Thursday, July 8, 2021

हिंदी सिनेमाचा शहेनशहा

हिंदुस्थानचा बादशाह होण्यासाठी मोगल सत्तेवर येणा-या सुरूवातीच्या अनेक बादशहांना कर्तृत्व पणाला लावून जिद्दीने संघर्ष करावा लागल्याचा इतिहास आहे. दिलीपकुमारलाही यश मिळवण्यासाठी अंगात असलेलेल सारे कौशल्य पणास लावावे लागले. ठोकळेबाज अभिनय करणा-या आणि केवळ नाटकी संवादांची उधळपट्टी करण्यात वाकबगार असलेल्या अनेक तथाकथित नटांशी दिलीपकुमारला व्यावसायिक स्पर्धा करावी लागली. त्यात तो मोगल सम्राटाप्रमाणे यशस्वी झालाही. नायिकाप्रधान सिनेमांचा तो काळ. साहजिकच सुस्वरूप नटांचीच त्या काळात चलती अधिक! सुस्वरूप नसलेल्या सिनेनटांना सहनायक किंवा लहानमोठ्या व्यक्तिरेखा साकार करत बसण्याखेरीज पर्याय नव्हता. परंतु दिलीपकुमारचे नशीब थोर म्हणून त्याला ज्वारभाटाह्या त्याच्या पहिल्याच सिनेमात नायकाची भूमिका मिळाली. नंतर हळुहळू अभिनयाचा कस लागेल अशा भूमिका करत करत  दिलीपकुमारची वाटचाल सुरू झाली.  त्याच्या पिढीतील अनेक नायकांना दिलीपकुमारने मागे टाकले. स्वतःचे अभिनय साम्राज्य स्थापन केले. त्या साम्राज्याचा तो  चक्रवर्ती सम्राट झाला. त्याने स्पर्धेत विजय कसा मिळवला हे इमेजबिल्डिंगचे कंत्राट घेणा-या आजच्या पिढीतील सिनेपत्रकारांना कदाचित माहित नसेल. माहित असण्याचे कारणही नाही. दिलीपकुमार ह्या नावाने चित्रपटसृष्टीत  प्रवेश करणारा युसुफ खान हा मुस्लिम समाजातल्या स्वतःला श्रेष्ठ समजणा-या खानवर्गियांपैकी असूनही त्याच्याकडे ना पाकिस्तानी पंजाबी कुटुंबाची पार्श्वभूमी, ना पाठराखण करणारे बंगाली कलावंत! नाशिकच्या एका साध्यासुध्या कुटुंबांतून सिनेमाच्या मोहनगरीत तो आला होता. साहजिकच हे माकड कुठून शोधून आणले अशी प्रतिक्रिया लब्धप्रतिष्ठितांच्या सिनेवर्तुळात उमटली.

भूमिका नायकाची असली तरी नायकाचे स्वभाववैशिष्ट्य प्रकट करणारा अभिनय, संवाद म्हणण्याची लकब ह्या त्याच्या गुणांमुळे त्याने लौकरच  ‘ट्रॅजेडी किंगची जागा पटकावली. नंतरच्या काळात त्याचे सुखात्मक सिनेमाही गाजले. बॉक्सऑफिसहीटसिनेमांप्रमाणे उच्चअभिरूचीसंपन्न प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील अशा सिनेमात त्याने केलेली कामे गाजली. तत्कालीन बहुतेक गाजलेल्या अभिनेत्रींनी दिलीपकुमारबरोबर नायिकेच्या भूमिका केल्या. निम्मी, मधुबाला, मीनाकुमारी, कामिनी कौशल, नर्गिस ह्यासारख्या गाजलेल्या नट्यांसमवेत दिलीपकुमाराच्या कामाची सिनेरसिकांकतकडून प्रशंसा झाली. अगदी खूप मागाहून आलेल्या वैजयंतीमालासमवेतही त्याने हिरो म्हणून काम केले. दिलीपकुमारप्रमाणे त्याच्याबरोबर काम करणा-या नायिकांच्याही भमिका गाजल्या. सिनेमाचे यश दिलीपकुमारचे की त्या नायिकांचे असा प्रश्न सिनेरसिकांच्या मनात निश्चित उत्पन्न झाला.  दाग, दीदार, देवदास, कोहीनूर, अंदाज,  मोगले आझम आझाद, ‘नया दौरह्यासारखे त्याचे अनेक सिनेमे गाजले.

आझाद` सिनेमा पाहताना अभिनयसंपन्न दिलीपकुमार हा चांगला नकलाकार आहे ह्याचाही प्रेक्षकांना नव्याने शोध लागला.  आजादनावाचा लुटेरा वेष बदलून नागरी वस्तीत येतो. उच्चभ्रू समाजल्या जाणा-या प्रतिष्ठितांच्या बैठकीत सहज गप्पा मारताना त्याला पाहताच प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करत. अलीकडे अमिताभ बच्चनही एखाद्या प्रसंगात चांगल्या नकला करून प्रेक्षाकांना मनसोक्त रिझवले आहे. उत्कृष्ट अभिनेता हा चांगला नकलाकारही असतो हा एक सर्वस्वी नवाच मानदंड निर्माण करण्याचा मान दिलीपकुमारकडे जातो हे नमूद करावेसे वाटते. दिलीपकुमारने एका हिंदी चित्रपटात पाहुणा कलावंत म्हणून काम केले. त्या दिलीपकुमार हा खेडूत माणसाच्या वेषात दिसला. हा माणूस ऊस खात खात रस्ता ओलांडत असतो. रस्ता ओलांडताना तो नेमका मेहमूदच्या कारला आडवा येतो तेव्हा मेहमूद उद्गारतो, `जा बे! दिलीपकुमार का नाम लेकर राशन खानेवाले तेरे जैसे हमने बहोत देखे है!मेहमूदच्या ह्या वाक्यावर थिएटरातील प्रेक्षकांना केलेल्या टाळ्यांच्या कडकडाटाची कल्पनाही येणार नाही. हा प्रसंग जितका विनोदी आहे तितकाच मार्मिकही आहे.

माझ्या पिढीपर्यंत दिलीपकुमारचा करिष्मा कायम होता. रस्त्याने आलिशान कारने जाणा-या  दिलीपकुमारला प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद मुंबईकरांनी अनेकदा लुटला आहे. दिलीपकुमारच्या अफाट यशाचे कोडे अजून तरी कुणाला सोडवता आलेले नाही. सोडवता येणारही नाही. माझी त्याला श्रध्दांजली.

रमेश झवर


No comments: