Monday, March 28, 2022

कहाणी छन्‌ छन् रुपयाची !



अर्थशास्त्रीय परिभाषेत भले रुपयाची किंमत भले, १०-१२ पैसे असेल !  परंतु  प्रामाणिकपणे कष्ट करता करता  स्वप्ने पाहणा-याच्या  दृष्टीने त्याचे मोल लाख ६० हजार रुपये आहे. तामिळनाडूतील सालेम ह्या वनश्रीने नटलेल्या सुंदर गावातल्या एका दुकानदाराकडून  दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका प्रामाणिक तरुणाची ही कथा आहे. आपली स्वतःची मोटरसायकल असावी हे त्या तरुणाचे स्वप्न होते.

 बूभती हे त्या तरुणाचे नाव !  संगणक ऑपरेटर म्हणून काम करता करता यूट्युबवर कार्यक्रम  तयार करून देण्याची कामे तो करू लागला. रोजच्या कमाईतून  एखादा रुपया मागे टाकण्याचा त्याचा नियम होता. साचलेली सगळी चिल्लर गोळा करून ती घराजवळच्या देवळाजवळ किंवा चहाच्या टपरीपाशी विकण्याचाधंदा त्याने सुरू केला. गेल्या अनेक वर्षापासून त्याचा हा धंदा सुरू होता. त्या कमाईतून तो रोज सुटा १ रुपया मागे टाकत असे. साचलेली रक्कम मोजून पाहिल्यावर दुचाकी वाहन घेण्याइतपत आपल्याकडे रक्कम अजून जमलेली नाही हे त्याच्या अर्थात लक्षात येत असे. त्या काळात २ लाख रुपयांत दुचाकी वाहन मिळत होते. त्यावेळपर्यंत त्याच्याकडे २ लाख रुपये जमलेले नव्हते. अर्थात तो निराश झाला नाहीरोज एक १ मागे टाकण्याचा क्रम त्याने सुरूच ठेवला. त्याचा हा क्रम जवळ जवळ ३ वर्षे सुरू होता.

ह्या आठवड्यात रक्कम मोजून पाह्यल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण आता दुचाकी वाहन घेऊ शकतो. सालेममधल्या भारत एजन्सी ह्या टू व्हीलर मार्टमध्ये तो गेला. मला बाईक हवी असल्याचं त्यानं मार्टच्या विक्री कर्मचा-यांना सांगितलं. कर्मचा-यांनी त्याला प्रमुख विक्री अधिकारी महाविक्रान्त ह्यांच्याकडे नेलं. महाविक्रान्त ह्यांना त्यानं प्रस्ताव दिला, माझ्याकडे २ लाख ६० हजारांची रोख रक्कम आहे. मात्र सारी रक्कम १ रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात आहे. मला तुमचं दुचाकी वाहन घ्यायचंय् ! विक्री अधिकारी महाविक्रान्त ह्यांनी त्याला आपादमस्तक  न्ह्याळून  पाहिले. सांगितले, ’सॉरी चिल्लर  स्वरूपातली रोख रक्कम मला स्वीकारता येणार नाही !’  

परंतु त्या तरुणाची वाहन खरेदीची दुर्दम्य इच्छा पाहून शेवटी चिल्लर स्वीकारण्याचे विक्री अधिका-याचं मन पालटलं. त्यानं नाणी स्वीकारण्याचं मान्य केलं. चिल्लर स्वीकारण्याचं मान्य करताना महाविक्रान्तनं मनातल्या मनात हिशेब केलारोकड रक्कम हाताळण्याचा २ हजार रुपयांच्या एका बंडलला १४० रुपये स्टेट बंकेला द्यावे लागतात हे त्याला माहित होतं. परंतु चिल्लरचे किती रुपये द्यावे लागतील ह्याचा त्याला अजून अंदाज नाही. तरीह जो खर्च करावा लागेल तो करण्याची तयारी त्यानं केली. थोडा विचार करून तरूण बूभतीला त्यांनी होकार दिला. झाले ! मार्टमधील सर्व मंडळी चिल्लर मोजण्याच्या कामाला लागली.दोन लाख साठ हजार रुपये मोजण्यास त्यांना तब्बल १० तास लागले. शेवटी रात्री ९ वाजता बूभती वाहन घेऊन घरी गेला.

आता विक्री अधिकारी महाविक्रान्त ह्यांना काळजी पडली आहे की  ही सगळी रक्कम स्टेट बँकेच्या खात्यात जमा कशी करायची ! परंतु तरूण ग्राहक जितका आशावादी तितकाच महाविक्रांतदेखील आशावादी आहेत ! कसंही करून रुपयाच्या नाण्याच्या स्वरूपात असलेली रोख रक्कम बँकेच्या खात्यात भरण्याची स्ट्रॅटेजी त्यांनी नक्कीच ठरवली असावी.  स्टेट बँकेच्या अधिका-यांना गळ घालण्याचे त्यानं बहुधा ठरवलं असावं. कारण बँकेत रक्कम जमा करण्याखेरीज त्यांच्यापुढे पर्याय नाही. स्टेट बँकेखेरीज रोख रक्कम स्वीकारण्यास अन्य बँका तयार होत नाही. ट्रेझरी बिझिनेसमध्ये स्टेट बँक अग्रणी आहे.

रमेश झवर

https://rameshzawar.co.in

No comments: