच अनेक जणांना डाळिंबाची लागवड करायला मी उत्तेजन दिले. मला प्रतिसादही उत्तम मिळालागेल्या १५ वर्षात डाळिंबाच्या बागा उगवल्या. आता तर एकही बहर असा गेला नाही की ज्या बहरात भरपूर डाळिंबे लागली नाही.

मोठ्या प्रमाणावर डाळिंबे येत असतील तर ऊसाच्या रसाप्रमाणे मुंबई, पुण्यात डाळिंबाच्या रसाचे स्टॉल सुरू करायला हरकत नाही. त्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न वाढेल!’ माझा अगांतुक सल्ला.

त्यावर ते शांतपणे म्हणाले, कल्पना चांगली आहे.

अर्थात ती कल्पना साकार करण्याच्या दृष्टीने त्यांनी पुढे काय केले हे कधीच कळले नाही. कदाचित् ती कल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या कामी अडचणी आल्या असाव्यात! मुंबईपुण्यात बहुतेक ज्यूस स्टॉलवर मोसंबी, गाजर, संत्रा, द्राक्षं इत्यादि फळआंच्या रसाप्रमाणे डाळिंबांचा रसही मिळतो डाळिंबांच्या रसाला एकूण ग्राहक कमीच. परंतु ऐंशी नव्वदच्या दशकापासून अनेक शहरात डाळिंबे मोठ्या प्रमाणावर दिसू लागली. ती ज्या ज्या वेळी दिसली त्या त्या वेळी मला गणपतरावांची आठवण झाली. त्यांची आठवण होत राहरणार!

रमेश झवर



No comments: