Tuesday, May 10, 2022

संकल्प आणि सिध्दी

देशव्यापी आघाडीवर पुन्हा एकदा  प्रमुख राजकीय पक्ष म्हणून वावरण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज होत आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर जादूच्या छडीचा उपयोग होणार नाही. त्यासाठी शिस्त, सामूहिकरीत्या कष्ट उपसण्याची तयारी, वैयक्तिक त्यागाची भावना इत्यादींची नितांत आवश्यकता असते हे त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना सांगितले. कंबर कसून कामाला लागण्याखेरीज काँग्रेससमोर तरणोपाय नाही ह्या मुद्द्यावर सोनियांजींनी भर दिला. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बैठकीत केले. आजवर काँग्रेसजनांना जे दिले त्याची परतफेड करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले.  केवळ आवाहन करून त्या गप्प बसल्या नाही असे नाही तर ह्या संदर्भात अधिक विचार करण्यासाठी उदेपूर येथे दि. १३ ते १५ मे रोजी चिंतन शिबीर बोलावण्याची घोषणाही त्यांनी केली.

मनाचे संकल्प साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. हा नियम जसा व्यक्तीला लागू पडतो तसा तो संघटनेलाही लागू पडतो. विजयाचा संकल्प साकार करण्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज असते. मात्र, आत्मपरीक्षण करतेवेळी कोणाला दुखावण्याचा उद्देश असू नये ह्या सोनियाजींच्या मताशी काँग्रेसजनांनी  सहमत होण्यास हरकत नाही. काँग्रेस हा आज घडीलाही संसदेतला सर्वात मोठा पक्ष आहे. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस इत्यादि काँग्रेस आडनावाच्या अन्य पक्षांनीही काँग्रेसला साथ दिल्यास मोठा विरोधी पक्ष ह्या नात्याने राजकीय अवकाशात फार मोठी झेप घेणे काँग्रेसला शक्य होईल. अर्थात हे अवघड असले तरी अशक्य नाही.  मध्यंतरी मोदी सरकारने निवडणूक निधी उभारण्यासाठी निवडणूक रोखे जारी केले होते. त्या रोख्यांतून भाजपाला सर्वाधिक निधी मिळाला हे सांगण्याची गरज नाही. भाजपा खालोखाल  काँग्रेसला निधी मिळाला. देशाची एकंदर मानसिकता लक्षात घेता मोठ्या उद्योगांकडून सत्ताधा-यांच्या झोळीत अधिक दान पडले ह्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. निवडणुकीच्या राजकारणात पैसा महत्त्वाचा आहे हे खरे; परंतु केवळ पैसाच महत्त्वाचा असतो हे तितकेसे खरे नाही.  

ह्या वर्षी गुजरात आणि हिमाचल प्रदेशात निवडणुका होऊ घातल्या असून त्यापूर्वीच पक्षात एकोप्याची भावना निर्माण होणे आवश्यक आहे असे मत कार्यकारिणीत अनेक सदस्यांनी व्यक्त केले. ह्या निवडणुकांखेरीज २०२४ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे ध्येय ठेवणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. ह्याचा अर्थ निवडणुक जाहीर झाल्यानंतर एकमेकांना शह-काटशह देत बसण्यापेक्षा प्रयत्क्ष कामाला लागणे मह्त्त्वाचे मानले पाहिजे. काँग्रेसला योग्य वेळीच सुबुध्दी सुचली असे म्हटले पाहिजे. ही सुबुध्दी २०१४ साली सुचली असती तर काँग्रेसवर मुळात सत्ता गमावण्याची पाळीच आली नसती ! नाही म्हटले तरी २०१४ साली  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी लोकसभा निवडणुकीत निःस्वार्थीपणे काम केले होते हे विसरून चालणार नाही. ह्याउलट गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसकडे निःस्वार्थी कार्यकर्त्यांची वानवाच आहे. निवडणुकीत कार्यकर्ता म्हणून फिरणारे बहुतेक जण ’पेड वर्कर्स’ आहेत हे उघड गुपित आहे. ह्यउलट भाजपाला संघस्वयंसेवकांनी निवडणुकीत खूप मदत केली. दुय्यम पातळीवर वावरणा-या अनेक काँग्रेस नेत्यांना भाजपाने तिकीटे दिली हीही वस्तुस्थिती आहेच.

सध्याच्या परिस्थितीत आधी काँग्रेसजनांत एकोपा निर्माण करण्याची गरज प्रशांत किशोर ह्यांनी      सोनियाजींच्या लक्षात आणून दिली की सोनियाजींनी  ती स्वतःच हेरली ह्याला फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. आता तरी सोनियांजींची पावले योग्य दिशेने पडत आहेत असे म्हणता येईल. अर्थात संकल्प आणि सिध्दीत मोठे अंतर असते हे लक्षात घेता दिल्ली अभी दूर है असेच म्हणावे लागेल !

रमेश झवर

No comments: