Sunday, May 15, 2022

काँग्रेसला जेव्हा जाग येते !

काँग्रेसला सत्ता कां गमावावी लागली आणि आगामी लोकसभा  निवडणुकीत ती पुन्हा कशी मिळवावी ह्यावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले चिंतन शिबीअपेक्षेप्रमाणे  उदेपूर येथे पार पडले. खरे तर, हे २०१४ साली सत्ता गमावली त्याच वेळी आयोजित करण्यात यायला हवे होते. ते तसे ह्यापूर्वीच झाले असते तर काँग्रेसजनांचे मनौधैर्य खच्ची होण्याची वेळ कदाचित्‌ आली नसती. अर्थात उशिरा कां होईना चिंतन शिबीर झाले.

मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणित  रालोआ सत्तेवर आला तरी संसदेत काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष होता. देशातील अन्य विरोधी राजकीय पक्षांची प्रतिमादेखील लाभहानीपासून बकीचशी मुक्त राहिली. ह्या सगळ्या विरोधी पक्षांना एकमेकांशी आघाडी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अन्य विरोधी पक्षांबरोबर युती आघाडी, सीटशेअरींग वगैरे करून सत्तेवर येण्याचा  पुन्हा प्रयत्न करण्यासा चिंतन शिबीरातल्या अन्य वक्त्यांनी विरोध दर्शवला नाही हे विशेष!  काँग्रेसजनांचे पाय जमिनीवर आले आहेत हेच त्यातून दिसून आले. राजकारणी मंडळी धूर्त असतात. काँग्रेसमधले राजकारणीही त्याला अपवाद नाहीत ! अर्थात त्यांनी धूर्त असू नये असे कोणीही म्हणणार नाही. परंतु ते धूर्त असले तरी स्पष्टवक्ते नाहीत. क्वचित् त्यांना ’लबाड’ म्हणता येईल. प्रत्यक्ष निवडणुकीचे अर्ज भरण्याची वेळ येईल तेव्हाच काय ते खरे चित्र स्पष्ट होईल.

काँग्रेस उमेदवाराला संदर्भात मत देण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा उमेदवारांच्या दृष्टीने सर्व प्रथम खर्चाचा प्रश्न येतो. गेल्या काही वर्षांपासून  मतदारांचा ठोकताळा स्पष्ट दिसला. ’भेटेल नोट तर मिळेल मतअसाच खाक्या बहुसंख्या गरीब मतदारांचा दिसून आला. स्वच्छ प्रतिमा, कर्तृत्व, शिक्षण वगैरेंचा मतदारांनी विचार करणे अपेक्षित आहे. भारतात मात्र ते कवडीमोलाचे ठरले. लोकशाहीत काय अपेक्षित आहे ह्यापेक्षा सत्ताबाज उमेदवारांना काअपेक्षित आहे सेच घडत आले आहे. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्लंड-अमेरिका ह्या देशातील लोकशाही राज्यपध्दत आपल्याला अभिप्रेत होती. परंतु तसे काही घडले नाही. ह्याचा अर्थ नेहरू-गांधी ह्यांनी ते घडवण्याचा प्रयत्नच केला नाही असे मुळीच नाही. त्यांनी त्यांच्याकडून प्रयत्नांची शिकस्तही केली. परंतु शेवटी त्यांचे प्रयत्न कुठेतरी अपुरे पडले हे स्पष्ट आहे.

भाजपा अस्तित्वात येण्यापूर्वी जनसंघ नाव असलेल्या पक्षाचे एकदा तर अवघे ३ खासदार निवडून आले होते. परंतु ह्या पक्षाने लौकरच कात टाकली. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत! जयप्रकाशजींच्या प्रयत्नास यश जनता पार्टीला १९७७ साली सत्ता प्राप्त झाली. भाजपाचे अटलबिहारी वाजपेयी ह्यांना मोरारजींच्या मंत्रिमंडळात  परराष्ट्रमंत्रीपद प्राप्त झाले होते. परराष्ट्रमंत्रीपद प्राप्त झाल्यानंतर आपण नेहरूंच्या परराष्ट्र धोरणात फारसा बदल करू शकलो नाही अशी कबुली त्यांनी बीयूजेच्या वार्तालापात मुंबईत दिली.त्यानंतर सत्तेच्या प्याला पुन्हा एकदा भाजपाच्या ओठाशी आला  तो १९९८ साली!  त्यावेळी प्रथमच ह्या पक्षाला सत्ता मिळाली.ती चांगली ५ वर्षे उपभोगायला मिळाली. त्यानंतर पुन्हा भाजपाला २०१४ पर्यंत सत्तेपासून वंचित व्हावे लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या मेहनतीमुळे नरेंद्र मोदींना विजय मिळाला. अर्थात त्यापूर्वी दोन दशकात भाजप उमेदवाराला विजयी करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मदत केली नव्हती अशातला भाग नाही. त्याही वेळी संघाने भाजपाला मदत केली होती. परंतु भाजपाला बहुमत न मिळाल्याने ती वाया गेली असे म्हणणे भाग आहे. भाजपाचा हा राजकीय इतिहास मुद्दाम थोडक्यात नमूद करण्याचे कारण असे की देशातील सर्वात जुन्या असलेल्या काँग्रेसला, विशेषतः नव्या पिढीतील काँग्रेसजनांना तो माहित असला पाहिजे. दुर्दैवाने आताच्या अनेक कांग्रेसजनांना यशापयशाची कारणे माहित नाहीत. माहित करून घेण्याची इच्छाही नाही. असो !

आगामी लोकसभा निवडणुकीत  पात्र जनांना तिकीट मिळेल अशी आशा उत्पन्न झाली आहे. अर्थात निव्व्ळ आशेचा उपयोग नाही. निवडणुक जिंकण्यासाठी पक्षाला काही देण्याची वेळ आली आहे, असे सोनियाजींनी ह्यापूर्वीच सांगितले आहे. ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. तिकीटेच्छुंनी काँग्रेससाठी पैसा उभा करून द्यावा अशी अपेक्षा आहे. मोदी सरकारने निवडणूक रोखे जारी केले होते. ते विकून भाजपाने अन्य पक्षांपेक्षा  अधिक पैसा उभा केला. पैसा उभा करण्याच्या बाबतीत काँग्रेस दुस-या क्रमांकावर आहे. अर्थात चिंतन शिबीराने तो लैगलाच पहिल्या क्रमांकावर येणार नाही. त्यासाठी आमदार-खासदारांना गावातील आणि देशातील धनिकवर्गाकडे उंबरठे झिजवावे लागणार! तसे ते झिजवण्याची त्यांची तयारी असेल तर काँग्रेसला सत्तेवर पोहचता आले तर ठीकच आहे ; किमान पूर्वीपेक्षा अधिक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून संसदेत बसता येईल !

जरतरच्या गोष्टींचा राजकारणात कधीच उपयोग होत नाही. चिंतन शिबीराच्या निमित्त्ने काँग्रेसला जाग आली हे महत्त्वाचे !

रमेश झवर

No comments: